बालकाच्या आयुष्यातील तीन ते सहा वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या वयात बालकाचे अतिलाड करू नयेत, तसेच त्याला फार दराराही दाखवू नये. बालकाला उपाशी ठेवणे, त्याच्याकडे लक्ष न देणे, त्याच्यासाठी माता-पित्याने वेळ न देणे, या सगळ्या गोष्टींचा बालकाच्या आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. या वयात ज्ञानाचे विशेष संस्कार करावेत. गृहसंस्कारात खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळेवर झोपण्या-उठण्याच्या सवयींचे बीज रोवले जात असते. यासाठी घरातील सर्वांचेच योगदान महत्त्वाचे असते.
१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून ओळखला जातो. बालकाची घेतलेली काळजी, त्यावर झालेले संस्कार, बालकाला लागलेल्या सवयी, आवडी-निवडी यांचा पुढे संपूर्ण आयुष्यभर मोठा परिणाम होत असतो; आणि म्हणूनच गर्भसंस्काराइतकेच नंतरचे ‘बालसंस्कार’ संपन्न, सुसंस्कृत पिढीसाठी खूप मोलाचे असतात. बालसंस्काराची पहिली पायरी म्हणजे गृहसंस्कार अर्थात घरात होणारे संस्कार. आई-वडिलांच्या बरोबरीने घरातील प्रत्येक सदस्यावर या संस्कारांची जबाबदारी असते. लहान बाळ अतिशय संवेदनशील असते. बोलता-चालता आले नाही तरी किंवा मनातील भाव प्रगट करता आले नाही तरी घरातील वातावरणाचा, संभाषणातील स्पंदनांचा इतकेच नाही तर विचारतरंगांचाही बालकावर परिणाम होत असतो. पहिल्या ३-४ वर्षांपर्यंत बालकाच्या मेंदूचा झपाट्याने विकास होत असतो. अशा वेळी त्याच्यासमोर अशा घटना होऊ नयेत, त्याला असे काही बघावे लागू नये जेणेकरून त्याच्या स्मृतीवर भलताच संस्कार होईल, याची काळजी गृहसंस्कारात घेतली जावी. त्यासाठी आयुर्वेदाने ग्रहचिकित्सा याविषयाद्वारा केलेले मार्गदर्शन आचरणात आणण्यासारखे आहे. बालकाच्या आयुष्यातील तीन ते सहा वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या वयात बालकाचे अति लाड करू नयेत तसेच त्याला फार दराराही दाखवू नये.
बालकाला उपाशी ठेवणे, त्याच्याकडे लक्ष न देणे, त्याच्यासाठी माता-पित्याने वेळ न देणे, या सगळ्या गोष्टींचा बालकाच्या आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. या वयात ज्ञानाचे विशेष संस्कार करावेत. गृहसंस्कारात खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळेवर झोपण्या-उठण्याच्या सवयींचे बीज रोवले जात असते. यासाठी घरातील सर्वांचेच योगदान महत्त्वाचे असते. ब्रेड, बिस्किटे, पिझ्झा वगैरे तयार पदार्थांपासून लहान मुलांना जितके दूर ठेवावे तितके चांगले. अन्यथा या सर्वांची चटक लागली तर वरण-भात, भाजी-पोळी, खिचडी वगैरे पोषक गोष्टी मुले टाळू लागतात, ज्याचा त्यांचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. मुलांनी घरातल्यांचे अनुकरण करणे स्वाभाविक असते. त्यामुळे आपण रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहायचा, मोबाईलवर राहायचे आणि लहान मुलांनी मात्र वेळेवर झोपायचा आग्रह धरायचा हे काही जमत नाही. मोबाईल- टीव्हीची सवय न लागण्यासाठीसुद्धा गृहसंस्कार महत्त्वाचे ठरावेत. मुलांशी सतत काही ना काही बोलणे, त्यांच्याबरोबर खेळणे, कल्पकवृत्तीला, सृजनशक्तीला वाव मिळेल असे काही ना काही करत राहणे याही सर्व गोष्टी गृहसंस्कारांतर्गत येतात. या वयात मुले घरी असल्याने त्यांना नियमित अभ्यंग करणे, बालामृतसारखे सुवर्ण- रसायन, च्यवनप्राश- चैतन्य कल्पासारखे टॉनिक, बुद्धी-स्मृतीच्या तल्लखतेसाठी ब्रह्मलीन घृत अशा गोष्टी नियमित देणे शक्य असते व उपयोगी असते.
यानंतर येतो तो ज्ञानसंस्कार. शालेय शिक्षणापासून ते २२-२४ वर्षांपर्यंत असते शिक्षणाचे वय. या वयात त्याने विद्याध्ययनाकडे लक्ष देणे, संसारात उपयोगी पडणाऱ्या इतर गोष्टींचा अभ्यास करणे अशी अपेक्षा असते. या वयात अपेक्षांचे भलतेच ओझे मुलांवर येणार नाही, अभ्यासाच्या बरोबरीने खेळ, कला, वक्तृत्व, संगीतादी गोष्टींचाही सराव होईल, मोकळी शुद्ध हवा, निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेता येईल, नातेवाईक, मित्रमंडळींबरोबर स्नेहबंध जुळतील, भारतीय संस्कृती, सण-उत्सवांच्या मागचे विज्ञान मुलांना समजेल यासाठीही मार्गदर्शन होणे आवश्यक असते. शैक्षणिक प्रगतीच्या बरोबरीने एकंदर जीवन जगताना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचेही ज्ञान मिळवणे या ज्ञानसंस्कारात अध्याहृत असते. वयात येताना मुलामुलींच्या मनात लैंगिक विषयांची उत्सुकता निर्माण झालेली असते. अशा वेळी या गोष्टींचे त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करणे इष्ट ठरते. या काळात अपत्याने या विषयांमध्ये प्रवेश करू नये, तर केवळ विद्याध्ययनावरच लक्ष केंद्रित करावे याबद्दल मार्गदर्शन करणे आवश्यक असते. सद्य परिस्थितीत घरातल्या घरात राहण्याचा लहान मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो आहे. सुरक्षा नियम सांभाळून मुलांना मोकळ्या हवेत घेऊन जाणे, निदान घरच्या घरी सूर्यनमस्कार घालणे, अभ्यासही संगणकावर, खेळही संगणकावर, मनोरंजनही संगणकावर असे होणार नाही याकडे लक्ष देणे, त्यासाठी कलात्मकतेला वाव मिळेल, कल्पकतेला चालना मिळेल अशा गोष्टी करणे महत्त्वाचे होय.
धर्म, अध्यात्म या गोष्टींची आपण ठराविक कल्पना मनात ठरवलेली असते. स्वतःची कर्तव्ये पार पाडणे म्हणजे धर्म आणि पंचज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या ज्ञानाची अनुभूती म्हणजे अध्यात्म असे समजले तर नैतिकतेने कसे जगावे, समाजाचे नियम काय असतात, समाजात कसे वावरावे, वेळप्रसंगी दुसऱ्याला मदत करणे, आपल्याशी माणसे जोडून घेणे, आल्या-गेल्याचे आदरातिथ्य करणे या सर्व गोष्टींचे संस्कार वेळच्या वेळी होणे आवश्यक असते. त्याबरोबरीनेच ध्यानधारणा करणे, कुठल्यातरी देवावर श्रद्धा वाढवणे, शांततेतूनच पुढे समृद्धी व सुख मिळणार आहे, याची जाणीव करून देणे हा संस्कार यावेळी व्हावा लागतो. अशा प्रकारे जन्मापूर्वी करायच्या गर्भसंस्कारांनंतर गृहसंस्कार, ज्ञानसंस्कार आणि अध्यात्मसंस्कार वेळच्या वेळी झाले तर प्रत्येकाचे आयुष्य सुखात, समाधानात व समृद्धीत जाऊ शकते.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.