- डॉ. श्रुतिका जुनागडे – कांकरिया
भारताला जगाची 'मधुमेह राजधानी म्हटलं जातं, ही खरोखरच चिंतेची बाब आहे. 'मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन' आणि 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' यांनी जून २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील १०१ दशलक्ष नागरिक मधुमेहग्रस्त आहेत; तर आणखी १३६ दशलक्ष नागरिकांना मधुमेहाचा धोका संभवतो. मधुमेहामुळे 'डायबेटिक रेटिनोपॅथी' हा गंभीर विकार जडू शकतो. या नेत्रविकरामुळे रुग्णाला अंधत्व येऊ शकतं.
मधुमेहाची समस्या २० ते ७० वयोगटातील नागरिकांमध्ये आढळत असल्यामुळे देशातील कार्यक्षम लोकसंख्येवर याचा थेट परिणाम होतो. वेळेत निदान आणि योग्य उपचार करून मधुमेही अंधत्वाचा धोका कमी करता येतो. परंतु ही व्याधी जडल्यानंतर उपचार सुरू होईपर्यंत होणारं डोळ्याचं नुकसान पूर्णतः भरून काढता येत नाही.
सुरुवातीला मधुमेहाची लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे मधुमेहाकडे दुर्लक्ष होतं. मधुमेहामुळे डोळ्याला ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्त्वांचा पुरवठा करणाऱ्या बारीक रक्तवाहिन्यांचे मोठे नुकसान होत असते. टाईप १, टाईप २ आणि गरोदरपणातील मधुमेह (गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह) असलेल्या प्रत्येक व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका असतो.
डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?
मधुमेहामुळे डोळ्याच्या आतील बाजूस असलेल्या प्रकाश संवेदनशील रेटिनाला (नेत्रपटलाला) रक्तपुरवठा करणाऱ्या लहान केशिकांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे ही व्याधी उद्भवते. डोळ्यातील मॅक्युलामुळे (मध्यवर्ती डोळ्यातील पडदा) आपल्याला वाचन, लिखाण, चेहरा ओळखणं यासारखी सूक्ष्म कामं करता येतात. मधुमेहामुळे खराब झालेल्या केशिकांमधून द्रव आणि रक्त गळतीमुळे त्यावर सूज येते.
(MACULAR Edema) डायबेटिक रेटिनोपॅथीच्या बहुतेक रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. वेळेवर निदान न झाल्यास डोळ्याच्या आत होणारा रक्तस्त्राव, ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट आणि त्यानंतर दृष्टी कमी होणे असे गंभीर परिणाम दिसून येतात. पुढे जाऊन अंधत्वही येऊ शकते.
डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो?
मधुमेहाचा दीर्घ कालावधी : १० वर्षांपेक्षा जास्त
रक्तातील साखरेची उच्च पातळी
उच्च रक्तदाब
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी
कमी हिमोग्लोबिन पातळी (ऍनिमिया)
डायबेटिक नेफ्रोपॅथी
हृदयविकार
डायबेटिक रेटिनोपॅथीसाठीच्या तपासण्या
फंडस्कोपीमध्ये डोळ्यांमध्ये एक औषध टाकून बाहुलीचा आकार मोठा केला जातो. त्यामुळे डोळ्यातील रेटिनाचा भाग स्पष्ट दिसतो.
फ्ल्युरोसीन अँजियोग्राफी (FFA)
हाताच्या रक्तवाहिनीमध्ये एक डाय इंजेक्शनने टोचले जाते. मग एका विशेष कॅमेऱ्याद्वारे पडद्याचे फोटो घेतले जातात. त्यामुळे डोळ्याच्या पडद्याच्या तज्ज्ञांना व्याधीच्या प्रसाराबाबत अंदाज येतो व उपचार ठरवता येतात.
ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी (OCT SCAN)
या चाचणीमुळे मॅक्युलर एडेमा किती प्रमाणात झाला आहे याचे निदान करता येते.
मधुमेहामुळे डोळ्यांच्या खालील समस्या उद्भवू शकतात
मोतिबिंदू
ऑप्टिक न्यूरोपॅथी
काचबिंदू
डिप्लोपिया
मधुमेही रेटिनोपॅथी
तिरळे डोळे
डायबेटिक रेटिनोपॅथीच्या उपचार पद्धती?
व्याधीची तीव्रता आणि व्याप्ती यावरून उपचार ठरतात.
सौम्य प्रकारात रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब यावर नियंत्रण ठेवले तरी या व्याधीची शक्यता कमी होते किंवा टाळता येते.
नेत्रपटलावर सूज (डायबेटिक मॅक्युलर एडीमा)असताना डोळ्यात विशिष्ट इंजेक्शन देऊन सूज कमी केली जाते. यात रुग्णाला वेदना होत नाहीत आणि उपचारांनंतर घरी जाता येते. इंजेक्शननंतर दर महिन्याला ''ओसीटी'' मशीनद्वारे तपासणी करून नेत्रपटलाच्या सूजेची चढ-उतार पाहिली जाते. सूजेचे प्रमाण अधिक असल्यास किंवा केशवाहिन्यांचे जाळे तयार झाल्यास इंजेक्शन किंवा लेसर किरणांद्वारे उपचार केले जातात.
अधिक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून दृष्टी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, त्यापूर्वीच सावध होऊन उपचार करावेत.
मधुमेही मोतिबिंदू मधुमेही रुग्णांमध्ये मोतिबिंदू झाल्यास काय करावे?
मधुमेहींमध्ये सर्वसामान्य रुग्णांच्या मानाने लवकर मोतिबिंदू होण्याची शक्यता असते. त्यावर वेळेत उपचार न केल्यास शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. शस्त्रक्रियेपूर्वी रक्तातील साखर नियंत्रणात असणे आवश्यक असते. हल्ली अद्ययावत तंत्रज्ञानामुळे लहानात लहान छिद्र (२ मिमीहून कमी) घेऊन मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे जखम लवकर भरते आणि शस्त्रक्रियेनंतर होऊ शकणाऱ्या संसर्गाची शक्यता कमी होते.
मधुमेहाच्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करताना डोळ्याची बाहुली मोठी न होणे, मोतिबिंदू चिकटलेला असणे, कृत्रिम लेन्स बसविण्याची जागा (आधार) कमकुवत असणे आशा समस्या उद्भवू शकतात. या गोष्टींचा विचार करून स्पेशल सर्जिकल हुक्स आणि जेलचा वापर करणे गरजेचे असते. डायबेटिक रेटिनोपॅथी असेल तर आधी त्यावर उपचार करून मोतिबिंदू शस्त्रक्रिया करावी लागते.
मधुमेहाच्या रुग्णांनी मधुमेह नियंत्रणात ठेवण्याबरोबरच रेटिना तज्ज्ञांकडून रेटिना आणि ऑप्टिक नर्व्हची नियमितपणे तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
मधुमेहाच्या मोतिबिंदूच्या रुग्णांसाठी कोणती इंट्राओक्युलर लेन्स योग्य आहे?
मोनोफोकल किंवा एडऑफ इंट्राओक्युलर लेन्स मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहेत. योग्य IOL निवडण्यापूर्वी तपशीलवार रेटिनाची आणि रक्तातील साखरेची तपासणी करणे आवश्यक आहे.
एमबीबीएस, ऑफ्थल्मोलॉजी, रेटिना फेलोशीप (संकरा नेत्रालय, चेन्नई) डायबेटिक रेटिनोपॅथी ऑब्झर्वरशीप (अमेरिका)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.