पावसाळ्यात जपा त्वचेचे आरोग्य

पावसाळा आला की वातावरणात आर्द्रता वाढायला लागते. सूर्याच्या उष्णतेचा अभाव, ढगाळ वातावरण कोंदटपणा हे सगळे बुरशी (फंगस), कृमी, कीटक वगैरेंना पोषक असते.
Skin care
Skin caresakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

पावसाळा आला की वातावरणात आर्द्रता वाढायला लागते. सूर्याच्या उष्णतेचा अभाव, ढगाळ वातावरण कोंदटपणा हे सगळे बुरशी (फंगस), कृमी, कीटक वगैरेंना पोषक असते. त्यामुळे या काळात निरनिराळे संसर्ग तसेच ॲलर्जी होताना दिसतात.

या काळात वातदोषाचे असंतुलन झाल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, निस्तेजपणा, खरखरीतपणा वाढत जातो. पण बाहेरील वातावरण उष्ण नसल्यामुळे हा कोरडेपणा लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे त्वचेची फारशी काळजी घेतली जात नाही, पर्यायाने त्वचेचे त्रास होऊ लागतात. त्वचेची काळजी घेण्याकरिता काय करावे याची माहिती आपण घेऊ.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात नियमाने संपूर्ण शरीराला आठवड्यातून २-३ वेळा अभ्यंग करावा. यासाठी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे आयुर्वेदिक सिद्ध तेल वापरणे अधिक उत्तम. रात्री झोपण्यापूर्वी किंवा स्नानापूर्वी अर्धा तास संपूर्ण शरीराला हलक्या हाताने तेल खालून वर या दिशेत लावावे.

यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. शरीराला आलेला घाम पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे त्वचेवर चिकटून राहतो, पर्यायाने खाज/रॅश येण्याची शक्यता वाढते. अभ्यंगामुळे हा घाम त्वचेवरून निघून जायला मदत मिळते.

पावसाळ्यात स्वच्छता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. रोज नियमाने कोमट/गरम पाण्याने स्नान करावे. थोड्या पाण्यात कडुनिंबाची पाने, तुळशीची पाने व हळद घालून उकळावे व हे पाणी स्नानाच्या पाण्यात मिसळावे. यामुळे त्वचेवर येणारी ॲलर्जी, फंगल संक्रमण, रॅशेस याला प्रतिबंध होऊ शकतो.

दिवसातून किमान २-३ वेळा चेहरा साध्या पाण्याने धुवावा. फार जास्त प्रमाणात साबणाचा वापर करू नये. शक्य झाल्यास रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुऊन संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे एखादे व्यवस्थित आत जिरणारे सूक्ष्म गुणाचे तेल चेहऱ्याला लावणे उत्तम. या तेलाने हलक्या हाताने मसाज केला तरी चालते.

मेक-अपचा वापर केला जात असेल तर संध्याकाळी घरी आल्यावर मेक-अप काढून चेहऱ्याला संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल लावल्यास मेक-अपमुळे चेहऱ्यावर होणारे दुष्परिणाम व्हायला प्रतिबंध होतो.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेची काळजी नक्की घ्यावी. शरीराच्या इतर त्वचेपेक्षा चेहऱ्याची त्वचा अधिक संवेदनशील, नाजूक व नितळ असते. त्यामुळे चेहऱ्याचे मॉश्र्चरायझेशन व्यवस्थित राहणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे चेहऱ्याला संतुलन क्रेम रोझसारखे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली क्रीम लावणे श्रेयस्कर ठरते.

स्नानाच्या वेळी नैसर्गिक उटणे वापरलेले चांगले. याकरता सॅन मसाज पावडर वापरावी किंवा घरगुती उटणे वापरावे. याची संपूर्ण माहिती ‘श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे’ या यूट्यूब चॅनेलवर मिळू शकेल.

आठवड्यातून २-३ वेळा चंदन, हळद, अनंत वगैरेंसारख्या वर्ण्य वनस्पतींपासून बनविलेला संतुलन वात फेस पॅकसारखा नैसर्गिक पॅक चेहऱ्यावर नक्की करावा.

मुखस्वेदन - आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्याला बाष्प देणे. चेहऱ्याला स्वेदन करत असताना पाण्यात गवती चहा, कडुनिंबाची पाने, तुळस घातल्यास जास्त फायदा होताना दिसतो. तसेच संपूर्ण शरीरालाही स्वेदन करावे, यासाठी पाण्यात निलगिरी तेल, कडुनिंबाचे तेल वगैरे द्रव्ये टाकता येतात.

पावसाळ्यात पायाच्या त्वचेची काळजी घेणेही आवश्यक असते. पावसात भिजल्यावर पाय नक्की कोरडे करावे. घरात सुती मोजे वा चपला घालणे उत्तम. या ऋतूत तळपायाला भेगा पडण्याची, पाय कोरडे होण्याची, पायाच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढलेली असते.

याकरिता आठवड्यातून २-३ वेळा संतुलन प्युरिफायर धूप पेटवून त्याची धुरी पायाला द्यावी. या ऋतूत आठवड्यातून २-३ वेळा पादाभ्यंग करणेही उत्तम. रोज रात्री थोडे संतुलन पादाभ्यंग घृत व संतुलन सोल केअर क्रीम रात्री झोपायच्या आधी तळपायाला लावल्यास पायाला होणाऱ्या त्रासांपासून प्रतिबंध व्हायला मदत मिळते.

पावसाळ्यात केसांत कोंडा होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. केसांचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आठवड्यातून २-३ वेळा संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल केसांच्या मुळांशी हलक्या हाताने चोळून लावावे. तेल कोमट करून लावल्यास अधिक चांगले. केस धुण्यासाठी सतत रसायनयुक्त शाम्पू वापरण्याऐवजी आठवड्यातून एकदा तरी शिकेकाई, रिठा, नागरमोथा, आवळा वगैरे नैसर्गिक वनस्पतींपासून बनविलेले सुकेशा चूर्ण वापरावे.

त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. तहान लागली नाही या कारणास्तव पावसाळ्यात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. परंतु पावसाळ्यातही आवर्जून पाणी प्यावे. शक्य झाल्यास सोने व जलसंतुलन टाकून उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक हितकर ठरते.

त्वचेच्या आरोग्यमध्ये आहाराचे मोलाचे योगदान असते. तेलकट, तिखट, चमचमीत पदार्थ आहारातून वर्ज्य करावे. थंड पदार्थ, गोठविलेले पदार्थ, पचायला जड असलेले अन्न वर्ज्य करावे. जुना तांदूळ, जुना गहू, जव, मूग-मटकी-तूर यांच्या डाळी, मध आहारात ठेवणे उत्तम.

यकृताचे आरोग्य त्वचेच्या आरोग्याशी निगडित असते, त्याला मदतीच्या दृष्टीने सॅन पित्त सिरप, बिल्वसॅनसारखे पचनाला मदत करणारे औषध घेणे, संतुलन अन्नयोग वा पित्तशांतीसारख्या गोळ्या घेणे उत्तम ठरते.

त्वचेला काही त्रास होत असल्यास अनंतसॅन गोळ्या, मंजिष्ठासॅन गोळ्या, मंजिसार आसव वगैरे वैद्यांच्या सल्ल्याने सुरू करता येते.

वातसंतुलन व एकूणच आरोग्याच्या दृष्टीने पावसाळ्यात संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म वैद्यांच्या सल्ल्याने करवून घेता येते.

त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने सैलसर, शक्यतो सुती, कपडे घालावे.

अशा प्रकारे त्वचेची काळजी घेतली तर पावसाळ्यातही आपल्याला त्वचेचे आरोग्य व सौंदर्य टिकवायला मदत मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.