कोल्हापुरातील 'या' मतदारसंघांत प्रतिष्ठेच्या लढती, महाडिक-पाटीलच पुन्हा आमनेसामने; कागल, इचलकरंजी, चंदगडमध्ये काय स्थिती?

Kolhapur Assembly Elections : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Kolhapur Assembly Elections
Kolhapur Assembly Electionsesakal
Updated on
Summary

काँग्रेसकडून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे रिंगणात असतील, तर भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार अमल महाडिक, तसेच ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत आहे.

रणधुमाळी सुरू... विधानसभा निवडणुकीची मंगळवारी (ता.१५) घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार, छुपे रूस्तम कोण, याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या सद्य:स्थितीचा घेतलेला आढावा.

महाडिक-पाटीलच पुन्हा आमनेसामने

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात सामना रंगणार असला तरी खरी लढत ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेराव महाडिक या पारंपरिक विरोधकांतच होणार आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे ही आमदार ऋतुराज पाटील यांची जमेची बाजू आहे, तर विविध योजनांचे लाभार्थी ही महाडिक गटाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. सध्या तरी या मतदारसंघात प्रचंड चुरस असून, दोघांनाही विजयाची समान संधी असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वच विधानसभा मतदारसंघातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल. #ElectionWithSakal

काँग्रेसकडून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे रिंगणात असतील, तर भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार अमल महाडिक, तसेच ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. या मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही मतदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी मिळवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला सहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे वरकरणी जरी हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने वाटत असला तरी प्रत्यक्षात समान संधी दिसते.

ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्‍न पूर्णपणे संपलेले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या मतांनी हार पत्करावी लागली होती; मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला येथे चांगली मते मिळाली. भाजपनेही गेल्या दोन वर्षांत या मतदारसंघात बांधणी केली आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ लढत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात काही अपक्षांनीही ‘भावी आमदार’ असे फलक लावून दंड थोपडले आहेत; मात्र ते प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार का? हे पाहावे लागेल. सध्यातरी येथे दुरंगी लढत असल्याचे दिसून येते. २०१९ मधील लोकसभेतील व त्यानंतरच्या ‘गोकुळ’मधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी महाडिक साधणार की, पाटील गट पुन्हा बाजी मारणार याची उत्सुकता असेल.

प्रभावशाली मुद्दे

  • भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष तुल्यबळ

  • राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी भाजपची जमेची बाजू

  • मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे

  • अमल आणि शौमिका महाडिक यांची स्वच्छ प्रतिमा

  • ऋतुराज पाटील यांचा जनसंपर्क ही काँग्रेसची जमेची बाजू

Kolhapur Assembly Elections
अर्ज भरण्यासाठी 24 ऑक्टोबरलाच झुंबड; गुरुपुष्यामृतचा साधणार मुहूर्त, सातपैकी सहा दिवस भरता येणार अर्ज

उमेदवार कोण यावरच ठरणार विजय

कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत कुरघोडी येथे महत्त्‍वाचा मुद्दा ठरणार आहे. यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे ‘दक्षिण’ भाजपला, तर ‘उत्तर’ शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. ‘शिवसेना’ विरुद्ध ‘कॉँग्रेस’ अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे. येथे विजय कोणाचा यापेक्षा पाडायचे कोणाला हे ठरणार आहे. यासाठी उमेदवार कोण यावर पुढील राजकरण वळण घेणार आहे.

२०१४ ला काँग्रेसचे उमेदवार म्हणून, तर २०२२ मधील पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित कदम यांनी नशीब अजमावले, तरीही त्यांना विजय खेचता आला नाही. आता मात्र त्यांनी सवतासुभा मांडल्याचे गणेश विसर्जन मिरवणुकीत दिसून आले. अशा स्थितीतच खासदार पुत्र कृष्णराज धनंजय महाडिक यांनीही खडा टाकून पाहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपणच हक्कदार असल्याचे जाहीर केले आहे. पोट निवडणुकीतच ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचे आश्‍वासन भाजप नेत्यांनी दिल्याचे ते सांगतात. त्याअनुषंगाने त्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजप कोणती भूमिका घेणार यावरच त्यांची उमेदवारी आणि विजय ठरणार आहे.

महाविकास आघाडीत कॉँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्या दावेदार आहेत. मात्र, पोटनिवडणुकीची परिस्थिती आज नाही. त्यामुळे कॉँग्रेसचा उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐनवेळी ‘सरप्राईज’ चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील ‘उत्तर’मधून इच्छुक असल्याच्या चर्चा असल्या, तरी त्यांच्या विधान परिषदेचा कालावधी अजून शिल्लक आहे. स्वतः उमेदवार राहिले, तर जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात ते प्रचाराला जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला जाईल. कसबा बावडा त्यांच्या मागे असल्याची मोठी जमेची बाजू आहे.

मात्र, समोरील उमेदवार क्षीरसागर असतील, तर त्यांना शह देण्यासाठी त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव पुढे येऊ शकते. मात्र, त्याला त्यांनीच नकार दिल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गटातील काहींनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पोट निवडणुकीतच ‘उत्तर’ शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाल्याचे नेते सांगतात. त्यांना उमेदवारी डावलली, तर आघाडीत ते कॉँग्रेसला किती सहकार्य करणार, याचाही कॉँग्रेसच्या मतावर परिणाम होऊ शकतो.

प्रभावशाली मुद्दे

  • अंतर्गत वादाचे परिणाम कोणाच्या पथ्यावर

  • शिवसेना ठाकरे गटातूनही इच्छुक उमेदवार

  • कॉँग्रेसचा उमेदवार कोण, यावर पुढील राजकरण

  • उमेदवार ठरविणेच ठरणार जिकिरीचे

  • महायुतीत भाजपकडे नजरा

Kolhapur Assembly Elections
Ratnagiri Elections : महायुतीत नाराजी, तर महाविकास आघाडीत आलबेल; अंतर्गत धुसफुशीचे आव्हान, भाजपमध्ये खदखद

ॲड. मंडलिक यांच्या एंट्रीने नव्याने ट्विस्ट

म्हाकवे : कागल विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीकडून समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये काटाजोड लढत होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, शेंडूर येथे शिंदे गट शिवसेनेचे माजी खासदार पुत्र ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी थेट महायुतीकडून उमेदवारीच मागितल्याने लढतीने नवा ट्विस्ट घेतला आहे.

हसन मुश्रीफ यांचा विकासकामांचा सपाटा आणि संपर्क असूनदेखील प्रत्येक निवडणुकीत त्यांच्याच मतदारसंघात ते अडकून पडतात. त्या स्थितीत अजूनही फारसा फरक दिसत नाही. मात्र, संजय घाटगे यांनी त्यांना दिलेला जाहीर पाठिंबा हे दिलासादायक आहे. जिल्हा परिषद, गोकुळ आणि आताच्या लोकसभेत झालेल्या पराभवातून नाराज असणाऱ्या संजय मंडलिक गटाचा संताप व्यक्त होताना दिसत आहे.‌ ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी शेंडूर येथे झालेल्या मेळाव्यात थेट महायुतीतून उमेदवारीची मागणी केली. ते लढले तर कोणाला लाभ होणार आणि नाही लढले, तर कोणाला पाठिंबा मिळणार यावर मतमतांतरे आहेत.

मेळाव्यात मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका होऊनही दोन्ही बाजूंनी त्यावर प्रतिक्रिया नाही. ॲड. मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील १०० गावांत डिजिटल फलक लावून थेट मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हसन मुश्रीफ यांची मतदारसंघावर पकड आहे, मात्र मंडलिक गटाच्या मतांना वगळणे त्यांना परवडणारे नक्कीच नाही. त्यामुळे त्यांची चाल कशी असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. भाजपचे नेते असलेल्या धनंजय महाडिक यांच्या युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनीही मुश्रीफांच्या कारभारावर आरोप हा देखील त्यांना धक्काच आहे.

गेल्या पाच वर्षांपासून समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेशी सततचा संपर्क ठेवला आहे. मुश्रीफांच्या विरोधातील धार त्यांनी अजिबात कमी केलेली नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांनी टीकाटिप्पणी ऐवजी कागल विधानसभा मतदारसंघातील विकासकामाचे व्हीजन त्यांनी जनतेसमोर मांडले आहे. मुश्रीफांच्या विरोधात त्यांनी तोडीस-तोड आव्हान उभे केले आहे. शरद पवार, सतेज पाटील, समरजितसिंह यांच्यासाठी जोडण्या कशा लावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव कसा राहणार, यावर विधानसभेच्या निकालाची दिशा ठरेल.

प्रभावशाली मुद्दे

  • ॲड. वीरेंद्र मंडलिक यांची उमेदवारी

  • गेल्या पाच वर्षांपासून समरजितसिंह घाटगे यांचा सततचा संपर्क

  • शरद पवार, सतेज पाटील समरजितसिंह यांच्यासाठी जमेची बाजू

  • मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री मुश्रीफ यांच्यासाठी जमेची बाजू

  • विकासकामे, सततच्या संपर्कातून मुश्रीफ नेहमी जनतेत

Kolhapur Assembly Elections
Satara : आठही मतदारसंघांत राजकीय घमासान; विद्यमान आमदारच उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, 'या' नेत्यांत थेट लढत

लढत दुरंगी, तरी इच्छुक वाढले

इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीत सध्या महायुतीकडून भाजपतर्फे राहुल आवाडे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मदन कारंडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे. त्यामुळे सध्या तरी दुरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरीची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडींमध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर चुरशीच्या लढतीची शक्यता असल्यामुळे स्थानिक पातळीवर मँचेस्टर आघाडीसह लहान-मोठ्या पक्षांना अधिक महत्त्व येण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात गेल्या तीन लढती आमदार प्रकाश आवाडे विरुद्ध माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात झाल्या. आता मात्र आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने चित्र बदलले आहे. महायुतीतर्फे राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे. तर हाळवणकर यांच्या उमेदवारीची शक्यता धूसर आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील मूळ भाजप गट आणि आवाडे यांच्यात मनोमिलन न झाल्यास निवडणुकीत आवाडे यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने इच्छुक आहेत. परिणामी, त्यांची बंडखोरी महायुतीसाठी मोठे डोकेदुखी ठरू शकते.

तर तिसरा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून बालाजी उद्योग समूहाचे मदन कारंडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे; पण आवाडे यांनी रामराम केल्यानंतर काँग्रेसचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसनेही हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काँग्रेसकडून शहराध्यक्ष संजय कांबळे हे इच्छुक आहेत. सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील मँचेस्टर आघाडी सध्या महाविकास आघाडीमध्ये असली तरी त्यांची भूमिका पुढे कायम राहणार काय, हे पहावे लागणार आहे. गतवेळी चाळके गटाने आवाडे यांचा प्रचार केला होता. तर मदन कारंडे यांनीही गत निवडणुकीत आवाडे यांना पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र ते आवाडे यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवार आहेत.

प्रभावशाली मुद्दे

  • आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने चित्र बदलले

  • हाळवणकर-आवाडेंतील मनोमिलन

  • माकप यांच्यासह मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

  • शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख इच्छुक

  • काँग्रेसचा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न

Kolhapur Assembly Elections
'विधानसभा निवडणुकीत महायुती 170 पेक्षा जास्त जागा जिंकणार'; साईदर्शनानंतर रामदास आठवलेंना विश्वास

महायुतीचे ठरले, ‘मविआ’ची चाचपणी

चंदगड : चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील, भाजपचे शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) डॉ. नंदिनी बाभूळकर व अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी एक महिन्यापासून प्रचार सभांचा धडाका लावला आहे. सभांवर होणारा खर्च आणि एकूण प्रचार मोहीम यातून पक्षाकडून किंवा अपक्ष आपण निवडणुकीच्या रिंगणात असणारच असा संदेश दिला जात आहे. कोण कोणाच्या पथ्यावर पडणार आणि लाभ-तोटा होणार हे येणाऱ्या काळात निश्‍चित होईल. या मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केल्यामुळे महायुतीतून त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते.

मात्र, याच महायुतीचा घटक असलेल्या भाजपचे चंदगड विधानसभा निवडणुक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनीही कंबर कसली आहे. नुकताच चंदगड येथे भव्य मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहोचवला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीरपणे त्यांच्या उमेदवारीला पाठबळ देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त करून महायुतीच्या नेत्यांनी इच्छुकांना आवार घालण्याची मागणी केली. मात्र, शिवाजीराव पाटील यांची एकूण व्यूहनीती पाहता ते लढणारच हे निश्‍चित आहे. महाविकास आघाडीची इथली जागा शरद पवार गटाला गेली आहे. त्यांच्या पक्षाकडून डॉ. नंदिनी बाभूळकर इच्छुक आहेत. दोन महिन्यांपासून त्यांनी संपर्क मोहीम राबवली आहे. विभागवार मेळावे घेऊन त्या मतदारांना आवाहन करीत आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसचा गट ही जागा आपल्या पक्षाला मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. अजूनही महाविकास आघाडीने इथला उमेदवार कोण हे स्पष्ट केले नसल्याने मतदारांत संभ्रम आहे.

अथर्व इंटरट्रेड कंपनीच्या माध्यमातून दौलत कारखाना चालवायला घेतलेले मानसिंग खोराटे यांनीही मतदारसंघात रान उठवले आहे. कारखान्याचे कामगार तसेच मतदारसंघातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवत ते गावोगावी संपर्क सभा घेत आहेत. कारखाना चालवत असताना राजकीय नेत्यांनी अडचणी आणल्यामुळे स्वतःची राजकीय ताकद असावी, हा हेतू ठेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सद्य:स्थितीत इच्छुकांची संख्या चारवर असून, ती वाढते की कमी होते हे पाहावे लागेल.

प्रभावशाली मुद्दे

  • सद्य:स्थितीत इच्छुकांची संख्या चारवर

  • राजेश पाटील यांना महायुतीतून उमेदवारी निश्‍चित

  • भाजपच्या शिवाजीराव पाटील यांनी कसली कंबर

  • मानसिंग खोराटे यांच्याकडून गावोगावी संपर्क सभा

  • शरद पवार गटाकडून डॉ. नंदिनी बाभूळकर इच्छुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.