Sawantwadi Assembly Election 2024 : भाजपचा ‘नो कॉम्प्रमाईज’ पवित्रा सिंधुदुर्गमध्ये

Sawantwadi vidhan sabha Election 2024 : सिंधुदुर्गात महायुतीच्या जागावाटपाबाबत भाजपच्या ‘हाय कमांड’ने निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागांबाबत ‘नो कॉम्प्रमाईज’ पवित्रा घेतला आहे.
Sawantwadi Assembly Election 2024
Sawantwadi Assembly Election 2024sakal
Updated on

सावंतवाडी: सिंधुदुर्गात महायुतीच्या जागावाटपाबाबत भाजपच्या ‘हाय कमांड’ने निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागांबाबत ‘नो कॉम्प्रमाईज’ पवित्रा घेतला आहे. यात सावंतवाडीची जागा शिंदे शिवसेनेला देत कुडाळमधील उमेदवारीवर दावा करण्याचे धोरण आखल्याची चर्चा आहे. या जागेसाठी राज्यातील इतर ठिकाणच्या जागांवर समझोता होऊ शकतो.

याच्याच जोडीने संभाव्य बंडखोरी थोपवण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ही अमलात आणला जात असल्याने गेल्या आठवडाभरात याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर दिसू लागले आहेत.

निवडणुकीची चाहूल लागताच महायुतीतील अंतर्गत घमासान चव्हाट्यावर आले होते. विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. सुरुवातीला विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता.

या पाठोपाठ भाजपमधील अन्य इच्छुक युवा नेते विशाल परब यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. माजी नगराध्यक्ष संजू परब हेही भाजपतर्फे स्पर्धेत आहेत. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांवर भाजपच्या वरिष्ठांकडून फारशा प्रतिक्रिया उमटल्या नव्हत्या; मात्र आता भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून सिंधुदुर्गातील तिन्ही जागांबाबत संभाव्य बंडखोरी टाळण्याबरोबरच निवडून येणाऱ्या उमेदवाराबाबत ‘नो कॉम्प्रमाईज’ धोरण ठरल्याचे समजते.

महायुतीला पुन्हा सत्तेत येणे तितकेसे सोपे नसल्याचे लक्षात आले आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात भाजपला तितकीशी पोषक स्थिती नाही; मात्र, लोकसभेत कोकणाने त्यांना दमदार साथ दिली. त्यामुळे कोकणातील जागांबाबत भाजपकडून विशेष धोरण ठरले आहे. येथे निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागांबाबत कोणताच नवा प्रयोग करून रिस्क न घेण्याचे धोरण ठरले आहे. यात कमीतकमी बंडखोरी आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागा कमळ चिन्हावर लढवण्याचा फार्म्युला निश्‍चित करण्यात आला आहे.

सध्या सावंतवाडीतील जागेवर महायुतीतील शिंदे गट आणि भाजप अशा दोघांचाही दावा आहे. भाजपकडे राजन तेली, संजू परब आणि विशाल परब असे तिघे इच्छुक आहेत; मात्र या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास इतर दोघांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे केसरकर हे शिंदे गटातील वजनदार आणि मतदारसंघावर प्रभाव टाकणारे नेते आहेत. त्यामुळे तूर्ततरी येथे भाजपसाठी हट्टाने जागा मिळवून नवा प्रयोग न करण्याचे धोरण ठरल्याचे समजते.

कणकवली विधानसभेबाबत महायुतीत कोणतेच दुमत नाही. महायुतीच्या जागावाटप फॉर्म्युल्याप्रमाणे ही जागा भाजपकडे असून विद्यमान आमदार नीतेश राणे यांना येथून तिकिटासाठी दुसऱ्या कोणाचीच स्पर्धा नाही. कुडाळमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा आहे. येथे भाजपतर्फे माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी गेली काही वर्षे संघटनात्मक बांधणी केली आहे; मात्र भाजपच्या धोरणाचा विचार करता एकाच कुटुंबातील नीतेश राणे आणि नीलेश राणे यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्याच आठवड्यात खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली.

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिंदे गटाला मिळणारी आहे; मात्र त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. गेल्या विधानसभेवेळी राणेंचा तांत्रिकदृष्ट्या भाजप प्रवेश झाला नव्हता; मात्र नीतेश राणेंना काँग्रेसमधून भाजपमध्ये घेत कणकवलीतून कमळ चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती. याचा विचार करता ही जागा शिंदे गटाला सुटल्यास तोच फॉर्म्युला वापरून नीलेश राणेंना कुडाळची उमेदवारी मिळू शकते. तसे झाल्यास एकाच कुटुंबातील दोघांना भाजपमधून उमेदवारी देण्याबाबतचाही प्रश्‍न येणार नाही.

ही शक्यता असली तरी भाजपकडून कुडाळची जागाही महायुतीच्या जागावाटपात कमळ चिन्हावर लढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी कोकणातील पालघर आणि राजापूर येथील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांबाबत समझोता होण्याची शक्यता आहे. राजापूरची जागा भाजपच्या यादीत आहे. तेथून शिंदे शिवसेनेतर्फे किरण सामंत इच्छुक आहेत. त्या जागांबाबत तडजोड करून कुडाळ भाजपला सोडावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. अर्थात ही जागा भाजपला सुटली तरी त्यांच्याकडे नीलेश राणे हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भातही भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात खल सुरू झाला आहे.

बंडखोरी थोपवण्यासाठी पोहोचले ‘निरोप’

महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असून दावेदारही प्रबळ आहे. त्यामुळे बंडखोरी झाल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो. यामुळे बंडखोरी रोखण्याचे धोरण आतापासूनच अमलात आणायला सुरुवात झाली आहे. यासाठी ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे, अशांना वरिष्ठांकडून ‘निरोप’ पोहोचले आहेत. संबंधितांना उमेदवारी कोणालाही मिळाली तरी महायुतीचेच काम करायचे आहे, असा संदेश दिला गेला आहे. याचाच भाग म्हणून महायुतीतील एकमेकांवर टीका करणाऱ्यांच्या वक्तव्याची धार बोथट झाली आहे. अंतर्गत गटातून आरोप-प्रत्यारोप करणारे स्थानिक पातळीवरील नेते अनपेक्षितरीत्या प्रतिस्पर्ध्यांच्या भेटीगाठी घेऊ लागल्याचे चित्र आहे.

तगडे इच्छुक पर्यायाच्या चाचपणीत

जिल्ह्यातील काही बडे नेते विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर पर्यायाच्या दिशेने निघाल्याचे चित्र आहे. यात महायुतीतील काहींचा समावेश आहे. तिन्ही मतदारसंघात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये अशी तिकीट मिळण्याची शक्यता मावळत चालल्याने नाराज असलेल्यांची संख्या तुलनेत जास्त आहे. त्यातील काहींनी पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. यात काही बड्या नावांचाही समावेश आहे. प्रामुख्याने ठाकरे शिवसेनेच्या पर्यायाकडे अशा इच्छुकांनी ‘फोकस’ केल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.