फुलंब्री: विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघासाठी भाजपकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्यामुळे पक्षाने आता नवीन प्रयोग राबविला आहे. भाजपच्या ३४७ पदाधिकाऱ्यांनी बंद लिफाफ्यात प्राधान्यक्रमाने पसंती देऊन उमेदवार ठरविला आहे.
ही प्रक्रिया मंगळवारी (ता. एक) सायंकाळपासून राबविण्यात आली. पक्षाच्या या नवीन फार्म्युल्याने इच्छुकांत चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसले.
भाजपने यापूर्वी मतदारसंघात दोन ते तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. आता सर्वच इच्छुक महिनाभरापासून मतदारसंघात एकत्र दौरे करत आहेत. मात्र, शरीराने एकत्र आले असले, तरी मनाने ते दुरावलेले असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे भाजपचे ३४७ पदाधिकारी उमेदवार कोण, हे ठरविणार आहेत.
यामध्ये बंद लिफाफ्यात तीन इच्छुकांना प्राधान्यक्रम देणे अनिवार्य करण्यात आले. मतदारसंघातील सावंगी परिसरातील एका खासगी लॉन्समध्ये पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत. पसंती क्रमांक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर आहे. पदाधिकारी कोणाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तिघांना पसंती देणे अनिवार्य
प्रक्रियेची माहिती देत टोकन देण्यात आले होते. या टोकन प्रक्रियेप्रमाणे एका पदाधिकाऱ्याला कोणत्याही इच्छुक तीन जणांना पसंती देणे अनिवार्य होते. त्यानुसार कोणत्याही तीन इच्छुक उमेदवारांचे नाव आणि एक-दोन-तीन असे प्राधान्यक्रम बंद लिफाफ्यात देत होते. ही प्रक्रिया राबविताना मोबाइलवर बोलण्यास बंदी होती.
पदाधिकाऱ्यांना फोन करताना इच्छुकांच्या नाकीनऊ
पसंती क्रमांकाचा नवीन प्रयोग पक्ष राबवित असल्याची माहिती मिळताच काही इच्छुकांनी वेळ न घालविता आपल्या यंत्रणेमार्फत जास्तीत-जास्त पदाधिकाऱ्यांना कॉल करून पसंती क्रमांक एक देण्याची विनंती केली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन करताना इच्छुकांच्या नाकीनऊ आल्याचे दिसून आले.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.