हरीश रावत यांचा हा पराभव काँग्रेससाठी मोठा आहे. कारण, ते उत्तराखंडच्या राजकारणातील मोठं नाव होतं.
Uttarakhand Assembly Election : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काँग्रेसच्या (Congress) निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांचा निवडणुकीत पराभव झालाय. भारतीय जनता पक्षाचे मोहनसिंग बिश्त (Mohan Singh Bisht) यांनी त्यांचा 14 हजार मतांनी पराभव केलाय. हरीश रावत यांचा हा पराभव मोठा आहे. कारण, ते उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार होते. पण, हरीश रावत यांचा चेहरा जनतेनं नाकारलाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हरीश रावत हे पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) प्रभारी आहेत. मात्र, तिथंही पक्षाचा दारुण पराभव झालाय. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनीही दोन्ही जागा गमावल्या.
हरीश रावत यांचा हा पराभव काँग्रेससाठीही मोठा आहे. कारण, ते उत्तराखंडच्या राजकारणातील मोठं नाव होतं. राज्यात केवळ काँग्रेसच नाही, तर विरोधकांचं राजकारणही हरीश रावत यांच्याभोवतीच फिरत आहे. हरीश रावत केंद्राच्या राजकारणात सक्रिय नव्हते. परंतु, पक्षाला त्यांच्याकडं दुर्लक्ष करुन चालणार नव्हतं. त्यामुळंच या वयातही काँग्रेसनं त्यांच्यावर विश्वास टाकून निवडणूक प्रचाराची धुरा त्यांच्याकडं सोपवली.
2014 मध्ये केदारनाथ दुर्घटनेनंतर उत्तराखंड सरकारमध्ये फेरबदल झाल्यानंतर, हरीश रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. त्यानंतर हरीश रावत यांनी धारचुला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून विधानसभेत प्रवेश केला. मात्र, रावत यांचा हा कार्यकाळ फार काळ टिकला नाही. या सत्ताकाळात हरीश रावत यांना पक्षातील बंडखोरीला सामोरं जावं लागलं. यानंतर रावत यांना त्यांच्या कार्यकाळात दोन वेळा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात दोनदा राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर 11 मे 2016 रोजी त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली आणि ते 18 मार्च 2017 पर्यंत मुख्यमंत्री राहिले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बंडखोरीचा फटका सहन करावा लागला होता. 70 विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे केवळ 11 आमदार आले, तर मुख्यमंत्री हरीश रावत यांनी या निवडणुकीत पुन्हा बहुमत मिळवण्यासाठी दोन जागांवर निवडणूक लढवली. मात्र, हरीश रावत यांना हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा या दोन्ही जागांवरून पराभवाला सामोरं जावं लागलंय. दरम्यान, उत्तराखंडमध्ये भाजप 43, काँग्रेस 23, बसपा 2 आणि अपक्ष उमेदवार 2 जागांवर आघाडीवर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.