#FamilyDoctor आवळा आणि कोहळा

Amla
Amla
Updated on

आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते. कोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो, पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो.

उच्चारात साधर्म्य असणारे, आवळा व कोहळा, हे दोघे गुणांनाही एकमेकांना पूरक असतात. आवळा हे फळ, तर कोहळा ही फळभाजी; परंतु फळ म्हणून आवळा सहसा खाल्ला जात नाही आणि भाजी म्हणून कोहळ्याची भाजी क्वचितच निवडली जाते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने आवळा व कोहळा हे फार उपयोगी असतात. या गुणकारी द्रव्यांचा विसर न पडावा म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुष्मांडनवमी आणि आवळीभोजन हे मुद्दाम अधोरेखित केले असावेत. 

कार्तिक महिन्यातील शुक्‍ल नवमीला कूष्मांडनवमी किंवा अक्षय्यनवमी असते तर याच महिन्यातील एकादशी ते पौर्णिमेपर्यंत आवळीपूजन करण्याची प्रथा असते. आवळीपूजन झाल्यावरच आवळ्याचा औषधासाठी वापर करायचा असतो, कारण तोपर्यंत आवळा उत्तम रस, गुण व वीर्याने परिपूर्ण झालेला असतो. 

आधुनिक संशोधनानुसार सुद्धा या महिन्यात काढलेल्या आवळ्यात सर्वाधिक प्रमाणात ॲस्कॉर्बिक ॲसिड (सी व्हिटॅमिन) असते असे सिद्ध झालेले आहे. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील ‘सी’ व्हिटॅमिन नष्ट होत नाही. आयुर्वेदाने आवळ्याचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत, 
आमलकं कषायाम्लं मधुरं शिशिरं लघु । 
दाहपित्तवमीमेह शोफघ्नं च रसायनम्‌ ।।...राजनिघण्टु
श्रम-वमन-विबन्धाध्मान-विष्टम्भ-दोषप्रशमनम्‌ अमृताभं चामलक्‍याः फलं स्यात्‌ ।।...राजनिघण्टु
आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते. 
याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बिया, सालसुद्धा औषधी गुणांच्या असतात.

आवळा रसायन गुणाचा आणि तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ समजला जात असल्याने बहुतेक सर्व रसायनांमध्ये असतोच. च्यवनप्राश, ब्राह्मरसायन, आमलकावलेह, धात्री रसायन वगैरे रसायनांमध्ये आवळा हाच मुख्य घटक असतो. 

एकटा आवळा तिन्ही दोषांवर काम कसा करतो हेही सुश्रुताचार्य सांगतात, 
हन्ति वातं तदम्लत्वात्‌ पित्तं माधुर्यशैत्यतः । कफं रुक्षकषायत्वात्‌ फलेभ्योऽभ्यधिकं च यत्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान
आंबट असल्याने आवळा वाताचे शमन करतो; गोड व थंड असल्याने पित्ताचे शमन करतो; तुरट व रुक्ष (कोरडा) असल्याने कफाचे शमन करतो. त्रिदोषांचे संतुलन करणारा असला तरी आवळा प्रामुख्याने पित्तशमन करत असतो.
आवळ्याचा उपयोग खाण्यासाठी केला जातो तसेच बाहेरून लावण्यासाठीही केला जातो. असे काही अनुभवसिद्ध उपाय याप्रमाणे सांगता येतील.

 आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरे पूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास १५ दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो. 
 पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो. 
  आवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते. 
  आवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरे पूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते.

आता कोहळा आरोग्यासाठी उत्तम कसा असतो हे पाहू या.
कोहळ्याला संस्कृत भाषेत कूष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. आयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत, 
कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरु पित्तास्रवातनुत्‌ । बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।।
वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु । बस्तिशुद्धिकरं चेतोरोगहृत्सर्वदोषजित्‌ ।।...भावप्रकाश
कोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो, पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने पितशमनास उत्तम असतो, तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो, पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असते. कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो,

कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत वीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा ४-५ चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो. 

आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा ४-५ चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात. 

मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा ४-५ चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो. 

लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो. 

शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो, यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो. 

तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घकाळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यासारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.

तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते, अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.  

कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते. 

वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर तसेच कोणत्याही दीर्घ आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते. 

जून कोहळा क्षारयुक्‍त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर उत्तम असतो, पचनास मदत करतो. 

पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही असतो. 

दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे, कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्‍चित हातभार लागतो.
अशा प्रकारे अक्षय्यनवमीच्या निमित्ताने कोहळ्याची आणि आवळीपूजनाच्या निमित्ताने आवळ्याची आठवण ठेवली, कोहळ्याचा व आवळ्याचा स्वयंपाकात, रसायन बनविण्यासाठी उपयोग केला तर अक्षय्य आरोग्याचा लाभ होईल हे नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.