डोकेदुखीची तक्रार करणारे बरेच जण असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना डोकेदुखी का व्हावी, हे एक गूढच आहे. खरे तर क्षुल्लक कारणे असतात, पण वर्षभरात कधीतरी डोके दुखतेच. कितीही डोकेफोड केली तरी डोकेदुखी पूर्णतः टाळणे अजूनही शक्य झालेले नाही.
वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेणाऱ्या रुग्णांमध्ये डोकेदुखीचा त्रास असणारे रुग्ण बहुसंख्य असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे डोके का दुखावे हे एक गूढच आहे. चेहरा, कवटीवरील त्वचेचे आच्छादन, नाकाच्या भागातील हवा जाण्याचे मार्ग, डोळे, कान यामध्ये वेदनेचे स्वीकारक मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय माणसाला आपल्या डोक्यातील आजाराची सतत काळजी वाटते. मेंदूत गाठ तर झाली नाहीये ना अशी (brain tumours) भीती प्रत्येक डोकेदुखीच्या प्रसंगी रुग्णाला घाबरवून सोडते. समाजात ८० टक्के लोकांना एका वर्षात केव्हा ना केव्हा कुठेतरी डोके दुखण्याचा त्रास होतो. यापैकी ९५ टक्के वेळा डोकेदुखीचे कारण क्षुल्लकच असते. त्यातल्या त्यात दीर्घकाळ (काही वर्षे) डोकेदुखीचा त्रास होत असल्यास जिवाला धोका असणाऱ्या आजाराची शक्यता कमीच असते. डोकेदुखी नव्याने (काही त्रास) सुरू झालेली असेल, डोकेदुखी अकस्मात सुरू झाली असली, ताप येत असला, मान पुढे-मागे हलविणे त्रासदायक वाटत असले (neek sliffness), शरीराच्या एखाद्या भागात सातत्याने कोणताही त्रास, कमजोरी वा वेदना जाणवत असल्यास, कानाच्या पुढच्या आणि वरच्या रक्तवाहिन्या दुखऱ्या झालेल्या असल्या (Temporal artey tenderness : giant cel arterilis) तर या तक्रारी दखलपात्र आजाराकडे बोट दाखवतात.
मेंदूतील गंभीर आजार नाही ना हे पाहणे नेहमीच आवश्यक असते. तथापि सर्वसाधारणपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे डोकेदुखीची तक्रार सांगणाऱ्या रुग्णांपैकी ५ टक्केसुद्धा रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त झालेले नसतात.
मायग्रेन (अर्धशिशी) आणि कवटीच्या बाहेरच्या बाजूच्या स्नायूंचे दीर्घकाळ आकुंचन (टेन्शन हेडएक) ही दोन कारणे बहुतेकांच्या डोकेदुखीला कारणीभूत असतात. रुग्णाच्या तक्रारी नीट ऐकून घेऊन बहुतेक वेळा हे आजार समजू शकतात. डोके दुखण्याचा प्रकार समजणे (घणाघाती डोके दुखणे, घट्ट दाब आल्याची भावना येणे, चमका मारणे) आणि काळजीपूर्वक शारीरिक तपासणीनंतर वेदनाशामक औषधांचा वापर क्षम्य असतो. डोके दुखण्याची जागा तपासणे, रुग्णाचा रक्तदाब नोंदणे, डोळ्याच्या नेत्रपटलाची तपासणी (fundus examination) या प्रकारे रुग्णाच्या शरीराची तपासणी केल्यावर डोक्याचा स्कॅन करण्याबद्दल निर्णय घेता येतो.
मायग्रेन (अर्थशिशी)
मायग्रेन या आजारात आनुवंशिकता महत्त्वाचा भाग घेते. जेव्हा डोके दुखू लागते त्या वेळी विविध संवेदना अधिकाधिक तीव्र होतात. साधा प्रकाशदेखील असह्य उजेड वाटू लागतो. आजूबाजूचे नेहमीचे आवाज कर्कश जाणवू लागतात. सौम्य हालचालीदेखील मोठ्या प्रमाणात श्रम केल्यासारख्या वाटतात. मेंदूतील काही भागात अतिरेकी संवेदनशीलता निर्माण झाल्याने असे परिणाम जाणवतात. या भागात रक्ताचा पुरवठा वाढलेला स्कॅनमध्ये दिसतो. ट्रायजेमिनल नर्व्हमधील पॅरा-सिंपथॅटिक नर्व्हस (para - sympa Inatic) ध्ये हा बदल विशेषकरून आढळतो. डोके दुखण्याच्या सुरवातीला (डोके दुखण्यापूर्वी) मेंदूच्या कॉर्टेक्स या भागातील ज्ञानतंतूच्या पेशीतील कार्य कमी कमी होण्याची एक लाट पसरते; या वेळी या भागात रक्ताचा पुरवठादेखील कमी होतो. ट्रायजेमिनल नर्व्हच्या टोकातून स्रवले जाणारे रासायनिक रेणू (न्यूरो-पेप्टाइडस्) वेदनेला जबाबदार असतात. या रेणूंच्या जोडीला हिस्टॅमिन, सिरॉटॅनिन, प्रॉस्टाग्लाण्डिनस आणि नायट्रिक ऑक्साइड या रेणूंमुळे रक्तवाहिन्या रुंदावतात.
मायग्रेनमध्ये तीव्र डोके दुखते. ही डोकेदुखी काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत टिकते, तरीसुद्धा एकूण डोके न दुखण्याचा काळ हा डोकेदुखीच्या काळापेक्षा खूपच जास्त असतो. सामान्यपणे मायग्रेनची डोकेदुखी महिन्यातून एकदा होते. आठवड्यात दोनापेक्षा जास्त वेळा जास्त असल्यास रुग्णाला दुसरे कोणतेतरी डोकेदुखीचे कारण असावे, असे अनुमान काढता येते. २० टक्के रुग्णांना डोकेदुखीची पूर्वसूचना मिळते (ऑरा). ही पूर्वसूचना सामान्यतः १/२ (अर्धा) तास टिकते. या सूचनेचे स्वरूप डोळ्यासमोर प्रकाशाच्या लाटा येणे असे असते. काही वेळा नजरेतील एखादा भाग दिसेनासा होतो. काही व्यक्तींना आपल्या शरीराचा एखादा भाग खूप मोठा झाल्याचा भास होतो. काहींना तोल जातो किंवा सभोवतालच्या गोष्टी गोल फिरत आहे, अशी भावना जाणवते. या अशा पूर्व सूचनांनंतर अर्धशिशी सुरू होते (एक बाजू उजवी किंवा डावी), डोकेदुखी तीव्र असते, घणाघाती ठोके पडल्याप्रमाणे जाणवते. हालचाल केल्याने डोकेदुखी वाढते. आवाज सहन होत नाही. उजेड नकोसा वाटतो. अंधाऱ्या शांत जागेत पडून राहावेसे वाटते. मळमळ होते, उलटीदेखील होते.
‘टेन्शन’ प्रकारची डोकेदुखी
मायग्रेन आणि ‘टेन्शन’ प्रकारची डोकेदुखी हे दोन्ही प्रकार मेंदूत घडणाऱ्या सारख्याच घटनांचे परिणाम असावेत. टेन्शन प्रकारची डोकेदुखी रुग्णाला रोजच जाणवते. मायग्रेनमध्ये रुग्णाला होणारे इतर त्रास टेन्शन प्रकारात नसतात. उदाहरणार्थ, उजेड सहन न होणे, आवाजाचा त्रास होणे, मळमळणे किंवा उलटी होणे, माथा दुखतो, कपाळ दुखते किंवा मान दुखते. टेन्शन डोकेदुखी बहुतेक वेळा दोन्ही बाजूला असते. डोक्याच्या भोवताली एक पट्टा बांधलेला आहे आणि तो अधिकाधिक आवळला जात आहे, असे वर्णन रुग्ण करतात. सहसा वेदना डोक्याच्या दोन्ही बाजूला जाणवतात. ‘मस्तक फुटेल की काय’ अशी किंवा डोक्यात धारदार सुऱ्या खुपसल्या जातात, अशी तक्रार रुग्ण करतात. दिवसाअखेर, संध्याकाळी, डोके दुखण्याची शक्यता वाढते. या आजारात वेदनाशामक द्रव्यांचा वापर त्रासदायक होईल इतका वाढतो. त्या दृष्टीने ॲमिट्रिप्टिलीन (amitriptyuline) या औषधाचा उपयोग चांगला होतो. योगासने आणि प्राणायम, शवासन यांचादेखील विशेष फायदा होतो.
मायग्रेन आणि टेन्शन डोकेदुखीप्रमाणे एक त्रासदायक प्रकार म्हणजे ‘क्लस्टर हेडेक’ या प्रकारांचीदेखील ओळख करून घेऊ.
‘क्लस्टर’ डोकेदुखी
चेहऱ्यावरून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या व मेंदूत त्या संवेदनांची जाणीव होण्यास महत्त्वाचा भाग घेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरेला ट्रायजेमिनल नर्व्ह (Trigeminal nerve) म्हणतात. या प्रकारच्या शिरांत अनैच्छिक चेतना नेणाऱ्या सूक्ष्म शिरांचादेखील (autonomic) समावेश असतो. या ऑटोनॉमिक शिरा अश्रू स्रवणाऱ्या ग्रंथींना चेतवू शकतात. ट्रायजेमिनल शिरेतून चेहऱ्यावरून संवेदना (स्पर्श, वेदना, उष्णता इ.) मेंदूकडे जातात आणि या ऑटोनॉमस शिरांच्या कार्यामुळे अश्रू स्रवले जातात. बळ जाते. मुखाच्या आतील अस्तराचा योग्य ओलावा टिकवला जातो. या ट्रायजेमिनल शिरेत निर्माण झालेल्या काही दोषांमुळे चेहऱ्यावर वेदना जाणवतात. सहसा या वेदना अल्पकाळ टिकतात आणि ज्या बाजूच्या (उजवी अगर डावी) ऑटोनॉमिक शिरांच्या कार्यात बिघाड जाणवतो. त्या बाजूचे डोके तीव्र वेदनेने ग्रासले जाते. ही डोकेदुखी १५ मिनिटे ते ३ तास टिकू शकते. वेदनेची सुरवात डोळ्याच्या खोबणीत अथवा कानाच्या वरच्या भागात होते. सुरवात काही क्षणात होते. त्याचप्रमाणे डोके दुखणे थांबते तेदेखील अल्प काळात बंद होते. आग-आग होते, टोचल्यासारखे दुखते, घणाघाती (ठोके पडल्यासारखे) जाणवते. डोळा लाल होतो, कपाळावर घाम सुटतो, डोळ्याची बाहुली बारीक होते, पापणी उतरते (डोळा बंद होतो) अश्रू वाहू लागतात. पापणी सुजते आणि नाकपुडी चोंदते.
क्लस्टर या शब्दाचा अर्थ एकत्र असणारा पुंजका. ही डोकेदुखी दिवसाकाठी एकदा किंवा दोनदा होते आणि काही आठवडे होत राहते. मधेच एक-दोन आठवडे वेदनारहितही जातात. मद्यपानाने डोकेदुखीचा झटका सुरू होणे शक्य असते. एकदा डोके दुखू लागले की रुग्ण खोलीत येराझाऱ्या घालू लागतो. डोके दुखणे थांबावे या इच्छेने प्रेरित होऊन दुखणारा डोळा मुठीत पकडण्याचा प्रयत्न अनेक रुग्ण करतात. मायग्रेन या अर्धशिशीच्या प्रकारात या उलट रुग्णाला स्वस्थ बसावे किंवा अंधाऱ्या खोलीत पडून राहावे असे वाटत राहते. सुमॅट्रिप्टन (Sumatriptan) नावाच्या औषधाचे इंजेक्शन घेण्याने हा डोकेदुखीचा झटका लवकर थांबतो. १०० टक्के प्राणवायू (Oxygen) हुंगत राहण्याचादेखील वेदना शमवण्याकरता उपयोग होतो.
तोंडाने घेतलेल्या कॉर्रिकोस्ट्रेरॉइडच्या गोळ्या व कॅफर्गढच्या गोळ्यांचादेखील तात्पुरता वेदना शमण्याकडे उपयोग होतो. कॅफर्गढ गोळीचा डोस अर्धी गोळी दर अर्ध्या तासाने ३ वेळा घेणे असा असतो. अशी गोळी २ आठवड्यांपेक्षा जास्त घेणे धोक्याचे असते. कारण त्यातील इर्गट या रेणूमुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे किंवा रक्तवाहिन्या बंद पडणे असा धोका निर्माण होणे शक्य आहे. दीर्घकाळ प्रतिबंध करण्यासाठी व्हेरापामिल हे औषध अत्यंत उपयुक्त ठरलेले आहे.
व्हेरापामिल हे औषध वाढलेल्या रक्तदाबाच्या उपचारासाठी नेहमी वापरले जाते. हे बाजारात कॅलॉप्टिन (Calaptin) या नावाने सहज उपलब्ध होऊ शकते.
काही रुग्णांना थोड्या वेळापुरती अशीच एका बाजूला डोकेदुखी जाणवते. क्लस्टर डोकेदुखी व या अल्पकाळ (५० सेकंद) टिकणाऱ्या डोकेदुखीत फरक म्हणजे अशा प्रकारची डोकेदुखी तासाला ३० वेळापर्यंत डोके दुखते. अनैच्छिक मज्जासंस्थेच्या कार्यातील दोषांमुळे हा त्रास होतो. याला एसयूएनसीटी (Short lasting Unilateral Neuralgi form headedic attacks with conjunetival injection and tearing) असे नाव आहे. या आजाराचा उपचार कठीण असतो. कार्बामेझापीन (मॅझेटॉल) आणि लॅमोट्रिजिन (lamotrigine) या औषधांचा वापर केला जातो आणि काही फायदाही होतो.
डोकेदुखी हा आजार दुर्लक्ष करण्याजोगा नाही. कोणत्या रुग्णाला त्यातून मोठा त्रास आणि गंभीर आजार निर्माण होईल याचा आधी अंदाज करणे कठीण असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.