बदनापूर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी (ता. चार) स्पष्ट झाले. छानणीनंतर ४० उमेदवार वैधरित्या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १७ उमेदवारांत निवडणुकीचा सामना रंगला होता.
दरम्यान, या निवडणुकीत आता नारायण कुचे (भाजप), बबलू चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), सतीश खरात (वंचित बहुजन आघाडी), शैलेंद्र मिसाळ (पीपल्स पार्टी ऑफ डेमोक्रॅटिक), दिनेश आदमाने (रिपब्लिकन सेना), जयश्री कटके (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), साईनाथ चिन्नादोरे (स्वाभिमानी पक्ष), संदीप गवळी (समता पक्ष), ज्ञानेश्वर नाडे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), तर अपक्ष राहुल चाबुकस्वार, काकासाहेब भालेराव, सुष्मिता दिघे, संगीता गायकवाड, बाबासाहेब खरात, सचिन कांबळे, संतोष मिमरोट, राजेश राऊत असे १७ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी डमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.