टॉन्सिल्स जय विजय

घसा दुखायला लागला, गिळायला त्रास होऊ लागला की सर्वप्रथम मनात येते टॉन्सिल्स तर सुजले नसावेत? आणि बहुतेक वेळा ते खरे असते.
tonsils
tonsilssakal
Updated on

घसा दुखायला लागला, गिळायला त्रास होऊ लागला की सर्वप्रथम मनात येते टॉन्सिल्स तर सुजले नसावेत? आणि बहुतेक वेळा ते खरे असते. लहान मुलांमध्ये तर हा अनुभव नित्याचा असतो. काही वर्षांपूर्वी टॉन्सिल्सचा त्रास म्हणजे शस्त्रकर्म असे जणू समीकरण झालेले होते.

सध्या जरी हा प्रघात कमी झालेला असला तरी कुठलाही अवयव शरीरात निरुपयोगी नसतो, या तत्त्वानुसार टॉन्सिल्सही शरीरात उगाचच्या उगाच ठेवलेल्या नसतात. पोटाकडून किंवा श्र्वासामार्फत येणारे इन्फेक्शन मेंदू, नाक, डोळे या महत्त्वाच्या अवयवांकडे जाऊ नये, यासाठी टॉन्सिल्स पहारेकऱ्याचे काम करतात.

कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन वर जायला लागले तर टॉन्सिल्सला सूज येते व धोक्याची घंटा वाजते. टॉन्सिल्सला सूज आल्यास इलाज करणे आवश्‍यक असते, सोपेही असते. घशाची सूज अपचनामुळे, पित्तामुळे, वीर्यधातूच्या ऱ्हासामुळे अशा अनेक कारणांमुळे येऊ शकते आणि त्यामुळे ‘न रहे बाँस न रहे बाँसुरी’ अशा प्रकारचे उपचार करून चालत नाही.

अर्थात दुर्लक्ष केल्यामुळे टॉन्सिल्सचे इन्फेक्शन पिकले, पिकलेले टॉन्सिल्स फुटून त्यातील इन्फेक्शन दुसरीकडे पसरेल अशी अवस्था निर्माण झाल्यास शल्यकर्म करणे आवश्‍यक असते हे नक्की. परंतु अशी वेळ येऊ नये यासाठी आयुर्वेदाच्या उपचारांचा निश्र्चित उपयोग होताना दिसतो. 

आपल्या वेदवाङ्मयात डोक्यातील मेंदूला स्वर्गाची, मानेला अंतरिक्षाची, मेरुदंडाला व बाकीच्या शरीराला पृथ्वीची उपमा दिलेली दिसते. स्वर्गाच्या द्वारावर जय-विजयरूपी दोन पहारेकरी टॉन्सिल्सच्या रूपात उभे असतात. या पहारेकऱ्यांनीच सुट्टी घेतली किंवा तेच आजारी पडले तर नाक, डोळे, मेंदू यांच्यापर्यंत मोठा त्रास पोचू शकतो.

वस्त्र खूप फाटल्यानंतर ते शिवण्यासाठी धागा शोधण्यापेक्षा वस्त्राला बारीक छिद्र असतानाच ते बुजवले तर वस्त्रही वाया जात नाही व फारसा त्रासही होत नाही. यासाठी इंग्रजीत छान म्हण आहे, ‘स्टिच इन टाइम, सेव्हज्‌ नाईन’. आयुर्वेद म्हणतो की रोग होऊ नये अशा प्रकारची जीवनपद्धती स्वीकारणे सर्वांत महत्त्वाचे.

टॉन्सिल्सच्या बाबतीत कफवृद्धी होईल अशा प्रकारचे खाणे चुकीच्या वेळी स्वीकारणे, गार वारा असताना मानेला स्कार्फ वगैरे न बांधणे, पाऊस पडत असताना वा हवा थंड असताना थंड पेये, आइस्क्रीमसारखे थंड पदार्थ खाणे, धूळ अधिक असलेल्या जागी फार वेळ राहणे, वारंवार नाट्यगृह, सिनेमागृह वगैरे ठिकाणी जाणे, अशा कारणांमुळे घशाचा त्रास सुरू होऊ शकतो.

ही कारणे, पर्यायाने घशाचा त्रास टाळणे निश्र्चितच शक्य आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ हे लक्षात ठेवणे. मनुष्य अन्नापासूनच तयार होत असेल तर शरीरात होणारा त्रास वा रोग अन्नातूनच येत असेल यात काही नवल नाही. तेव्हा अन्नावर लक्ष देणे आवश्‍यक असते. अपचन होईल असे काहीही खाणे टाळावे.

टॉन्सिल्सचा त्रास अधिकतर लहान मुलांना होताना दिसतो. लहान मुले नीट जेवत नाहीत, हट्ट करतात, त्यांची रडारड नको या कारणास्तव लहान मुलाला हवे ते देण्याचा पालकांचा कल असतो. खेळात गुंतल्यामुळे वेळेवर जेवायला न येणे हेसुद्धा मुलांच्या बाबतीत होताना दिसते.

मुलांच्या शाळांच्या वेळा अशा असतात की, त्यांना वेळेवर जेवण मिळणे दुरापास्त झालेले दिसते. अनेक शाळा त्यांनी पुरविलेले जेवणच मुलांनी घ्यावे असा आग्रह धरतात, पण ते जेवण सरसकट सर्वांना चांगलेच असेल असे नसते. त्यामुळे अनेक मुलांना जेवण पचत नाही, अंगी लागत नाही आणि अपचन झाले की टॉन्सिल्ससारखे विकार डोके वर काढतात. पचन नीट नसले की जंत होतात, जंत शरीरातील शक्ती कमी करतात.

यामुळे वीर्यधातूचा अभाव झाला की रक्त, रस दूषित होतो. असे झाले की सर्दी-पडसे, अशक्तपणा, हिमोग्लोबिन कमी होणे, टॉन्सिल्सचा त्रास वगैरे त्रास होताना दिसतात, तेव्हा स्वच्छता असणे व मुलांच्या अंगी लागेल असे प्रकृतीनुरूप घेतलेले अन्न घेणे यावर खूप लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. 

मुले इकडे-तिकडे हात लावतात, त्याच हातांनी खातात. ओठावर बोटे ठेवून विचार करतात वा बोलतात, दातात काही अडकल्यास तोंडात बोटे घालून काढण्याचा प्रयत्न करतात. असे झाल्यास त्यांना काही आजार झाले नाहीत तरच नवल. अशा सर्व सवयींमुळे त्यांच्या पचनाशी खेळ होतो.

तेव्हा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची आवश्‍यकता त्यांच्या मनावर बिंबवणे आवश्‍यक आहे. मुलांनी भरपूर खेळावे हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्यांनी कुठल्याही प्रकारे खाण्या-पिण्याशी, पर्यायाने आरोग्याशी न खेळणे हेही खरे आहे. 

मुळात लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो, रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी यासाठी च्यवनप्राश, संतुलन आत्मप्राश, कंटकारी अवलेह, धात्री रसायन, अमृतशर्करा यासारखे का काही ना काही रसायन घेत राहिले, पाच वर्षांखालील मुलांसाठी सुवर्ण-मध, बालामृत वगैंरेंची नियमित योजना केली असली, तर वारंवार टॉन्सिल्स सुजण्यास निश्र्चित प्रतिबंध करता येतो असा अनुभव आहे. याखेरीज वारंवार टॉन्सिल्सचा त्रास होत असल्यास पुढील आयुर्वेदिक उपचारांची योजना करता येते.

  • शुद्ध घटकद्रव्यांपासून बनविलेले सीतोपलादी चूर्ण मध-तुपासह मिसळून घेणे. लहान मुलांनी पाव चमचा तर मोठ्या माणसांनी अर्धा चमचा चूर्ण दिवसातून दोन वेळा घेणे चांगले असते.

  • हळद-मिठाच्या पाण्याच्या किंवा ज्येष्ठमधाच्या काढ्याच्या गुळण्या करणे. हळद अगोदर पाण्यात भिजत घालून गाळून घेणे अधिक चांगले होय.

  • इरिमेदादी तेल किंवा सुमुख तेल अर्धा ते एक चमचा व ४-५ चमचे पाणी हे मिश्रण तोंडात ८-१० मिनिटांसाठी धरून ठेवणे.

  • सकाळी दात घासण्यासाठी तसेच मुखशुद्धीसाठी आयुर्वेदाने सुचविलेल्या तुरट, कडू, तिखट चवीच्या द्रव्यांपासून बनविलेल्या दंतमंजनाचा किंवा संतुलन योगदंतीचा वापर करणे. यामुळे मुखातील अतिरिक्त कफदोष निघून गेला की गिलायु ग्रंथींची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते. 

  • शुद्ध काथ, वेलची, ज्येष्ठमध, कंकोळ यांच्यापासून तयार केलेल्या गोळ्या किंवा खदिरादी वटी चघळून खाणे.  

  • गवती चहा, दालचिनी व आले वा सुंठ यांचा खडीसाखर घालून केलेला चहा घोट घोट पिण्यानेही सर्दी, ताप, घसा दुखणे कमी होण्यास मदत मिळते. 

टॉन्सिल्स किंवा घसादुखी हा काही फार मोठा रोग नव्हे, पण त्यातून पुढे धोका होऊ शकतो, त्यामुळे हे त्रास होऊ नयेत याकडे लक्ष देणे खूपच आवश्‍यक ठरते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.