वाशिम विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी सामना पाहायला मिळाला. भाजप, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी तसेच बंडखोर उमेदवारांमुळे या मतदारसंघात चुरस अधिक वाढली होती. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार लखन मलिक यांना डावलून श्याम खोडे यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, महाविकास आघाडीने शिवसेनेच्या डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीनेही नवा चेहरा, मेघा डोंगरे यांना रिंगणात उतरवले होते.
या लढाईत भाजपचे श्याम खोडे १९ हजार ८७४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख २२ हजार ९१४ मते मिळाली. तर ठाकरे गटाचे सिद्धार्थ देवळे यांना १०३०४० मते मिळाली. देवळे यांचा १९ हजार ८७४ मतांनी पराभव झाला.