Sangli Assembly Election 2024 Results : सांगली विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साजरी करून भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ हेच सांगलीचे ‘दादा’ ठरले आहेत. अत्यंत चुरशीची ईर्षेने होणारी ही लढत आमदार सुधीर गाडगीळ यांनी एकतर्फी जिंकून सर्वांना धक्का दिला. त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा ३६ हजार १३५ मतांनी पराभव केला. आमदार सुधीर गाडगीळ यांना १,१२,४९८, पृथ्वीराज पाटील यांना ७६,३६३, तर जयश्री पाटील यांना ३२,७३६ मते मिळाली.
सांगली विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना अपेक्षित होता. मात्र, त्यात ट्विस्ट आला तो काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांच्या बंडखोरीने. काँग्रेसमधील दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजे भाजपचा फायदा होईल, अशा चर्चेनेच या निवडणुकीची सुरवात झाली. आमदार सुधीर गाडगीळ यांनी मी लढणार नाही, असे जाहीर केले होते, मात्र भाजपने त्यांनाच पसंती दिली.