सिल्लोड: बासष्ट वर्षांपूर्वी सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील काही गावे मतदारसंघाशी जोडली गेली. मतदारसंघाची रचना बघितल्यास सिल्लोड तालुक्यातील १३१ गावे, तर सोयगाव तालुक्यातील ४९ गावे या मतदारसंघात आहेत. हिंदूबहुल मतदारसंघ असल्याने अपवाद वगळता हा मतदारसंघ भाजप व शिवसेनेच्या ताब्यात राहिला. मतदारसंघात सिल्लोड नगर परिषद व सोयगाव नगरपंचायत आहे. जिल्हा परिषदेचे सिल्लोड तालुक्यातील आठ गट व सोयगाव तालुक्यातील दोन गटांचा यामध्ये समावेश आहे.
सिल्लोड तालुक्यात पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू असताना सोयगाव तालुक्यात मात्र पायाभूत सुविधांची अद्यापही वानवाच आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सातत्याने सुरूच असताना रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याची ओरड नेहमीच होते. आता विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (उबाठा) अशी लढत होत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. यात ४०६ मतदान केंद्रे असून, यामध्ये सिल्लोड शहरात ५८ केंद्रे, सिल्लोड ग्रामीणमध्ये २८०, तर सोयगाव शहरात आठ, सोयगाव ग्रामीणमध्ये ६० मतदान केंद्रे विधानसभा कार्यक्षेत्रात येतात.