Malkapur Assembly Elections 2024: सगळेच अधांतरी, तरीही अनेक नेत्यांनी चालविली तयारी; विधानसभेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू..

Malkapur Vidhan Sabha Elections 2024: राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात पाऊल टाकले असून ग्रामीण भाग पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
Malkapur Vidhan Sabha Elections 2024
Malkapur Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

नांदुरा: थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात पाऊल टाकले असून ग्रामीण भाग पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

मात्र कोणत्याच राजकीय पक्षाकडून अधिकृत ग्रीन सिग्नल अजून कुणालाच मिळाला नसल्याने सगळे अधांतरी असले तरी त्या त्या पक्षातील इच्छुक असलेल्या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची जोरदार तयारी करत मोर्चेबांधणीवर भर दिल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आपली सावध भूमिका बजावत आहेत.

तसेही मलकापूर मतदारसंघात पारंपारिक भारतीय जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्येच सामना रंगणार असला तरी महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपल्या पक्षाच्या दावेदारीसाठी पण दडपण म्हणून मतदारसंघात प्रयत्नशील राहतील यात शंका नाही.

मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीपासून भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या बालेकिल्ल्याला मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सुरुंग लावत हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला आहे. या मतदारसंघात पाच वेळा नेतृत्व केलेले भाजपाचे चैनसुख संचेती हे षटकार मारण्याच्या तयारीत असताना मागील सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेश एकडे यांच्याकरवी ते झेलबाद (पराभूत) झाले.

सध्या काँग्रेसचे राजेश एकडे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असून काँग्रेसच्या गोटात इच्छुक उमेदवारीसाठी इतरही नावे चर्चेत येऊ लागली आहेत. तीच परिस्थिती भाजपाची झाली असल्याने युती व आघाडीच्या या वाढलेल्या इच्छुकांच्या गर्दीत त्या दोघांतील घटक पक्ष पण आपली दावेदारी करण्याची संधी सोडणार नाहीत असे दिसून येत आहे. सध्या तरी कोणत्याच राजकीय पक्षाकडून अजून तरी या मतदारसंघात फिक्स असा कुणालाही उमेदवारीचा ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने सगळेच अधांतरी असताना 'उमेदवारीचे सांगता येत नाही' म्हणून त्या त्या नेत्यांनी जोरदार तयारी मतदारसंघात सुरू केली असून ग्रामीण भाग पिंजून तशी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे त्या त्या पक्षांचे कार्यकर्ते या इच्छुक उमेदवारांच्या वाढलेल्या थोड्याफार गर्दीमुळे संभ्रमात असून पक्ष उमेदवारी देईल त्याचेसोबत राहण्याचा त्यांचा पवित्रा असणार आहे.

काँग्रेस व भाजपातच रंगणार चुरस, शिवसेनाही दावेदारीत

महाराष्ट्रातील जागावाटपाच्या वाटाघाटीनंतर महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्यानंतर खरे चित्र येथे स्पष्ट होणार असले तरी पारंपारिक काँग्रेस व भाजपात येथे चुरशीची लढत होणे अपेक्षित आहे. तसेही दोन्ही शिवसेनेचे पाठबळ या मतदारसंघात बऱ्यापैकी आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष डिवरे शिवसेनेसाठी महायुतीकडून प्रमुख दावेदारी करू शकतात. कारण सध्या या मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांचा आपसी संघर्ष शिगेला पोहचला असल्याने दोन गटात भाजपा विखुरल्या गेल्याचा फायदा शिवसेना शिंदे गट उचलण्याच्या तयारीत असणार आहे.

या नेत्यांच्या नावाची चर्चा

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्या नावासोबतच ॲड. हरीश रावळ, रशीदखाँ जमादार, डॉ. अरविंद कोलते तर भाजपातर्फे शिवचंद्र तायडे, चैनसुख संचेती, उमाताई तायडे, पराग सराफ, गणेश भोपळे सोबतच शिवसेना शिंदे गटाकडून संतोष डिवरे आदींचे नावे चर्चिली जात आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.