पुणे : राज्यात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असल्याने प्रचार सभांसाठी नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. नेत्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यात जाता यावे, यासाठी विविध पक्षांनी ‘नॉन शेड्यूल ऑपरेटर’कडे हेलिकॉप्टर व चार्टर विमाने बुक केली आहेत. यात राज्यातील २०, तर दिल्लीतील २० हेलिकॉप्टर व चार्टर विमानांचा समावेश आहे.
प्रतितासाचे भाडे अडीच लाख ते सहा लाख रुपये इतका असणार आहे. १८ नोव्हेंबरला सायंकाळी प्रचाराची आचारसंहिता संपेल. या काळात ४० हेलिकॉप्टर व विमानांच्या माध्यमातून राज्यात चार ते साडेचार हजार वेळा उड्डाण होणार आहे, तर यातून सुमारे ४०० कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे.