पुणे : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता राखण्यासाठी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pandey) यांची पक्षाने महापालिका निवडणूक प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. नेत्यांच्या भाऊगर्दीत समन्वय राखून सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे. (Pune Corporation Election Updates)
मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 40 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. या परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपने 1993 मध्ये मुंबईत सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढला होता.
त्याचे संयोजन पांडे यांनी केले होते. तेव्हा राज्यात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांचा इतका मोठा मोर्चा निघाला होता. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रभारी असताना पांडे सहप्रभारी होते. यापूर्वी त्यांनी महानगर सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.
एमकॉम, एमफिलपर्यंत शिक्षण झालेले पांडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे ही सदस्य आहेत. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पक्षाने अशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे, त्याच धर्तीवर पुण्यासाठी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार असून सहा आमदार आहेत.
त्याचप्रमाणे महापालिकेत शंभर नगरसेवक आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचाही पुण्यात वावर असतो. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचीही शहरात मोठी संख्या आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराचीही ही पुण्यामध्ये ताकद आहे.
त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघ परिवारातील कार्यकर्ते आणि पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पांडे यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आव्हान परतावून लावण्यासाठी पांडे यांच्यावर भाजपची पुण्यातील सत्ता राखण्याची मोठी जबाबदारी पडली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.