Kagal Assembly Elections 2024: सर्वच मतदारसंघात ‘पोस्टर वॉर’ जोरात; एकमेकांना डिवचण्याचा प्रकार, टीकात्मक वाक्यांनी रंगत

Kagal Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ‘पोस्टर वॉर’ जोरात सुरू झाले आहे. एकमेकांना आव्हान देण्याबरोबरच टीकात्मक मजकूर असलेल्या या फलकांनी जिल्ह्याचा कोपरा नि कोपरा व्यापला आहे.
Kagal Vidhan Sabha Elections 2024
Kagal Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ‘पोस्टर वॉर’ जोरात सुरू झाले आहे. एकमेकांना आव्हान देण्याबरोबरच टीकात्मक मजकूर असलेल्या या फलकांनी जिल्ह्याचा कोपरा नि कोपरा व्यापला आहे.

यात विद्यमानांबरोबरच इच्छुक आणि नवख्या उमेदवारांनीही फलकातून सलामी देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, कागल मतदारसंघात मंडलिक गटाकडून लावलेल्या फलकांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यात महायुतीचे संभाव्य उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना उद्देशून लोकसभेचा संदर्भ देत ‘काय केलात तुम्ही, विसरणार नाही आम्ही’ अशा शब्दांत इशारा दिला आहे.

महिन्यापूर्वी झालेल्या गणेशोत्सवानंतर आता सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची संधी साधत हे फलक लावण्यात आले आहेत. त्याला कोणताही मतदारसंघ अपवाद राहिलेला नाही. अजून महायुती असो किंवा महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सूत्र निश्‍चित असले तरी प्रत्यक्षात जागा वाटप झालेले नाही.

पण जागा आपल्यालाच मिळेल असा दावाही या फलकातून करण्यात आला आहे. त्यातून ‘कोल्हापूर उत्तरचे उत्तर, राजेश क्षीरसागर’ असे फलक शिवसेना शिंदे गटाकडून तर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फलकावरही ‘कोल्हापूर उत्तरचे उत्तर, संजय पवार’ असे फलक झळकले आहेत. अशाच पध्दतीने कोल्हापूर दक्षिणमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकासकामांचे फलक लावले आहेत. त्याच्यासमोर माजी आमदार अमल महाडिक यांनी महायुती सरकारने मतदारसंघात केलेल्या कामांची जंत्रीच फलकाद्वारे मांडली आहे.

खरे ‘पोस्टर वॉर’ राधानगरी मतदारसंघात रंगले आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे उमेदवार निश्‍चित असून त्यांनी केलेल्या विकासकामांचे फलक लावले आहेत.

तर त्यांचे विरोधी उमेदवार कोण हे निश्‍चित नसले तरी माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनीही फलक लावले आहेत. ‘लढणार आणि जिंकणारच’ या के. पी. यांच्या फलकावरील मजकुराला ‘पर्याय हवा, पण चेहरा नवा’ असे प्रत्युत्तर ए. वाय. यांच्याकडून देताना त्यांनी के. पी. यांच्यासह आबिटकर यांनाही डिवचले आहे. या दोन-चार मतदारसंघातील ‘पोस्टर वॉर’ची ही झलक आहे. पण सर्वच मतदारसंघात इच्छुकांसह विद्यमान आमदारांचे फलक झळकले आहेत.

अवैध व्यावसायिकही झळकले

या फलक युद्धात शहराला लागून असलेल्या काही मतदारसंघात अवैध व्यावसायिकांचेही फलक झळकले आहेत. भाई, दादा, आण्णा अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या फलकांचीही चांगलीच चलती दिसत आहे. यापैकी किती फलक परवानगी घेऊन लावले किंवा नाही याचा तपास महापालिका किंवा प्रशासनाच्या पातळीवर होण्याची गरज आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.