Maharashtra Assembly Election: विधान सभेच्या निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. यातच राजकीय चर्चांनाही वेग येऊ लागला आहे. एकेकाळी वसईवर काँग्रेसचे राज्य होते. २९ वर्षांपूर्वी ते राज्य खालसा झाले असून , त्यावेळचा युवा आमदार हितेंद्र ठाकूर हे वसईचे काँग्रेसचे शेवटचे आमदार ठरले होते. त्यानंतर गेल्या २९ वर्षात काँग्रेसला हि जागा जिंकता आलेली नाही.
स्वातंत्र्या नंतर वसई मध्ये सातत्याने काँग्रेसचे राज्य राहिले होते. अण्णा साहेब वर्तक, भाऊसाहेब वर्तक आणि तारामाई वर्तक यांनी वसई विधानसभेचे नेतृत्व केले होते. पुलोदच्या काळात जनता दलाच्या पंढरीनाथ चौधरी यांनी तारामाई वर्तक यांचा प्रभाव केला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत तारामाई वर्तक यांनी साथी पंढरीनाथ चौधरी यांचा प्रभाव करून पुन्हा वसई मध्ये काँग्रेस जिवंत केली होती . परंतु त्यांचे राज्य पुढच्या निवडणुकीत जनतादलाचे डॉमनिक घोन्साल्वीस यांनी खालसा केले. १९९० च्या निवडणुकीत त्यावेळचा युवक काँग्रेस चा अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी डॉमनिक घोन्साल्वीस यांचा पराभव केला होता.
मध्यतरीच्या काळात हितेंद्र ठाकूर यांच्यावर टाडा लागल्याने त्यांना काँग्रेस मधून काढुन टाकण्यात आले होते. पण हि चूक काँग्रेसला चांगलीच महागात पडली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर असलेले युवा नेते आणि जेष्ठांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला १९९५ च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर अपक्ष म्हणून निवडून आले.
हितेंद्र ठाकूर २००९ च्या निवडणुकीत उभे राहिले नसल्याने त्यावेळी विवेक पंडित हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आमदार झाले होते. परंतु २०१४ च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी विवेक पंडितांचा पराभव केला आणि ते पुन्हा बहुजन विकास आघाडी तर्फे आमदार झाले. २००९ चा अपवाद सोडल्यास दुसऱ्या पक्षाला याठिकाणी आपले खाते उघडता आले नाही. तसेच गेल्या २९ वर्षात काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. त्याच बरोबर २००९ मध्ये नव्याने तयार झालेल्या नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदार संघातही काँग्रेसला यश मिळाले नाही.