महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले, ज्यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय नोंदवला. महायुतीला तब्बल २३२ जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला फक्त ४१ जागांवर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पक्षाने १३२ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला ५७ जागा आणि अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. या विजयाने महायुतीने महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली असून, आता महायुतीचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आहे.