वाजवीपेक्षा जास्त हालचालीची उदाहरणे म्हणजे खूप जास्त बोलणे, अकारण हालचाल करणे आणि कधी कधी अनावश्यक आक्रमकता वागण्या - बोलण्यात दिसणे. ही माणसे चेहऱ्यावर आणि मान - हात यांची खूप हालचाल करतात. (साध्या संभाषणाच्या प्रसंगीसुद्धा भारतीय माणसे मान - डोके आणि हाताची हालचाल जास्त करतात असा समज आहे.)
तोंडी परीक्षेच्या (किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी) प्रसंगी त्यांना स्वस्थ बसता येत नाही, सारखी चुळबूळ करतात; घरी किंवा कोठेही खोलीत येरझाऱ्या घालाव्याशा त्यांना वाटत राहते, बाहेर होणाऱ्या लहान-सहान आवाजांकडे त्यांचे सारखे लक्ष जाते. मॅनिया (अति - उत्तेजकता) या आजारात असा प्रकार नेहमी होतो. मॅनियामध्ये मन सदैव उत्तेजक स्थितीत राहते, चटकन चिडखोरपणा वृत्ती दिसतो. काहीतरी बोललेच पाहिजे असा मनावर दाब सतत असतो. मनात विचारांच्या भराऱ्या सारख्या उडत असतात. हे विचार आणि कल्पना अवास्तवच असतात. आपण कोणीतरी विशेष व्यक्ती आहोत, सामान्य माणसाच्या मानाने आपण अधिक बुद्धिमान आहोत, अधिक कर्तृत्ववान आहोत अशा अहंमन्यतेच्या कल्पना डोक्यात सदैव भराऱ्या मारत असतात. विकार वाढल्यास स्वतःबद्दलच्या मोठेपणाच्या कल्पनांचे रूपांतर तसा भ्रम होण्यात होते. झोप गाढ लागत नाही, रात्रभर व्यक्ती जागीच राहते; तरीसुद्धा सकाळी भरपूर उत्साह असतो. अन्न घेण्याची भूक आणि कामेच्छा वाढतात. अशा आजाराचे निदान वरील लक्षणावरून सहज होते. बऱ्याच वेळा घराण्यात अशा प्रकारचे मानसिक आजार इतर नातेवाइकांना झालेले असतात. अशा प्रकारची अतिरेकी अस्वस्थता काही औषधांमुळे किंवा मेंदूला झालेल्या इजा अगर आजारानेसुद्धा होऊ शकते. काही व्यक्तीमध्ये दीर्घकाळ गोंधळलेली स्थिती रेंगाळलेली राहते. या स्थितीला बुद्धिभ्रंश म्हणतात. स्थळ - काळाची जाणीव पुसट होते. अंदाज चुकतात, निर्णयात घोटाळे होतात. चुकीच्या शब्दांचा वापर केला जातो. कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे आठवत नाहीत. स्मरणशक्ती खालावते. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला किंवा मेंदूला मार लागला तर असे अनेकदा होताना आढळते. काही वेळा असा वैचारिक गोंधळ तात्कालिक असतो, पण कधी - कधी तो दीर्घकाळ टिकतो. आहारात फोलिक ॲसिड, जीवनसत्व B1 आणि जीवनसत्त्व B12 यांच्या अभावामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो.
अशा प्रकारच्या उत्तेजित मानसिक स्थितीच्या अनुपस्थितीत होणारी अनावश्यक हालचाल हे ॲनोरेक्सिया नर्व्होझा नावाच्या विकृतीमध्ये आढळते. ॲनोरेक्सिया नर्व्होझा या विकाराचे प्रमुख लक्षण तीव्र अन्नद्वेष होणे हे असते. पौगंडावस्थेतील (तारुण्यात पदार्पण करताना) मुलींमध्ये हा आजार विशेष आढळतो. शरीरावर अनेक प्रकारे अपाय होतो आणि वेळेवर उपचार झाले नाहीत तर मृत्यूदेखील ओढवू शकतो, असा आजार पुरुषांत सहसा होत नाही. १२-१३ वर्षांच्या मुलीला आपण लठ्ठ आहोत असे सकारण अथवा अनेक वेळा अकारणच वाटू लागण्याने आजाराची सुरवात होते. आपण लठ्ठ आहोत ही कल्पना मनात दृढ होते व वजन आणि उंची यांचे प्रमाण योग्य असले तरी वजन कमी करण्याची धडपड सतत चालू राहते. या विकारामुळे मासिक पाळी येणे थांबते, हाडे ठिसूळ होतात, शरीराचे तापमान व्यवस्थित राहात नाही. नाडीची गती संथावते, रक्तदाब उतरतो, मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ लागतो (decrease in glomerular filtration), मूत्रपिंडात खडे होतात, पावलांवर सूज येते, मलावरोध होतो (शौच्याला खडा होणे, कुंथावे लागणे) आणि यकृताच्या कार्यात बिघाड होतो. रुग्णाला रक्तक्षय (अनिमिया) होतो. या रुग्णांना प्रमाणाबाहेर व्यायाम करण्याची ऊर्मी येते. त्यानुसार हे रुग्ण विश्रांती न घेता काही ना काहीतरी व्यायाम करत राहतात.
काही आजारात अतिरेकी हालचाल होत राहते. अजिटेटेड डिप्रेशन (agitated depression) या आजारात रुग्णांच्या मनात सतत असणारी चिंता त्यांच्या दिसण्यात, विचारात आणि वागण्यात दिसू लागते. रुग्ण अस्वस्थ दिसतो, आपले काहीतरी चुकले आहे ही भावना मनातून जात नाही व इतरांकडून असे काही चुकलेले नाही या प्रकारची खात्री करून घेण्याची तृष्णा शमत नाही. आपल्या हातून आजवर अनंत चुका झाल्या, आता पुढच्या आयुष्यात त्यांची फळे मला भोगायला लागतील हे विचार जात नाहीत. अस्वस्थता हे लक्षण चिंतातूर व्यक्तीमध्ये असते (anxiety state) डोक्याला मार लागल्यानंतर, विशेषतः लहान मुलांमध्ये त्यांच्या वागण्या - बोलण्यात फरक जाणवू शकतो. मूल स्वस्थ बसू शकत नाही. अकस्मात, अकारण बेशिस्त बनते, असे बंडखोर वागणे घरी किंवा शाळेत कोठेही होते. या वेळी मुलाला राग आल्याचे स्पष्ट होते. अशा तऱ्हेचे वागणे कधी - कधी एपिलेप्सी (फिटस् येणे, फेफरे) या आजारातसुद्धा होऊ शकते. डोक्याला मार लागणे हे लहान मुलांना खेळताना, पडल्यावर किंवा अपघातात अनेकदा होते.
लहान मुलांमध्ये एक आजार बऱ्याच वेळा आढळतो. त्याला अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसॉर्डर (Attention deficit hyperactivity disorder : ADHD) म्हणतात. शाळेत जाऊ लागलेल्या मुलाचे शिकवण्याकडे लक्ष नाही हे शिक्षकांच्या व पालकांच्या लक्षात येते. मूल स्वस्थ बसत नाही, सारखी चुळबूळ करते, अशा मुलाला स्वस्थ बसण्याची शिस्त लावणे अशक्य होऊन बसते. वर्गात कारण नसताना मूल इकडून तिकडे पळते, अकारण शरीराच्या हालचाली करते, अकारण बडबड चालू असते. शालेय अभ्यासातील प्रगती मर्यादितच राहते. कामे करण्याचा उत्साह कमी असतो. या मुलांमध्ये रात्री बिछान्यात कपड्यात लघवी होणे हा प्रकार पुष्कळवेळा आढळतो. असे पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करेपर्यंत होते, पुढे बहुतेकांचे दोष जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.