नागपूर: विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने मविआतील इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. आपला मतदारसंघ मित्रपक्षाला सुटण्याचा धोकाही अनेकांना वाटत आहे. जिल्ह्यातील बारा मतदारसंघातील काटोल-नरखेड, रामटेक, दक्षिण नागपूर या तीन मतदारसंघात उमेदवारीवरून मविआ व महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
यामुळे या तीन मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न' होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. माजी अर्थमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पूत्र याज्ञवल्क्य जिचकारही येथून तयारीला लागले आहे. त्यामुळे मविआ समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुखांमुळे हा मतदारसंघ सहज सोडेन असे दिसत नाही.
हे बघता आघाडीतूनच बंडखोरी होईल असे दिसते. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी येथून लढण्याचे संकेत दिलेत. विशेष म्हणजे याज्ञवल्क्य जिचकार काही वर्षांपासून या मतदारसंघात विविध कार्यक्रम, शिबिर घेऊन जनसंपर्क वाढवीत आहेत.
दक्षिणमध्ये वेगळाच पेच
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव सेनेने दावा केला आहे. येथून सातत्याने काँग्रेस लढत आली आहे. काँग्रेसचे दीनानाथ पडोळे तीनवेळा आमदार होते. गोविंदराव वंजारी येथूनच जिंकले होते. २०१९ मध्ये काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला. ते पुन्हा लढायची तयारी करीत आहे. उद्धव सेनेला हा मतदारसंघ सोडल्यास मोठा असंतोष उफाळण्याची शक्यता आहे.
रामटेकमध्ये दावेदारच अधिक
रामटेकमधूनही आजवर काँग्रेस लढत आली. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथील विद्यमान अपक्ष आमदार आशीष जयस्वाल मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहेत. मात्र, त्यांनी अद्याप शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. उद्धव सेनेने येथे दावा केला आहे. काँग्रेसलाही येथूनच लढायचे आहे. माजी अर्थ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक दहा वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करीत आहे.
उद्धव सेनेकडून विशाल बरबटे कामाला लागले आहेत. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनीही दावा सोडला नाही. महाविकास आघाडीने उद्धव सेनेला रामटेक सोडल्यास काँग्रेसकडून सांगली पॅटर्नचा अवलंब होण्याची शक्यता आहे.
#ElectionWithSakal
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.