ईश्वराप्पा स्वत: निवृत्त होत असले तरी मतदारसंघात मुलाला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा व तसा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु भाजपातील स्थानिक नेत्यांचा व इच्छुकांचा त्याला विरोध आहे.
ईश्वराप्पा स्वत: निवृत्त होत असले तरी मतदारसंघात मुलाला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा व तसा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु भाजपातील स्थानिक नेत्यांचा व इच्छुकांचा त्याला विरोध आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत शिमोग्याचा समावेश नाही.
शिमोगा जिल्ह्यातील शिमोगा हा महत्वाचा विधानसभा मतदारसंघ. शिमोगा आणि भाजपचे जेष्ठ नेते के. एस. ईश्वराप्पा यांचे समीकरण जुळलेले. १९८९ पासून १९९९ व २०१३ ची विधानसभा निवडणूक वगळता पाचवेळा या मतदारसंघातून ते निवडूण आले आहेत. आता सहाव्या वेळी निवडणुकीला उभे राहण्याची तयारी करणाऱ्या ईश्वराप्पा यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली अन् भाजप हायकमांडचीही डोकेदुखी दूर झाली. आता काँग्रेसच्याही विजयाच्या अपेक्षा तितक्याच वाढल्या आहेत.
ईश्वराप्पा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजकारणी आहेत. २०१४ मध्ये त्यांना भाजपने कर्नाटक विधानपरिषदेवर नामनिर्देशित केले आणि परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले. ईश्वरप्पा हे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेतेही होते. त्यांनी २०१२ ते २०१३ दरम्यान जगदीश शेट्टर यांच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
गेल्या वर्षी १२ एप्रिल रोजी बेळगाव येथील सरकारी कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्येप्रकरणी ईश्वराप्पा आरोपी होते. कंत्राटदाराने त्यांच्या कथित सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पांचे नाव घेतले होते. ईश्वरप्पा यांनी चार कोटींचे बिल काढण्यासाठी ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आता शिमोगा मतदारसंघातील त्यांचा राजकीय वारसदार कोण, या विषयी औत्सुक्य आहे. ईश्वरप्पा यांनी आता मुलगा के. ई. कांतेश यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याचे समजते.
तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा शिमोगा विधानसभा मतदारसंघ जिंकणे, भाजपला कठीण होऊ शकते, कारण गेल्या काही वर्षांत या मतदारसंघात वारंवार जातीय दंगली होत आहेत. २०२२ च्या सुरुवातीला बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येनंतर या प्रदेशात समस्या निर्माण झाल्या.
अयानूर मंजुनाथ यांनी आमदार ईश्वराप्पा यांच्यावर जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप केला. मतदारसंघातून पक्षाचे उमेदवारी मागत असलेले मंजुनाथ यांनी मिळणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर जोरदार टीका केली.
मंजुनाथ यांना काँग्रेसचे निमंत्रण
मंजुनाथ यांनी कांतेश यांना भाजप उमेदवारी देईल, या शक्यतेने आव्हान दिले होते. त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर घराणेशाहीचे राजकारण सुरू ठेवल्याचा आरोप केला. भाजपच्या भांडणामुळे काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मंजुनाथ यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास सांगितले आहे.
२०१८ ची निवडणूक
२०१८ मध्ये शिमोगा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ५६ हजार ३७३ मतदार होते. एक लाख ७२ हजार ३५४ मतदारांनी मतदान केले. या जागेवरून भाजपचे उमेदवार ईश्वराप्पा विजयी झाले. त्यांना एकूण एक लाख चार हजार २७ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार के. बी. प्रसन्नकुमार एकूण ५७ हजार ९२० मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा ४६ हजार १०७ मतांनी पराभव झाला.
नेत्यांचे बोल
हासन विधानसभा मतदारसंघात आमच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिल्यास विजय मिळविणे अतिशय अवघड आहे. येथे कुटुंबाच्या प्रतिष्ठेपेक्षा विजय महत्त्वाचा आहे. त्यासाठी जनमताच्या आधारावर धजदच्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा माझा विचार आहे.
- एच. डी. कुमारस्वामी, धजद नेते
हुबळी-धारवाड मध्यमधून माझ्या उमेदवारीबाबत दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहे आणि मला आशा आहे की, सर्व काही सकारात्मक गोष्टी होतील. काही दिवसांतच पक्षाचे हायकमांड आणि राज्यपातळीवरील नेते योग्य निर्णय घेतील.
- जगदीश शेट्टर, भाजप नेते
‘वरुणा’मधून माझ्याविरोधात भाजपने व्ही. सोमण्णा यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांना निवडणूक लढवू द्या. मी त्यांचे स्वागत करतो. जे कोणी माझ्याविरोधात लढतील, त्यांचे मी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो.
- सिद्धरामय्या, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.