Manipur Election results 2022 : विधानसभा निवडणुकीत मणिपूरमध्ये ३१ जागांवर आघाडी घेत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या ३१ जागांचं गणित भाजप जुळवून आणेल आणि मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होईल, असं चित्र सध्या दिसतंय.
सर्वसामान्य आणि वंचित घटकांतील मुलींना शिक्षणात आर्थिक पाठबळ, AIIMS आणि कौशल्य विद्यापीठ सारख्या तरतुदी , शेतकरी आणि मच्छीमारांसाठीच्या भरगोस आर्थिक मदत देणाऱ्या योजना, महिलांना गॅस आणि इतर आश्वासने, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजना आणि तरतुदींची आश्वासने देत भाजपने पुन्हा एकदा मणिपूरच्या मतदारांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले आहे. यामुळे ईशान्य भारतात आसाम पाठोपाठ मणिपूरमध्येही सलग सत्ता मिळवत भाजपने मुसंडी मारलेली दिसून येते.
२०१७ साली २८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसची मात्र या निवडणुकीत सपशेल पिछेहाट होतांना दिसली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पक्षाला लागलेली घरघर हे त्यामागचं प्रमुख कारण.
भाजपसोबतच नॅशनल पीपल्स पार्टीच्या जागांमध्ये २०१७ च्या तुलनेत वाढ झाली मात्र नॅशनल पीपल्स पार्टी आणि लोक जनशक्ती पार्टीसारख्या स्थानिक पक्षांचं 'किंगमेकर' होण्याचं स्वप्न निकालाच्या आकडेवारीत भंगलेलं दिसून येतंय. तर अनुक्रमे नव्यानेच स्थापन झालेल्या आणि निवडणूक लढवणाऱ्या कुकी पीपल्स अलायन्स आणि नितीश कुमारांच्या जनता दल (संयुक्त) ने मणिपूरमध्ये आपलं खातं उघडलेलं दिसतंय.
मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्प्यात एकूण ६० जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पडल्या. यावेळी भाजपने निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षासोबत युती न करता सर्व ६० जागांवर पक्षाचे उमेदवार दिले होते. मात्र काँग्रेसने इतर सहा पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवली. यामध्ये काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माओ), फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि जनता दल (सेक्युलर) यांचा समावेश होता. तरीही निवडणूक निकालाच्या सुरुवातीपासूनच भाजपकडे सत्तेचं पारडं झुकलेलं राहिलं आणि ते अंतिम निकालातही कायम आहे.
बहुमताचा आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी पक्षासाठी कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना भाजपकडून आखण्यात आली. इतर राज्यांप्रमाणेच इथेही पक्षाच्या सर्व महत्वाच्या नेत्यांचे दौरे झाले. मोठ्या सभांऐवजी स्थानिक प्रचारावर अधिक भर राहिला. भाजपने मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्याइतकंच महत्व संघटन अधिक मजबूत करण्यावरही दिलं, असंही निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. याउलट काँग्रेसला पक्षांतराचा फटका बसला. ताकदीच्या नेतृत्वाशिवाय होणाऱ्या निवडणुकीचा अपेक्षित निकाल सर्वांसमोर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.