solapur result
solapur resultsakal

१८४ उमेदवारांमध्ये कोण उधळणार गुलाल? पहिला निकाल ‘शहर उत्तर’चा, त्यानंतर शहर मध्य, सांगोला अन्‌ पुढे...घरबसल्या ‘येथे’ पहाता येईल निकाल, डिपॉझिट वाचवायला किती लागतील मते?

सुरवातीला सोलापूर शहर उत्तरचा निकाल हाती येण्याची शक्यता असून या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २१ फेऱ्या होतील. त्यानंतर शहर मध्य व सांगोल्याचा निकाल जाहीर होणार असून त्या दोन्ही मतदारसंघाच्या प्रत्येकी २२ फेऱ्या होणार आहेत.
Published on

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघाची आज (शनिवारी) सकाळी आठपासून मतमोजणीला सुरू होणार असून सायंकाळी पाचपर्यंत सर्वच मतदारसंघांचे निकाल हाती येणार आहेत. ११ मतदारसंघातून १८४ उमेदवार रिंगणात असून त्यातील कोणता उमेदवार आमदार होणार, कोणाचा निसटता पराभव होणार आणि कोणाचे डिपॉझिट जप्त होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सुरवातीला सोलापूर शहर उत्तरचा निकाल हाती येण्याची शक्यता असून या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २१ फेऱ्या होतील. त्यानंतर शहर मध्य व सांगोल्याचा निकाल जाहीर होणार असून त्या दोन्ही मतदारसंघाच्या प्रत्येकी २२ फेऱ्या होणार आहेत.

दक्षिण सोलापूरमधून २५, मोहोळमधून १०, पंढरपूरमधून २४, करमाळ्यातून १५, माढ्यातून १३, बार्शी, सोलापूर शहर उत्तर व शहर मध्य या तिन्ही मतदारसंघातून प्रत्येकी २०, अक्कलकोट व माळशिरसमधून प्रत्येकी १२ आणि सांगोल्यातून १३ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. या १८४ उमेदवारांमधील फक्त ११ जणांनाच आमदारकीची संधी मिळणार असल्याने कोणते १६३ उमेदवार पराभूत होतील, याचा अंदाज बांधला जात आहे. अनेकांनी आपलाच अंदाज खरा ठरणार म्हणून पैजाही लावल्या आहेत.

दक्षिण सोलापुरात भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमर पाटील व अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात मनसेचे महादेव कोगनुरे यांच्याशिवाय संतोष पवार, सोमनाथ वैद्य हे अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याविरुद्ध भाजप महायुतीचे सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश कोठे यांच्यातील कोण विजयी होणार, याची उत्सुकता आहे. शहर मध्यमध्ये एमआयएमचे फारुक शाब्दी, भाजपचे देवेंद्र कोठे, काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे नरसय्या आडम अशी चौरंगी लढत झाली आहे. मोहोळमध्ये तुतारीचे राजू खरे व राष्ट्रवादीचे यशवंत माने यांच्यात तर बार्शीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिलीप सोपल व शिवसेनेकडून राजेंद्र राऊत यांच्यातच सामना झाला आहे.

माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील व अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे आणि राष्ट्रवादीचे मीनल साठे अशी तिरंगी लढत आहे. करमाळ्यात अपक्ष संजय शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील यांच्यातच खरा सामना झाला आहे. माळशिरसमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर यांच्याविरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत झाली आहे. सांगोल्यात शेकापचे बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे शहाजी पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपक साळुंखे पाटील अशी तिरंगी तर पंढरपूर-मंगळवेढ्यात भाजपचे समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत, काँग्रेसचे भगिरथ भालके आणि मनसेचे दिलीप धोत्रे अशी चौरंगी लढत झाली आहे. यांच्यातील प्रत्येकी एकालाच आमदारकीची संधी मिळणार असून त्यातील कोणता उमेदवार गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विनापरवाना कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही

मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होईल. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीवर लक्ष राहील. विनापरवाना कोणालाही त्याठिकाणी सोडले जाणार नाही. कोणी स्टंटबाजी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. विनापरवाना कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

३० ते ४० संवेदनशील गावांमध्येही बंदोबस्त

मतमोजणीच्या अनुषंगाने सर्वच मतमोजणी केंद्रांबाहेर स्ट्राईकिंग फोर्स तैनात असेल. त्याठिकाणी सीआरपीएफ, एसआरपीएफ व जिल्हा पोलिस असा त्रिस्तरीय बंदोबस्त लावला आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर ३० ते ४० पोलिस असतील. याशिवाय फिक्स पॉइंट देखील असतील, त्यात उमेदवारांची घरे, गावांसह ग्रामीणमधील ३० ते ४० संवेदनशील गावांमध्येही बंदोबस्त असणार आहे.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

---------------------------------------------------------------------------------------------------

प्रत्येक हालचालीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल

शहरातील मतमोजणीच्या तिन्ही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहील, निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय कोणालाही १०० मीटर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. निकालानंतर कोणीही दोन गटात, जाती-धर्मात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये. शहरातील विविध भागात ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

पोलिसांचे आदेश अन्‌ सूचना...

  • मतमोजणी ठिकाणी विनापरवाना कोणालाही प्रवेश नसेल. २०० मीटर परिघात कोणत्याही व्यक्तीला (सुरक्षेसाठी नेमलेले पोलिस अधिकारी-कर्मचारी वगळून) शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळ्याचा वापर करता येणार नाही.

  • इन्स्ट्राग्राम, व्हॉटस्अॅप, व्टिटर, फेसबुक, अशा समाज माध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरविण्यास मनाई आहे.

  • २०० मीटर परिसरात घोषणा देणे, वाद्य, गाणी वाजविणे, गाणी म्हणणे, गुलाल उधळणे, वाहनांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून आवाज करणे, गुलाल, रंग उधळणे अशा बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स, बोर्ड व आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांविरुद्ध होणार कारवाई.

  • पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही. मिरवणूक काढण्यासाठी परवानगी आवश्यकच असणार आहे. विनाकारण कोणीही विनापरवाना सार्वजनिक रस्त्यावर जल्लोष केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील.

मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या...

  • मतदारसंघ मतमोजणीच्या फेऱ्या

  • शहर उत्तर २१

  • शहर मध्य २२

  • सांगोला २२

  • बार्शी २४

  • मोहोळ २४

  • माळशिरस २५

  • करमाळा २५

  • पंढरपूर २६

  • माढा २६

  • सोलापूर दक्षिण २७

  • अक्कलकोट २९

घरबसल्या पहा ‘या’ संकेतस्थळावर निकाल

विधानसभा निवडणुकीचा निकाल तुम्हाला घरी बसूनही पाहता, ऐकता वाचता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या eci.gov.in (https://results.eci.gov.in/index1.html) या संकेतस्थळावर जाऊन त्यातील रिझल्टवर क्लिक करावे. त्याठिकाणी आपल्याला पाहिजे त्या मतदारसंघाची निवड करून तेथील निकाल पाहता येईल. याशिवाय वाचकांना esakal, सरकारनामा व साम टीव्ही यावरही निकाल समजेल.

डिपॉझिट वाचविण्यासाठी एवढी मते हवीत

  • मतदारसंघ झालेले मतदान डिपॉझिटसाठी मते

  • करमाळा २,२९३७५ ३८,२२९

  • माढा २,६७,६९१ ४४,६१५

  • बार्शी २,४६,७१२ ४१,११८

  • मोहोळ २,३०,८५० ३८,४७५

  • शहर उत्तर १,९१,३९४ ३१,८९९

  • शहर मध्य २,००,२९१ ३३,३८१

  • अक्कलकोट २,५५,०२६ ४२,५०४

  • दक्षिण सोलापूर २,२३,६२४ ३७,२७०

  • पंढरपूर २,५९,७४४ ४३,२९०

  • सांगोला २,६१,०१३ ४३,५०२

  • माळशिरस २,४०,८५१ ४०,१४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.