वाढलेले वजन व सतत उभे राहण्याची आवश्यकता, यामुळे पायाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्वचेखालील चरबीला सूज येऊ शकते.
पायातील रक्तवाहिन्यांकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळे आले की त्रास सुरू होतो. व्हेनस इन्सफिशिअन्सी या आजारात पायातील रक्तवाहिन्यांमधून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात कमतरता निर्माण होते. त्यामुळे व्हेरिकोसायटिस होतो. यात पायातील रक्तवाहिन्या सुजतात. जे खूप काळ उभे राहतात, त्यांच्यात हा आजार दिसून येतो. लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिस हासुद्धा साधारण असाच आजार आहे. यात पायातील खालच्या भागातील त्वचेचा रंग बदलतो. पण, त्याचा व्हेरिकोस व्हेन्सशी संबंध नसतो. हा एक प्रकारचा पॅनिक्युलिटिस आहे. यात त्वचेखालील चरबीला सूज येते.
लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिस ही वाढत जाणारी तंतुमय प्रक्रिया आहे. यात कालांतराने त्वचा काळवंडत जाते आणि कठीण होते. या आजाराचे निश्चित कारण अज्ञात आहे. पण, पायातील रक्तवाहिन्यांवर वाढलेल्या दाबामुळे (व्हेनस हायपरटेन्शन किंवा व्हेनस इनकम्पिटन्स) हा आजार होत असावा. यामुळे द्रव किंवा प्रथिने रक्तवाहिनीमधून बाहेर पडतात. परिणामी, फायब्रॉसिस होतो आणि त्वचेच्या खालील थराला सूज येते. कदाचित ऊतींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांची कमतरता भासत असावी. यासंदर्भात अत्यंत मर्यादित माहिती आहे. पण, व्हेनस इनसफिशिअन्सीमुळे होणाऱ्या व्हेरिकोस व्हेन्स, व्हेनस एक्झेमा या आजारांपेक्षा लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिस हा आजार दुर्मीळ आहे.
रुग्णाला पायात वेदना होऊ शकतात, सूज येऊ शकते आणि त्वचा कठीण होते आणि रंग उतरतो. खाज, त्वचेचे पापुद्रे निघणे ही लक्षणेसुद्धा दिसू शकतात. गंभीर स्वरूपाच्या लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिसमध्ये वेदना होतात, लालसर चट्टे पडतात, जांभळ्या रंगाचे कठीण पट्टे तयार होतात आणि ते सामान्य त्वचेहून वेगळे दिसतात आणि त्याला पांढऱ्या रंगाची कडा असू शकते. हा आजार दीर्घकाळापासून असेल तर घोट्याच्या वर सूज आल्यासारखे दिसू शकते. त्यामुळे पाय उलट्या ठेवलेल्या शॅम्पेनच्या बाटलीसारखा दिसतो. दीर्घ काळ उभ्या राहणाऱ्या व्यक्तींमध्ये अल्सरेशनही दिसून येते.
लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिससाठी स्थूलपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे. वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल किंवा व्यक्ती स्थूल असेल तर रक्तवाहिन्यांवर, विशेषत: वजन पेलणाऱ्या रक्तवाहिन्यांवर अधिक दाब पडतो. त्यामुळे कालांतराने त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. या आजारावर उपचार करण्यासाठी वजनाचे व्यवस्थापन, जीवनशैलीतील बदल हे मुख्य पैलू असतात.
पारंपरिकदृष्ट्या हळूहळू दाब देणे ही उपचारपद्धती अवलंबली जात होती. औषधे आणि शस्त्रक्रियेचाही वापर करण्यात आला आहे आणि त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून आले. या रुग्णांना खूप काळासाठी बसणे किंवा उभे राहणे टाळण्यास सांगावे. पाय उन्नत स्थितीत ठेवणे आणि नियमित फिजिओथेरपी व्यायाम केल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत, यासाठी काही रुग्णांना औषधे दिली जातात. काही गंभीर प्रकरणांमध्ये रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिसवर पेशीवर आधारित उपचारपद्धतीचा अवलंब करून अधिक परिणामकारकपणे उपचार केले जाऊ शकतात. आपल्या शरीरातील मेसेन्चिमल पेशींमध्ये स्वनवीकरण करण्याची आणि सूजरोधक इम्युनोमोड्युलटरी गुणधर्म (प्रतिकारक क्षमता वाढविणारी) असतात. जेव्हा या पेशींचे संबंधित रक्तवाहिन्यांच्या बाजूला रोपण केले जाते तेव्हा त्या पेशी व्हॅस्क्युलर एंडोथेलिअल पेशी आणि मृदू स्नायूंच्या पेशींमध्ये विभागल्या जाऊ शकतात. या माध्यमातून आपण कोलाजेनचा स्तर जाड करू शकतो आणि रक्तवाहिन्यांचे पडदे लवचिक करू शकतो. मेसेन्चिमल स्टेम सेल्स इजा झालेल्या किंवा सूज आलेल्या जागी जातात आणि नुकसान झालेल्या ऊतींची पुनर्निर्मिती करतात. या पेशी आजूबाजूच्या पेशींची झपाट्याने वाढ होण्यासाठी आणि विभागणी होण्यासाठी चालना देतात आणि वाढीस पोषक असलेल्या द्रवाचे स्त्रावण करून आणि मेट्रिक्सची पुनर्रचना करून इजाग्रस्त पेशी पूर्ववत होण्यासाठी मदत करतात. हायपरबेरिक ऑक्सिजनच्या पूरक उपचारांमुळे हायपॉक्सिक ऊतींचे द्रवनिवेशन होते, ज्यामुळे आजार बरा होण्यास चालना मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.