यवतमाळ: विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामुळे राजकीय पक्षांसह प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. यंदा सातही विधानसभा मतदारसंघातील 22 लाख 43 हजार 162 मतदार आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करणार आहेत. यात 11 लाख 46 हजार पुरुष, 10 लाख 96 हजार महिला तर एक हजार 393 सैन्य दलातील मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघ आहेत. यात वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पुसद तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 2019 मध्ये सातही विधानसभा मतदारसंघात 65.78 टक्के मतदान झाले होते.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अजूनही महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले नाहीत. त्यामुळे उमेदवार कोण असणार, यावर नागरिक वेगवेगळे अंदाज लावत आहेत. उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा कायम असून उमेदवारीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील इच्छुक मुंबई, दिल्लीत तळ ठोकून आहेत.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक नोटीफिकेशन-22 ऑक्टोंबर
नामाकंन दाखल करणे-29 ऑक्टोंबर
छाननी-30 ऑक्टोबर
नामांकन परत घेणे-4 नोव्हेंबर
मतदान -20 नोव्हेंबर
महिला, युवक, दिव्यांग करणार मतदान केंद्र संचालित
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार 578 मतदान केंद्र राहणार आहे. यात 14 आदर्श मतदान केंद्रांचा समावेश आहे. सात मतदान केंद्र महिला, सात मतदान केंद्र युवक तर सात मतदान केंद्र दिव्यांगाव्दारे संचालित केले जाणार आहे. विधानसभेसाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले आहे.
ते बुधवारी (ता.16) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी राजेश देवते, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. उंबरकर म्हणाले, यावेळी महिला मतदारांचे प्रमाण वाढले आहे. एक हजार पुरुषांच्या मागे 956 महिला मतदार आहेत. मतदारसंख्या वाढावी यासाठी प्रशासनाने सुरवातीपासून प्रयत्न केले.
त्यामुळे यंदा मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. निवडणूक काळात गुन्हेगारावर वॉच ठेवला जाणार आहे. याशिवाय आंतरराज्य तेलंगणा सीमेवर चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी 131 पथक तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात 28 चेकपोस्ट लावण्यात येणार आहे. याशिवाय फिरते पथक, भरारी पथक, खाते तपासणी, कॉल सेंटर आदी पथकही लक्ष ठेवणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिली.
2019 मधील विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी
वणी-72.11%
राळेगाव-69.79%
यवतमाळ-54.12%
दिग्रस-64.55%
आर्णी-69.39%
पुसद-61.31%
उमरखेड-69.16%
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.