पारनेर: अहमदनगर दक्षिणच्या खासदारपदी माजी आमदार नीलेश लंके यांचा विजय झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील विधानसभेची गणिते मात्र बदलली आहेत. निवडणुकी दरम्यान अनेक नेतेमंडळींना आमदारपदाची स्वप्न पडू लागली होती. त्यातील अनेकांनी तयारीला सुरवात केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी मोठी भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे.
तालुक्यात विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे होती. त्यामुळे त्याच पक्षाला विधानसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर माजी आमदार लंके अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र आता ते शरद पवार गटाकडे आल्याने ही जागा शरद पवार गटाकडे राहील अशी चिन्ह आहेत. महायुती व महाविकास आघाडी निवडणुकीत राहिली, तर या जागेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होईल हे निश्चित आहे.
नगर दक्षिणचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा लंके यांनी पराभव केला. लंके नगर दक्षिणचे खासदार झाल्याने तालुक्याचे राजकारण बदलले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची गणिते बदलली आहेत. लंके यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षातर्फे त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद माजी सदस्या राणी लंके या सर्वाधिक दावेदार आहेत. लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भावी आमदार म्हणून राणी लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
अनेक कार्यक्रमांमधून व सोशल मीडियावरही भावी आमदार अशी उपाधी जोडली जात आहे. त्यांच्या वाढदिवसावेळी ही त्यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केला गेला. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे राणी लंके याच विधानसभेच्या मुख्य दावेदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रशांत गायकवाड हेही पक्षाने उमेदवारी दिली तर इच्छुक आहेत. शिवाय शिवसेना शिंदे गटाचे विकास रोहकले पक्षाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे तेही उमेदवारी करू शकतात.
तालुक्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपकडे आहे. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी सभापती काशिनाथ दाते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, माजी अध्यक्ष सुनील थोरात, युवा नेते विजय सदाशिव औटी आदी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षातून बडतर्फ केलेले तालुक्याचे माजी आमदार विजय भास्कर औटी पुन्हा रिंगणात उतरू शकतात. त्यांच्या सोबत असलेले व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी तालुका भर भगवा सप्ताह निमित्ताने संपर्क सुरू केला आहे. या अगोदरही आरोग्य शिबिरे घेतली आहेत. त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.