विस्मृतिचित्र

विस्मृतिचित्र
Updated on

माणूस आठवणींवर जगतो, असे म्हणतात. आयुष्यात घेतलेले अनुभव, भेटलेली माणसे यांच्या आठवणी मनात रुजून असतात. नाती, व्यवहार, समाज, अनुभव या सगळ्या स्मरणाचा पट आपल्यासमोर असतो. हा स्मरणपट गमावणे म्हणजे त्या माणसाने त्याचे व्यक्तित्व गमावल्यासारखेच असते. स्वतःचीच ओळख विसरण्याइतकी मोठी शिक्षा नसेल. ही शिक्षा जगभरात दर ३.२ सेकंदाला एकाला मिळते, असे जागतिक अहवाल सांगतो. अल्झायमर असल्याचे लवकर समजले आणि निदान झाले तर त्या रुग्णाला अधिक चांगले आयुष्य जगता यावे यासाठी मदत होऊ शकते. 

अल्झायमर हा वृद्धांना होणारा आजार आहे, ज्यात रुग्ण हळूहळू आपली स्मरणशक्ती गमावतो, त्यामुळे त्याचा तपास करणे कठीण जाते.

तुमच्या संपर्कात अशी एखादी तरी वृद्ध व्यक्ती येते, जी आपली स्मरणशक्ती गमावून बसली आहे. व्यक्ती एका जागी तासनतास बसून आहे. तिच्या डोळ्यात अनोळख भरून आहे. आपल्या मुलांनाही ओळखण्याच्या पलीकडे ती गेली आहे. खाल्ले काय, कधी, स्नान केले आहे-नाही, कशाचीच आठवण उरत नाही. विचार करा की, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती उलथापालथ झालेली असेल. 

काहींना दैनंदिन कामे करण्यास किंवा त्या संदर्भात नियोजन करण्यात अडचणी येतात. अशा समस्या क्वचित उद्‌भवत असतील तर त्याचा संबंध वाढत्या वयाशी आहे. पण तसे नसेल तर ही अल्झायमर विकाराची प्रारंभिक लक्षणे आहेत, हे लक्षात घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. किंग्ज कॉलेज (लंडन)ने २०१५ मध्ये केलेल्या पाहणीनुसार जगभरात दरवर्षी अवमनस्कतेचे (डिमेन्शिया) ९.९ दशलक्ष रुग्ण आढळले. म्हणजेच दर ३.२ सेकंदाला एक प्रकरण आढळते.

अल्झायमर हा न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आहे. या आजारात स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता आणि काही काळाने साधी कामे करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. या विकार जडलेल्या काहींची वेळ आणि ठिकाणाबाबत गल्लत होते, तर काही जणांची निर्णयक्षमता कमी होत. त्यांच्या स्वभावात तीव्र चढउतार होत असतात. सामान्यपणे वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींमध्ये या विकाराची लक्षणे आढळतात आणि डिमेन्शियासाठी बहुतेक वेळा अल्झायमर हेच कारण असते. यात अनेकदा वागणुकीत बदल होतो, स्नायूंचे समन्वयन करण्यात समस्या निर्माण होते, बोलण्यात सरमिसळ होते किंवा भूक मरते.

आक्रमकपणा, उद्विग्नता, दैनंदिन कामे करणे कठीण जाणे, चिडचिडेपणा, स्वत: उच्चारलेल्या शब्दांचे निरर्थक पुनरुच्चारण, व्यक्तिमत्त्वातील बदल, अस्वस्थपणा, आत्मसंयम गमावणे किंवा निरर्थकपणे भटकणे आणि परतीचा मार्ग न सापडणे असे वागणुकीमधील बदल जाणवतात. याचे कारण म्हणजे मेंदूतील पेशींमधील अनुबंध आणि त्या पेशींचा ऱ्हास होतो, त्या पेशी मृत होतात. परिणामी, स्मरणशक्ती आणि इतर महत्त्वाच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.

 या विकाराबाबत दुर्दैव हे की, इतर अनेक रोगांप्रमाणे याही रोगामध्ये लक्षणे लवकर समजून येत नाहीत. सुरवातीला रुग्ण एखादा शब्द विसरतो किंवा वस्तू हरवतो. आपल्यालाही काही वेळा एखादे नाव, स्थळ आठवताना थोडा डोक्‍याला ताण द्यावा लागतो. आपण म्हणतो, अगदी नजरेसमोर आहे रे, पण आठवत नाही. हे क्षणिक असते. पण अल्झायमरच्या प्रारंभिक काळात हे अनेकदा अनेक बाबतीत घडते. पण ते आपल्याला नेहमीचेच वाटते व ते अल्झायमरचे एक लक्षण असू शकते याकडेच दुर्लक्ष होते. सुरवातीच्या टप्प्यामध्ये कार्यक्षमतेत किंवा स्वावलंबीपणावर परिणाम होत नाही. मात्र पुढील टप्प्यात रुग्णाच्या स्मरणशक्तीवर अधिक परिणाम झालेला दिसून येतो. तो इतका असतो की, रुग्ण खाणे, चालणे, बसणे इत्यादी मूलभूत क्रिया करण्याची क्षमतासुद्धा गमावून बसतो. 

 या आजाराच्या व्यवस्थापनामध्ये सहायक निगा आणि औषधे यांचाच समावेश आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात ‘सेल्युलर थेरपी’ नावीन्यपूर्ण कल्पना साकारत आहे आणि नवी शिखरे गाठण्याचा प्रयत्न करत आहे. त्यायोगे या आधी ज्या रोगांवर उपचार करणे शक्‍य नव्हते त्या रोगांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे. ऱ्हास झालेल्या चेतांवर पूर्वी उपचार करणे कठीण होते, पण सेल्युलर थेरपीने (स्वत:च्या शरीरातील पेशींचा वापर करून) त्या चेतांची पुनर्निर्मिती करणे शक्‍य आहे. मेंदूमध्ये स्टेमसेल अस्तित्वात असल्याने मेंदूविकारांवर उपचार करण्यास मदत करतात. सेल्युलर थेरपीमधील व्यक्तिनिहाय सर्वंकष उपचार नियोजनामुळे मानसिक आरोग्यासाठी स्मरणशक्तीचे व्यायाम, शारीरिक व्यायाम व आहारातील बदल सुचविण्यात येतात. त्याचा रुग्णांना खूप उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.