Raibag Vidhansabha Constituency : काँग्रेसमधील बंडखोरीचे ग्रहण सुटणार?

रायबाग मतदारसंघ सुरुवातीपासूनच राखीव आरक्षण आहे. त्यातून येथे अधिक जणांना आमदार होण्याची संधी मिळाली. १९५७ मध्ये द्विसदस्यीय व्यवस्थेतून व्ही. एल. पाटील व एस. पी. तळवळकर यांनी बाजी मारली होती.
Raibag Vidhansabha Constituency
Raibag Vidhansabha Constituencysakal
Updated on
Summary

रायबाग मतदारसंघ सुरुवातीपासूनच राखीव आरक्षण आहे. त्यातून येथे अधिक जणांना आमदार होण्याची संधी मिळाली. १९५७ मध्ये द्विसदस्यीय व्यवस्थेतून व्ही. एल. पाटील व एस. पी. तळवळकर यांनी बाजी मारली होती.

रायबागचे राजकारण म्हटले, की व्ही. एल. पाटील यांचे नाव आजही चर्चेत येते. द्विसदस्यीय कागवाड-रायबाग संयुक्त मतदारसंघातून एकदा अपक्ष व रायबाग मतदारसंघातून दोनदा काँग्रेसकडून विधानसभेवर गेलेल्या पाटील यांनी मंत्रिपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. व्ही. एल. पाटील आणि बाणे सरकार या दोन कुटुंबातील संघर्षामुळेही रायबाग मतदारसंघ राज्यात चर्चेत होता. या मतदारसंघात वजनदार नेता म्हणून त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांची राजकारणासह सर्वच क्षेत्रांवर पकड होती.

रायबाग मतदारसंघ सुरुवातीपासूनच राखीव आरक्षण आहे. त्यातून येथे अधिक जणांना आमदार होण्याची संधी मिळाली. १९५७ मध्ये द्विसदस्यीय व्यवस्थेतून व्ही. एल. पाटील व एस. पी. तळवळकर यांनी बाजी मारली होती. त्या वेळी या मतदारसंघात काही भाग कागवाडचा होता. त्यानंतर १९६२ मध्ये बी. एस. सौदागर हे एकतर्फी विजयी झाले होते. दोन वेळा व्ही. एल. पाटील विजयी झाले. त्यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव होता. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार व माजी विधानपरिषद सदस्य असे असून त्यांच्या कुटुंबाला येथील राजकारणात महत्त्व आहे. काँग्रेसचा प्रभाव याही मतदारसंघात प्रारंभी राहिला आहे. त्यानंतर दोन वेळा जनता दलाने येथे मुसंडी मारली होती. अलीकडच्या तीन निवडणुकीत सलग विजय मिळवून दुर्योधन ऐहोळे यांनी भाजपचे कमळ या मतदारसंघात फुलविले आहे.

पहिला विजय वगळता येथे आमदार ऐहोळे यांना दोनवेळा काँग्रेसच्या बंडखोरीमुळे आयता विजय मिळाल्याची वस्तुस्थिती आहे. याहीवेळेला तशी स्थिती होण्याची शक्यता असल्यानेच पक्षाने अद्याप या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही. यावेळी येथे आयएएस अधिकारी शंभू कल्लोळकर हे स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारीवर दावा केला असून पक्षानेही सावध पवित्रा घेतला आहे.

महावीर मोहिते यांनी गेल्यावेळीही काँग्रेसकडून निवडणूक लढविली आहे. त्यावेळी त्यांच्यापेक्षा अधिक मते काँग्रेसचे बंडखोर असलेल्या प्रदीप माळगी यांनी मिळविली होती. सध्या मोहिते व कल्लोळकर यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. तर माळगी यांनीही उमेदवारी मागितली असली तरी त्यांनी धजदकडूनही तयारी केली आहे.

रायबाग मतदारसंघात गत दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागून फटका बसला आहे. काँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक व तयारी करुनही प्रदीप माळगी यांना पक्षाने २०१३ मध्ये डावलले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसपेक्षा अधिक मते घेऊन विजयी उमेदवाराला चुरशीची लढत दिली.

२०१३ मध्ये अपक्ष असूनही केवळ ८१९ मतांनी त्यांचा विजय हुकला. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसचे दुसरे इच्छुक महावीर मोहिते अपक्ष राहिले. या बंडखोरीमुळे दोघांच्या मतांची विभागणी होऊन ऐहोळे यांनी हॅट्ट्रिक केली. आता ऐहोळे चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नशील असताना उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये कसरत सुरू आहे.

मंत्रिपदाची दीर्घ प्रतीक्षा

रायबाग मतदारसंघ पूर्वी एकच होता. या मतदारसंघात नेहमी आमदार बदलत गेले. यापूर्वी व्ही. एल. पाटील दोन वेळा, श्याम घाटगे तीन वेळा, दुर्योधन ऐहोळे तीन वेळा अशा तिघांना एकाहून अधिक वेळा संधी मिळाली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कुडची मतदारसंघ अस्तित्वात आला. त्या वेळी श्याम घाटगे २००८ मध्ये कुडचीतून विजयी झाले. या तालुक्यात केवळ व्ही. एल. पाटील यांना चार वेळा मंत्रिपद मिळाले आहे. रायबाग मतदारसंघातून असताना दोन वेळा व कागवाड मतदारसंघातून असताना दोन वेळा मंत्री झाले आहेत. एकदा वजनदार महसूल खाते मिळाले होते. त्यानंतर या मतदारसंघाला मंत्रिपद मिळालेले नाही. श्याम घाटगे व दुर्योधन ऐहोळे यांना निगम मंडळावर अध्यक्षपद मिळाले होते. या मतदारसंघाला मंत्रिपदाची दीर्घ प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.