Nitesh Rane
Nitesh Raneesakal

Nitesh Rane: नितेश राणेंच्या प्रक्षोभक विधानांना लागणार लगाम? राष्ट्रवादीची फडणवीसांकडं कडक कारवाईबाबत तक्रार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुविकरणाच्या प्रयत्नांना आता लगाम लागण्याची शक्यता आहे.
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे हे सध्या विविध व्यासपीठांवर थेट मुस्लिमविरोधी भूमिका घेऊन प्रक्षोभक विधान करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुविकरणाच्या त्यांच्या प्रयत्नांना आता लगाम लागण्याची शक्यता आहे. कारण खुद्द महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नितेश राणेंविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सविस्तर पत्राद्वारे तक्रार केली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं यासंदर्भात पत्राद्वारे तक्रार करुन कडक कारवाईची विनंती केली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की, महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ स्वतःचं राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्यानं मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत सातत्यानं वादग्रस्त विधानं करत आहेत. यामुळं मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे.

याबाबत नितेश राणे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे. असं असताना देखील ते पुन्हा तशाच स्वरुपाची विधानं करत आहेत. यामुळं दोन्ही समाजात धार्मित तेढ निर्माण होईल अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात यावेत.

तसंच भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशा शब्दांत पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नितेश राणे यांच्यावर कारवाईबाबत भूमिका मांडली आहे.