मुंबई: महाविकास आघाडीने आघाडीने (मविआ) आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना महिला, युवक, शेतकरी आणि कामगारांवर आश्वासनांची अक्षरशः बरसात केली. महिलांना दरमहा तीन हजार रुपयांचे मानधन देण्याबरोबर त्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली. बीकेसी येथे पार पडलेल्या संयुक्त प्रचारसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तोफ धडाडली. राज्यघटना, शेतकऱ्यांचे प्रश्न, गुजरातला पळविले जाणारे उद्योग आणि राज्याची विद्यमान आर्थिक परिस्थिती आदी मुद्द्यांवरून प्रमुख नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.