Chiplun Assembly Election 2024 : काँग्रेस संपली म्हणता मग मित्रपक्ष कसले
चिपळूण : महाविकास आघाडीची रचना त्रिदेवाप्रमाणे करण्यात आली आहे. या तीन भावडांप्रमाणे एकत्रित राहून विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे ठरले आहे. त्यात लहान-मोठा कोणी असला तरी त्यात एकमेकांना सांभाळून घेण्याची गरज असताना काँग्रस संपली असे म्हटले जात असेल तर तुम्ही मित्रपक्ष कसले?
कालच्या बैठकीला आपण उपस्थित असतो तर हे आरोप सहन केले नसते. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना काँग्रेस काय आहे हे विधानसभाच नव्हे तर आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पाहायला मिळेल, असा इशारा काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आढावा बैठकीत दिला.
चिपळूण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराबाबतचा आढावा घेण्यासाठी येथील हॉटेल अभिरूचीच्या सभागृहात काँग्रेसची स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बेटकर यांनी आमदार भास्कर जाधव यांचे नाव न घेता त्यांच्या खेर्डी येथील जाहीर सभेतील वक्तव्यावरून जोरदार समाचार घेतला.
ते म्हणाले की, महाविकास आघाडी एकदिलाने विधानसभा निवडणुकीचे कामकाज करत आहे. प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करत आहे. रात्रंदिवस देहभान विसरून महाविकास आघाडीच्या विजयासाठी ते काम करत आहेत.
असे असताना काँग्रेसचे अस्तित्व काय? काँग्रेस संपली, अशा वल्गना मित्रपक्षाकडून केल्या जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. काँग्रेसचा इतिहास फार जुना असून, या पक्षाचा मतदार पारंपरिक व जुना आहे. तेव्हा अशा पक्षाला जागे कराल तर जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बेटकर यांनी सुनावले.
तालुकाध्यक्ष लियाकत शाह म्हणाले, संपूर्ण मतदार संघात प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने प्रचारात सामील झाला आहे. या वेळी संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता पारकर, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, रफीक मोडक, सेवादल जिल्हाध्यक्ष टी. डी. पवार, यशवंत फके, महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.