बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. केवळ निपाणी मतदारसंघातील उमेदवाराची निवड शिल्लक असून त्याची घोषणा लवकरच होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात नवा चेहरा देण्यात आल्याने यावेळी म. ए. समितीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तब्बल दहा वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच समिती सहा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे.
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या म. ए. समितीने १९५७ पासून आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकात पाडलेली फूट व दुहीमुळे अनेक मतदारसंघात ताकद असूनही समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे, पुन्हा एकदा समितीला बळ मिळावे आणि ताकद वाढावी यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने गेल्या सहा महिन्यात अनेक कार्यक्रम हाती घेतले. बायपास, रिंगरोडमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जोरदार आवाज उठवला. त्यामुळे, गेल्या काही महिन्यात मराठी भाषिक जनता संघटीत झाली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा अशी मागणी लावून धरण्यात आली. त्यानुसार मध्यवर्ती समितीच्या सूचनेला प्रतिसाद देत घटक समित्यांनी आपापल्या मतदारसंघात एकच उमेदवाराची घोषणा केली आहे.
बेळगाव ग्रामीणमधून युवा नेते आर. एम. चौगुले, बेळगाव दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, उत्तरमधून ॲड. अमर येळ्ळूरकर, खानापूरमधून मुरलीधर पाटील, तर यमकनमर्डीतून मारुती नाईक या माजी सैनिकाला उमेदवारी देण्यात आली आहे. निपाणी मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. म. ए. समिती संपली असे सांगत समिती सोडून गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनाही ही ताकद दिसून येत आहे. त्यामुळे, समितीच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र येत आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक समितीसाठी सकारात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.