घरात बालगोपाळ खेळा-बागडायला लागले की घराला घरपण येते, हे कोणीही मान्य करेल. एवढासा चिमुकला जीव बघता बघता अख्ख्या घराला आपल्याभोवती नाचायला लावतो, मोठ्या-मोठ्यांनाही आपल्याप्रमाणे हसा-खेळायला लावतो, जणू अख्ख्या घराला चैतन्य आणतो. नुकताच आपण बालदिन साजरा केला. मुले सर्वांनाच आकर्षित करतात. हसरं, तेजस्वी बाळ तर सगळ्यांनाच हवंहवंसं वाटतं.
मात्र मुलाच्या चेहऱ्यावर हसू तेव्हाच येतं जेव्हा शरीरात ताकद व्यवस्थित असते. अन्यथा मुले किरकिर करू लागतात, हट्टी होतात. लहान मुले असोत किंवा मोठ्या व्यक्ती असोत, प्रत्येकाला ताकद पुरेशी असण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. किंबहुना जेवढ्या लहान वयापासून मुलांच्या शक्तिसंवर्धनासाठी प्रयत्न करावेत तेवढे ते त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडणारे असतात.
आयुर्वेदात शक्तिवर्धनासाठी सांगितलेला एक सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. नियमित अभ्यंगाने, विशेषतः वनस्पतींनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करण्याने मांसपेशींना विश्रांती मिळून ताकद मिळते, रक्ताभिसरण वाढते आणि प्रतिकारशक्ती सुधारते हा अनुभव कायम येतो. लहान मुलांना सहसा फार वेळ शांत बसणे जमत नाही. त्यातूनही इतर मुलांची सोबत असली तर दिवसभर दंगा-मस्ती चालू असते.
त्यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना नियमित किंवा वरचेवर तेल लावलेले चांगले. बहुधा पहिले वर्षभर बाळाला तेल-धुरी दिली जाते. परंतु नंतर वेळ नाही, जमत नाही, मूल करून घेत नाही या सबबींखाली या गोष्टी बंद होतात. पण मुलांची शारीरिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी व प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी ‘अभ्यंग’ नितांत आवश्यक असतो.
अनेक मुलांना जरा थंड पाणी प्यायले, आइस्क्रीम खाल्ले, वारे लागले की घसा दुखून सर्दी, खोकला, ताप वगैरे त्रास होतात. लगेच बरे वाटण्यासाठी त्यावर तीव्र औषधे घेतली जातात. या औषधांनी प्रतिकारशक्ती वाढत तर नाहीच, उलट त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात, परिणामतः हळूहळू ताकद कमी होते आणि मुलांमधील जोम, उत्साह कमी होतो.
उन्हाळ्यातही आइस्क्रीम खायला न मिळाल्यामुळे मुलांचा हिरमोडही होतो आणि कोणत्या निमित्ताने आपल्या लाडक्याला त्रास होईल याची टांगती तलवार आईवडिलांच्या डोक्यावर सतत राहते. या सगळ्यातून बाहेर पडायचा मार्ग एकच व तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. यासाठीचे उपाय अगदी सुरुवातीपासूनच करायचे असतात.
बाळाला सुरुवातीपासूनच आईचे दूध पुरेशा प्रमाणात मिळणे ही या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होय. ‘मातुरेव पिबेत् स्तन्यम्’ म्हणजे बाळाने आईचेच दूध प्यायला हवे असे आयुर्वेदाने आवर्जून सांगितलेले आहे. आज आधुनिक वैद्यकही ही गोष्ट मान्य करते. विशेषतः पहिल्या २-३ दिवसातल्या स्तन्यपानामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते, हे आज प्रयोगांनी सिद्ध झालेले आहे. असे हे स्तन्य बाळाला कमीत कमी पहिले ५-६ महिने व्यवस्थित मिळायला हवे.
दात यायला सुरुवात होणे ही गोष्ट बाळाची पचनसंस्था बाहेरचे अन्न पचवण्यासाठी कार्यक्षम होते आहे याचे निदर्शक असते. म्हणून तत्पूर्वी बाळाला स्तन्यपानच करावे. याने बाळाचे पोषणही व्यवस्थित होते, आरोग्याचा व उत्तम शक्तीचा भरभक्कम पायाही घातला जातो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच चाटवायचे मध-सोनेदेखील रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम असते. शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक अशा सर्वच स्तरांवर बाळाची ताकद वाढवणारे असते.
मुलांना दिली जाणारी गुटीदेखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, सर्व धातूंना पोषण देण्यासाठी उत्तम असते. वयाची पहिली दीड-दोन वर्षे नियमित गुटी देणे चांगले. अशा प्रकारे मध-सोने चाटवणे, अभ्यंग, धुरी, गुटी, गोष्टी वेळच्या वेळी केल्या तर पुढे मुलांचा स्टॅमिना टिकून राहण्यासाठी व आरोग्य नीट राहायला नक्कीच उपयोग होईल.
मूल जसे जसे मोठे होत जाते तस-तशी त्याची पोषकतत्त्वांची गरजही वाढत जाते. अशा वेळी त्यांना दुधातून शतावरी कल्प किंवा चैतन्य कल्प देणे, केशरयुक्त पंचामृत देणे, रोज सकाळी रात्रभर पाण्यात भिजवलेले २-३ बदाम सोलून देणे या गोष्टींची सवय लावावी. मुले मोठी झाली की त्यांना आवडी-निवडी समजायला लागतात.
आवडते म्हणून काही गोष्टी अधून मधून दिल्या तरी सकाळ संध्याकाळ सकस, पौष्टिक आणि संतुलित जेवणाची सवय कायम राहील याची काळजी घ्यावी. प्रत्यक्षात अनेकदा आईवडील, ‘‘डॉक्टर तुम्हीच याला सांगा, याला पोळी भाजी आवडतच नाही’’ असे सांगतात. अशा वेळी समोर बसलेल्या मुला-मुलींपेक्षाही आईवडिलांनाच त्याचे कारण विचारावेसे वाटते, कारण ८-१० वर्षांच्या लहान मुलांना बाहेरच्या किंवा चटपटीत खाण्याची सवय कुणी लावलेली असते?
लहान मुले अतिशय अनुकरणप्रिय असतात. घरातील वातावरण, घरातल्या मंडळींच्या सवयी मुले आपोआपच उचलतात. ‘वेळेवारी व पुरेशी झोप’देखील मुलांच्या ताकदीसाठी एक अत्यंत आवश्यक गोष्ट असते. कित्येकदा घरातली मोठी मंडळी टीव्हीवर उशिरापर्यंत काही कार्यक्रम बघत राहतात, त्यामुळे मुलेही उशिरा झोपतात. सकाळची शाळा असल्यास लवकर उठावेच लागते. परिणामतः कमी झोप झाली की सकाळी तयार होणेच इतके जिकिरीचे वाटते की मग आज दूधच नको, पंचामृत घ्यायला वेळच नाही असे घडत राहते, सूर्यनमस्कार किंवा दीर्घ श्वसनासारख्या गोष्टी तर सरळ रद्दच होतात. असा बिघडलेला दिनक्रम चालत राहिल्यास मुलांची शक्ती, उत्साह कायम राहू शकत नाही.
सध्याच्या मोबाइलच्या युगात अगदी लहान वयात हातात मोबाईल येतो. पण एकदा का त्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसते. आधीच शाळेतली वाढती स्पर्धा व अभ्यासाच्या ओझ्यामुळे मुलांच्या मेंदू व मनावर ताण असतो. त्यातच सतत मोबाइलवर किंवा संगणकावर खेळ खेळण्यामुळे मुलांच्या डोक्याला विश्रांती मिळत नाही व परिणामतः बौद्धिक ताण येऊनही मुले लवकर दमतात.
त्याऐवजी रोज अर्धा-पाऊण तास जरी मैदानी खेळ खेळायचे ठरवले तर त्यामुळे शारीरिक व्यायाम होतो. स्टॅमिना वाढतो, मनही ताजेतवाने होते, स्फूर्ती प्रतीत होते. वाढती स्पर्धा, अभ्यासाचा ताण यावर आपल्याकडे पर्याय नसला तरी या बाकीच्या गोष्टी सांभाळल्या तर मुलांना मदत होऊ शकते.
शाळेतल्या वाढत्या अभ्यासक्रमाचा दबाव आजच्या मुलांवर पडतो आहे हे सर्वज्ञातच आहे. कारण काहीही असले तरी या परिस्थितीला तोंड देणे भाग आहे हे नक्की. त्यासाठी मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे. यशस्वी कार्याच्या मागे सुनियोजन, पूर्वतयारी असते, त्याचप्रमाणे मुलाच्या अस्तित्वापूर्वीच त्याच्या संपन्नतेसाठी प्रयत्न करता येतात व हे गर्भसंस्कारांनी साध्य होऊ शकते.
स्त्रीबीज व पुरुषबीज शुद्ध व वीर्यसंपन्न असताना एकत्र आले, गर्भावस्थेपासूनच बाळावर चांगले संस्कार झाले, जगातला त्याचा प्रवेश सहज व नैसर्गिक झाला की पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. तेजस्विता, हुशारी, प्रज्ञा यांची संपन्नता गाठीशी असली तर मुले कठिणातल्या कठीण स्पर्धेत उत्तीर्ण होऊ शकतील; कुठल्याही समस्येला तोंड देऊ शकतील; जीवनातल्या कितीही अवघड वळणावर, चढ-उतारावर कचरणार नाहीत; उलट इतरांना हात देत जग समृद्ध करण्यास मदत करू शकतील.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.