तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते ऍड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डअेरी) निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी सलामी झाली असून, धनुर्विद्या खेळाच्या नेमबाजीचा उपयोग सहकार क्षेत्रात होणार आहे. अल्पवयात जिल्हा दूध संघावर निवडून आल्यामुळे भविष्यातील राजकारणात चांगलाच जम बसणार आहे. वडिलांच्या दूध संघाच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा स्वप्नीलला होणार आहे. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या व शालेय जीवनापासूनच खेळाची आवड असल्याने महाविद्यालयीन जीवनात धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण स्वप्नीलला मिळाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळात नेमबाजी करून अनेक बक्षिसे त्यांनी मिळविली. अर्चरी खेळात पारंगत असलेल्या स्वप्निल ढमढेरे यांना महाराष्ट्र शासनाने शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले आहे.
शिरूर तालुक्यातून संचालकपदी बहुमताने विजयी झाल्याने स्वप्नीलच्या रुपाने एका राज्यस्तरीय खेळाडूला जिल्हा दूध संघावर संधी मिळाली आहे. स्वप्निलचे वडील बाळासाहेब जयवंतराव ढमढेरे हे १९८७ पासून जिल्हा दूध संघावर सलग संचालक म्हणून काम करीत आहेत. आताच्या निवडणुकीत स्वतः बाळासाहेब ढमढेरे यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन मुलगा स्वप्निलला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. स्वप्निलच्या रूपाने पुन्हा एकदा ढमढेरे यांच्या घराण्यात सलग ३५ वर्ष जिल्हा दूध संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, स्वप्निल ढमढेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला उमेदवारी दिली नव्हती, त्यांच्याऐवजी केशरताई पवार यांना तालुक्यातून संधी देण्यात आली होती. स्वप्निल ढमढेरे यांनी नाराज न होता पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेऊन प्रचारात आघाडी घेतली होती. पक्षश्रेष्ठींनी केशरताई पवार यांची उमेदवारी तालुक्यातून रद्द करून त्यांना जिल्हा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीने संधी दिली. त्यांच्या जागी ऍड स्वप्नील ढमढेरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आणि स्वप्नीलच्या दूध संघावर जाण्याची आशा आणखीनच बळावली. आजच्या निवडणुकीत स्वप्नीलला १३० मते मिळाली आणि विजयाची माळ गळ्यात पडली.
स्वप्निल ढमढेरे विजयी झाल्यानंतर तळेगाव ढमढेरे व तालुक्यातील विविध गावात फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. निवडीनंतर स्वप्निल ढमढेरे यांचा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
"माझ्या विजयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार ऍड अशोकबापू पवार, महाविकास आघाडी व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी तसेच दूध उत्पादक सभासद यांचा मोलाचा वाटा असून, आगामी काळात पक्षश्रेष्ठी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दूध संघात काम करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक ऍड स्वप्निल ढमढेरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.