आयुर्वेदातील नाडीशास्त्र आहे तरी काय? 

balaji-tambe
balaji-tambe
Updated on

वैद्याने नाडी पाहिली की त्याला सगळे कळते, असा सर्वसामान्यांमध्ये बऱ्याच वेळा समज असलेला दिसतो. आयुर्वेदामध्ये प्रकृतिपरीक्षणासाठी वेगवेगळ्या परीक्षा सांगितलेल्या आहेत. या अष्टविध परीक्षा झाल्यानंतर, रुग्णाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर, त्याने सांगितलेले त्रास व लक्षणे समजून घेतल्यानंतर रुग्णाच्या शरीरात कुठल्या दोषांमध्ये असंतुलन झालेले आहे, कुठला रोग आहे, तो कसा वाढला आहे, कुठल्या धातूत रोग झालेला आहे, झालेला रोग कसा बरा करता येईल हे सगळे नक्की केले जाते. या परीक्षणामध्ये नाडी हा शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा भाग. त्यापूर्वी मल, मूत्र, जिह्वा, शब्द, स्पर्श, डोळे, आकृती यांचे परीक्षण केलेले असते. नाडीज्ञान होण्यासाठी रोगी एका विशिष्ट अवस्थेत असावा लागतो. वैद्याची तर्जनी रुग्णाच्या मनगटावर अंगठ्याखाली, त्याखाली मध्यमा व त्याखाली अनामिका अशा तऱ्हेने हातात हात धरून नाडीचे परीक्षण केले जाते. नाडीची गती, नाडीतून वाहणाऱ्या द्रव्याची उष्णता व घनता, नाडीत असलेला जोर व आयुर्वेदशास्त्राने वर्गीकरण केल्यानुसार सर्पाप्रमाणे जाणारी वाताची नाडी, बेडकाप्रमाणे जाणारी पित्ताची नाडी व हंसगतीने जाणारी कफाची नाडी असे नाडीचे परीक्षण केले जाते. नाडी परीक्षणाच्या वेळी हे प्राणी अशासाठी सांगितले की, त्यांचा एकूण स्वभावासारखाच स्वभाव नाडीचा आहे हे लक्षात येते. नाडी स्वतःची जागा सोडून कुठे दिसते, नाडी क्षीण झालेली आहे का, तसेच कुठल्या बोटाखाली नाडी लागली तर शरीरात कुठला दोष आहे याचे ज्ञान होते. नाडीचे स्थौल्य, नाडीची स्थिरता, नाडीची गती हे सर्व बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळू शकतात. नाडीचा सूक्ष्म भाग कळण्यासाठी वैद्याला उपासनेची गरज असते. उपासनेमुळे नाडीची तरलता जाणून घेण्याची वैद्याची क्षमता वाढते. वैद्याने केलेल्या नाडीपरीक्षणावरून रोग्याच्या शरीरात कुठला दोष उत्पन्न होतो आहे का व होत असल्यास दोष कुठल्या स्थानात उत्पन्न होत आहे हे कळू शकते. 

नाडीवरून व्यक्‍तीची प्रकृती साम्यावस्थेत आहे, वात, पित्त वा कफाची आहे, की त्रिदोषज हे कळू शकते. रुग्ण ज्या ऋतूत आलेला आहे त्या ऋतूनुसार व तो दिवसाच्या कोणत्या वेळेला आला आहे, त्या वेळी नाडीत होणारे बदल लक्षात घेऊन त्याच्या प्रकृतीबद्दल निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे नुसती नाडी पाहून प्रकृतीबद्दल संपूर्ण ज्ञान होते, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक परीक्षणामध्ये त्या त्या परीक्षणाचा जो भाव आहे तो निश्‍चित होतो. रोग्याला स्पर्श करत असताना त्याचे सांधे, हाडांची आतली अवस्था कळू शकते. शरीराच्या उष्णतामानावरून त्याच्या शरीरातील अग्नीची व पित्ताची कल्पना येऊ शकते. 

"वैद्याने नाडी पाहिली, पण रोग्याच्या नाकात वाढलेला अर्बुद (पॉलिप) वैद्याला कसा कळला नाही' असा प्रश्न एखाद्या वेळी विचारला जातो. नाडीवरून सर्व कळते, अशा गैरसमजातून असा प्रश्न विचारला गेलेला असतो 
आपल्या उपासनेतून काही वैद्यांची तरलता वाढलेली असल्यामुळे नाडी पाहून रोग्याने दुपारच्या जेवणात काय खाल्लेले आहे हे सांगू शकत असत. नाडीवरून इतर काही घटना किंवा त्याचे आई-वडिलांशी असलेले साधर्म्य किंवा वंशपरंपरेने आलेले त्रास वगैरे कळू शकतात, परंतु या गोष्टी प्रत्येक वेळी व प्रत्येक वैद्याला कळतीलच असे नाही. अर्थात या इतर माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हेही त्याच वैद्याला माहीत असते. 
नाडीपरीक्षण किंवा अष्टविध परीक्षा करण्यापूर्वी रोगी वैद्याकडे येत असताना कुठल्या दिशेने आला, त्याच्या बरोबर कोण आले आहे, रोगी उठतो कसा, बसतो कसा, त्याची चाल कशी आहे याचाही विचार आयुर्वेदाने केलेला आहे. वैद्यावर संपूर्णतः विश्वास ठेवून रोग्याने आपल्याला होत असलेला त्रास स्पष्टपणे सांगणे अपेक्षित असते. रोग्याच्या पोटात काही त्रास असला तर आधुनिक वैद्यकात त्याची सोनोग्राफी पायाच्या नखापासून डोक्‍यापर्यंत केली जात नाही, त्याच्या उजव्या बाजूला दुखते की डाव्या बाजूला दुखते ते पाहून त्यानुसार सोनोग्राफी केली जाते व दोष आहे का हे समजून घेतले जाते. होणारा त्रास रुग्णाने स्पष्ट करायचा असतो आणि दोष कशामुळे उत्पन्न होतो आहे व उत्पन्न झालेला दोष कसा बरा करायचा हे वैद्याने ठरवायचे असते. नाडी पाहण्याने सर्व काही कळते ही चुकीची अपेक्षा ठेवल्यास अविश्वास उत्पन्न होऊ शकतो व घेतलेल्या इलाजांचा, उपचारांचा, औषधांचा लाभ पूर्णपणे उचलता येत नाही. 

एखादी औषधयोजना केल्यानंतर त्यापासून काही रिऍक्‍शन येण्याची शक्‍यता असली तर तशी माहिती रोग्याला देणे आवश्‍यक असते. परंतु एखाद्या रुग्णाला विरेचन दिले असता त्याला काय होण्याची शक्‍यता आहे हे सांगणे व्यवहाराला धरून होणार नाही. कारण तसे करायचे ठरविले तर प्रत्येक रुग्णाला प्रत्येक वेळी एक मोठे प्रवचन द्यावे लागेल. ज्यांना अशी अधिक माहिती मिळविण्याची इच्छा आहे त्यांनी आयुर्वेदाच्या पुस्तकातून माहिती घेणे इष्ट ठरेल. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.