Manikrao Thakare Telangana Election : चार राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. सुरुवातीचे कल आणि आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून तीन राज्यांमध्ये अजूनही मोदी मॅजिक कायम असल्याचं दिसून आलं आहे. राजस्थान, एमपी, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव होतो आहे. तेलंगणामध्ये मात्र, गेली दहा वर्षे सत्तेत असणाऱ्या बीआरएसला काँग्रेसने चांगलाच झटका दिला आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयामागे मोठा हात एका मराठी व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती म्हणजे माणिकराव ठाकरे! माणिकराव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वाधिक काळासाठी राहिलेले प्रदेशाध्यक्ष आहेत. गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्याकडे पक्षाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती.
तेलंगणाच्या स्थापनेपासून तिथे सत्तेत असणाऱ्या बीआरएस पक्षाला हरवण्यासाठी ठाकरेंनी नेमकी काय रणनीती आखली होती? सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी या रणनीतीचं विश्लेषण केलं आहे.
भारंबे सांगतात, की "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या माणिकराव ठाकरेंनी त्यांचा प्रदीर्घ अनुभव तेलंगणा निवडणुकीत वापरला. पक्षाची धुरा सांभाळताना पक्षातील मतंमतांतरे सांभाळून सर्व नेत्यांना एकदिशेनं चालण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. काँग्रेसला याच गोष्टीची सर्वाधिक गरज होती."
तेलंगणा सरकारने मोठमोठे प्रकल्प आणि जाहिरातींवर खर्च करत मोठा गाजावाजा केला होता. मात्र ठाकरेंनी ग्राऊंड लेव्हलवर काम केलं. सरकारविरुद्धचे ठळक मुद्दे अधोरेखित करुन त्यावर ते टीकांचा भडीमार करत राहिले. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी बेरोजगारीचा मुद्दा त्यांनी प्रभावी पद्धतीनं मांडला. यासोबतच त्यांनी तेलंगणातील चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना एकत्रित करत त्यांना काँग्रेसशी जोडून घेतलं.
माणिकराव ठाकरेंनी आपला पूर्ण अनुभव वापरत उमेदवाराची विनिंग कॅपॅसिटी पाहत तिकीट वाटप केलं. याशिवाय पक्षातील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांना मतभेद विसरून विजय मिळवायचा असेल तर आताची ही शेवटची संधी असल्याचं सांगत प्रेरित केलं. शैक्षणिक संस्थांमार्फत ते तरुणांपर्यंत पोहचले. केसीआर यांचा सत्ताधारी बीआरएस पक्ष हा भाजपची 'बी टीम' असल्याचा जोरदार प्रचार केला, ज्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचं भारंबे सांगतात.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण गांधी कुटुंबाला माणिकराव ठाकरेंनी उतरवलं होतं. म्हणजे राहुल गांधींमार्फत केसीआर यांच्या सरकारमधील प्रकल्पांमधल्या त्रुटी आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवण्यात आलं. तर, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही गावोगावी प्रचारासाठी फिरताना दिसल्या. त्यावेळी अनेकांनी त्यांना 'इंदिरा अम्मा' अशी हाक मारली. त्यामुळे इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेचा वापर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षासाठी करुन घेण्याची ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरलेली दिसली.
विशेष म्हणजे, इंदिरा गांधी आणीबाणीनंतर रायबरेलीमधून निवडणूक हरल्या होत्य. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी मेडकसह अन्य दोन जागांवरून लोकसभेची निवडणूक लढली होती. तेव्हाचं मेडक सध्या तेलंगणा येथे आहे. त्यावेळी इंदिरा गांधी २ लाख ९५ हजाराच्या फरकाने निवडून आल्या होत्या. तिथले आदिवासी बांधव आजही सांगतात की, इंदिरा अम्माने आम्हाला आमच्या जमिनी परत मिळवून दिल्या होत्या. लोकांनी 'इंदिरा अम्मा' म्हटल्यामुळे माझी जबाबदारी वाढल्याचं प्रियांका गांधींनी म्हटलं होतं.
अशा प्रकारे आपला अनुभव, पक्षातील मुख्य चेहऱ्यांचा प्रचारात वापर, योग्य मुद्द्यांवर टीका आणि पक्षातील नेत्यांची योग्य मोट बांधणे अशा गोष्टींच्या माध्यमातून ठाकरेंनी तेलंगणामध्ये विजय खेचून आणला असल्याचं भारंबे यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.