आरोग्याचे काही त्रास बरेही होऊ शकतात. परंतु बरा होण्यासाठी लागणारा कालावधी व्यक्तीसापेक्ष असू शकतो. अमुक रोग झाला असता अमुक औषध घेतले व अमुक दिवसांत रोग बरा झाला अशी समीकरणे मांडता येत नाहीत. एक तर सृष्टीचे चक्र फिरत असते, पर्यावरणाचा परिणाम होत असतो, घडणाऱ्या घटनांचा मनावर, शरीरावर परिणाम होत असतो, खाण्या-पिण्याच्या सवयी व त्यात केलेले बदल, कामानिमित्त होणारे प्रवास यामुळेही होणारा त्रास बरा होण्यावर परिणाम होत असतो.
घरातील टीव्ही चालत नव्हता तेव्हा बरीचशी बटणे दाबून पाहिली. टीव्ही विकत घेतला तेव्हा त्याबरोबर एक माहितीपुस्तिका मिळाली होती, तीही काढून पाहिली. शेवटी लक्षात आले की हे काम घरच्या घरी होण्यासारखे नाही. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) तेव्हा दुकानात फोन केला व तक्रार नोंदवली, काय काय तक्रारी आहेत हे सांगितले. "आमचा मनुष्य तुमच्या घरी येईल'' असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर मॅचचे प्रक्षेपण होणार होते, त्यामुळे "टीव्ही दुरुस्त करायला आजच माणूस पाठवा'' असे सांगितले, तर बऱ्याच तक्रारी असल्याने "दोन दिवसांनंतर मनुष्य येईल'' असे सांगण्यात आले. नंतर तो मनुष्य आला, त्याने इकडे-तिकडे काहीतरी केले, एक छोटासा भागही बदलला, पण टीव्ही सुरू झाला नाही. टीव्ही कंपनीत पाठवायला लागेल असे त्याने सांगितले. शेवटी टीव्ही कंपनीत पाठवला. दुरुस्तीला किती दिवस लागतील असे विचारले असता," आधी टीव्ही उघडून तर पाहू द्या, काय झाले आहे ते, पाहिल्यावर काय करावे लागेल ते सांगता येईल व त्यामुळे वेळ लागेलच", असे उत्तर मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी टीव्ही "बरा होऊन'' घरी आला.
आपले शरीर जेव्हा चालत नाही तेव्हाही आपण असेच काही करतो का? उदा. गॅस झाला तर घरच्या घरी आल्या-लिंबाचा रस घेऊन पाहतो, सर्दी झाल्यासारखी वाटत असेल तर वाफारा घेऊन पाहतो. घरात असलेल्या "फॅमिली डॉक्टर'' पुस्तकातील माहितीचा उपयोग करून घेतला जातो. असे इलाज केल्यावर थोडे बरे वाटल्यासारखे वाटते, परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी तब्येत पूर्णपणे बरी नसल्याचे लक्षात येते. मग डॉक्टरांना फोन केला, लक्षणे सांगितली तर त्यांनी घरी येऊन पाहण्याची गरज नाही, दवाखान्यात येऊन दाखवून जाण्यास सांगितले. "व्हिजिट फी घ्या, पण घरी येऊन पाहून जा'' असा आग्रह केल्यानंतर त्यांनी सर्व रोगी तपासून झाल्यावर रात्री येणार असल्याचे सांगितले. सांगितल्यानुसार डॉक्टर रात्री घरी आले. तपासून त्यांनी सोनोग्राफी करायचा सल्ला दिला व त्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दवाखान्यात येण्यास सांगितले. अशा प्रकारे डॉक्टरांची व्हिजिट फी तर दिलीच, बरोबरीने दवाखान्यातही जावे लागले. तेथे गेल्यावर चार-पाच तपासण्या केल्या गेल्या. नंतर डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली व तेवढ्यावर भागले. परंतु काही वेळा शस्त्रकर्म करण्याचा सल्ला दिला जातो. शस्त्रकर्मानंतर विश्रांतीची गरज असल्यामुळे महिन्या-दीड महिन्याची सुटी काढण्यास सांगितले जाते.
काही वेळा केंद्रात राहून पंचकर्म करून घेण्यास सुचवले जाते. त्यासाठी किती दिवस राहावे लागेल असे विचारले असता तीन ते चार आठवडे लागतील असे सांगितले जाते. यावर एवढी सुटी कशी मिळणार? "दोन-तीन दिवसांत काही शक्य आहे ते बघा'' असे रोगी म्हणतो. जसा आपण एखाद्या वस्तूचा भाव ठरवतो तसा रोगी कालावधीचा भाव ठरवतो. पंचकर्म करण्याची नक्की गरज आहे का हे पडताळण्यासाठी रोग्याला आधी नीट तपासले जाते, त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. कधी रोगी म्हणतो, "डॉक्टर एवढे सगळे प्रश्न का विचारता आहात? काही तरी आयुर्वेदातील चूर्ण द्या, गोळ्या द्या, पाहिजे तर एखादे आसव द्या.''
नीट तपासणी केल्याशिवाय कुठल्याही शास्त्रानुसार औषध योजना कशी ठरविणार? पोटात दुखते आहे असे एखादे लक्षण पाहून घाईघाईने काही औषध दिले तर लगेच बरे वाटले तरी नंतर दुष्परिणाम होऊ शकतात. तेव्हा नीट तपासण्या करणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदातही विशिष्ट तपासण्या असतात. एक्स-रे, सोनोग्राफी वगैरे तपासण्यांचाही आयुर्वेदात उपयोग करून घेता येतो. आयुर्वेदाने सांगितलेली अष्टविधपरीक्षा करून, नाडीपरीक्षा करून, रोग्याच्या तब्येतीचा इतिहास जाणून घेऊन व रोग्याच्या शरीरात रोग कसा कुठून आला आहे याचे चिंतन करून उपचारयोजना ठरविली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने तपासण्या केल्यावर रोग्याचे राहणीमानात काय बदल करावे याबद्दलही मार्गदर्शन मिळू शकते. रोग्याचा आहार काय असावा, त्याच्या नोकरीचे स्वरूप, उदा. रात्रपाळी करावी लागते का, भट्टीजवळ उभे राहून काम करावे लागते का वगैरे अनेक मुद्द्यांचा विचार करून व्यक्तीची प्रकृती ठरविली जाते व त्यानुसार त्या व्यक्तीने निसर्गाशी कसे संतुलन साधावे, व्यक्तीने कुठल्या गोष्टी खाताना काय काळजी घ्यावी वा काही गोष्टी कधीच खाता येणार नाहीत, प्रवासात काय काळजी घ्यावी, परदेशी गेले असता तेथल्या हवामानाशी संतुलन कसे ठेवावे यासाठी मार्गदर्शन केले जाते. यानंतर रोग मुळात कुठून सुरू झाला वगैरेंचा विचार करून उपचार सुचवले जातात. रोग मुळातून बरा व्हावा यासाठी योजना करता येते.
एखादा त्रास सुरू झाला असता त्यावर काय इलाज करावा लागेल, रोग पूर्ण बरा व्हायला किती वेळ लागेल, झालेला रोग बरा होत असताना त्यातून दुसरा रोग उद्भवणार नाही या सर्व बाबी ठरविता येतात. रोगांचे साध्य, कष्टसाध्य व असाध्य असे वर्गीकरण आयुर्वेदात केलेले आहे. यातूनही स्वतःची प्रकृती, आयुष्यभरात केलेल्या चुकीच्या-बरोबर वागणुकीचे परिणाम यावरही रोग बरा होण्यासाठी किती कालावधी लागू शकेल याचा अंदाज बांधता येतो.
जुलाब होणे, ताप चढणे, खोकून खोकून जीव हैराण होणे यावर इलाज सुरू केल्यावर त्रासाची तीव्रता कमी होऊन व्यक्तीचे जीवन सुसह्य होऊ शकते. असे त्रास बरेही होऊ शकतात, परंतु बरा होण्यासाठी लागणारा कालावधी व्यक्तीसापेक्ष असू शकतो. अमुक रोग झाला असता अमुक औषध घेतले व अमुक दिवसात रोग बरा झाला अशी समीकरणे मांडता येत नाहीत. एक तर सृष्टीचे चक्र फिरत असते, पर्यावरणाचा परिणाम होत असतो, घडणाऱ्या घटनांचा मनावर, शरीरावर परिणाम होत असतो, खाण्या-पिण्याच्या सवयी व त्यात केलेले बदल, लग्नसमारंभ वगैरेंसाठी द्यावी लागणारी हजेरी, कामानिमित्त होणारे प्रवास यामुळेही होणारा त्रास बरा होण्यावर परिणाम करत असतात. काही आजार झाला असता बऱ्याचदा संपूर्णतः झोपून राहण्याची गरज नसते, पण त्यामुळे त्रास झाला की विश्रांती घ्यायची सोडून लोक आपले काम सुरू ठेवताना दिसतात. असे वागणे रोग वाढायला कारणीभूत ठरू शकते.
तेव्हा घरात असलेल्या अनुभवी व्यक्तीकडून किंवा आपल्याला असलेल्या प्राथमिक ज्ञानातून, आपल्याकडे असलेल्या "फॅमिली डॉक्टर''सारख्या पुस्तकातील मार्गदर्शनावरून आपण प्राथमिक तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. काही त्रास सुरू झाल्यास एकदम कुठली तरी गोळी घेण्यापेक्षा योग्य तपासण्या करून घेणे आवश्यक असते. रोगाच्या अवस्थेनुसार डॉक्टर वा वैद्यांना घरी बोलावून तपासणी करणे किंवा दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे किंवा हृद्रोग, मधुमेह, आमवात, गर्भाशयाचे विकार, मेंदूचे विकार वगैरे मोठा त्रास असल्यास नुसत्या तपासण्या करून न थांबता पंचकर्मादी उपचार करून घेणे आवश्यक असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.