परतूर: परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. भव्य पदयात्रा, प्रवेश सोहळे, मतदारांच्या गाठीभेटी यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र आहे.
परतूर - मंठा विधानसभेची ही जागा अनेक टर्मपासून काँग्रेसला सुटली आहे. पण दिवंगत कदीरबापू देशमुख यांच्या नंतर या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले नाही.
मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या पंचवीस हजारांच्या मताधिक्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच मतदारसंघात जरांगे फॅक्टर व मतदारांची असलेली भाजप पक्षावरची नाराजी याचा फायदा घेऊन काँग्रेसची उमेदवारी मिळवणे व निवडून येणे अशी गणिते संभाव्य उमेदवाराकडून लावली जात आहेत.
माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी मागील काही दिवसांपूर्वी भाजपच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी, कोकटे हदगाव सर्कलमधील येथील बाजार समितीचे माजी सभापती सिद्धू सोळंके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेत भाजपच्या गटात चांगलीच घबराट निर्माण केली आहे.
त्या पाठोपाठ काँग्रेसचे कल्याण बोराडे यांनी ट्रॅक्टर मोर्चा, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करीत आपणही दावेदार असल्याचे दाखवून दिले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परतूरचे संचालक व यश ग्रुप सतोनाचे अध्यक्ष बालासाहेब आकात यांनी दोन्ही तालुक्यात परिवर्तन यात्रा काढत आपली ताकद दाखवून दिली आहे. विधान परिषदेचे आ.राजेश राठोड व युवक काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲण्ड अन्वर देशमुख यांची साथ असल्याने आकात यांना दोन्ही तालुक्यांत मोठे बळ मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसही स्पर्धेत
महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही या स्पर्धेत कुठेच कमी दिसत नाही. या पक्षाकडून युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनीही काँग्रेसचा होणार सततचा पराभव हे कारण सांगत वरिष्ठांना ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी विनंती केली आहे. त्यांनीही मतदार गाठीभेटी, सर्कल मेळावे घेऊन कामाला जोरदार सुरवात केली आहे.
#ElectionWithSakal
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.