माझा नातू सहा महिन्यांचा आहे, त्याला वरचे अन्न कधी सुरू करावे? नातवाच्या वेळी ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या आपल्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला होता. बाळ निरोगी व सुंदर आहे. माझी मोठी नात सहा वर्षांची आहे. तिला वारंवार सर्दी, खोकला होतो. संतुलनचे सीतोपलादी देतो, तरी आणखी काय द्यावे? कृपया मार्गदर्शन करावे.
...साळी
उत्तर - ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकाचा उपयोग झाल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद. पुस्तकात मार्गदर्शन केल्याप्रमाणे अन्नप्राशन संस्कार सहाव्या महिन्यात करायचा असतो, त्यामुळे आता नातवाला वरचे अन्न देण्यास सुरुवात करता येईल. सहसा रव्याची खीर देऊन अन्नप्राशन संस्कार केला जातो. त्यानंतरही बाळाला कोणते अन्न कोणत्या वेळी द्यायचे असते, हे ‘गर्भसंस्कार’ पुस्तकातून समजून घेता येईल. मोठ्या नातीला प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित अभ्यंग करण्याचा, ‘सॅनरोझ’सारखे रसायन देण्याचा उपयोग होईल. काही दिवस ‘ब्राँकोसॅन सिरप’ देण्याचाही फायदा होईल. सर्दी- खोकला होतो आहे असे जाणवू लागले, की छातीला व पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेक करण्याचाही उपयोग होईल. दही, चीज, सीताफळ, आइस्क्रीम, पेरू, चिकू, केळे वगैरे पदार्थ आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर.
-------------------------------------
या पूर्वीही मी आपल्याला प्रश्न विचारला होता, त्यातल्या सल्ल्याने मला फार फरक जाणवला, यासाठी खूप आभार. माझ्या वडिलांना त्वचारोग आहे. संपूर्ण शरीरावर लाल चट्टे पडतात व त्याठिकाणी खूप आग होते. पोट साफ होत नाही व अंगात उष्णता जाणवते. ‘फॅमिली डॉक्टर’मधील मार्गदर्शनामुळे पन्नास टक्के सुधारणा आहे; पण तरीही अजून त्रास होतो. कृपया मार्गदर्शन करावे.
... गर्णे
उत्तर - इतक्या वर्षांपासून व खूप प्रमाणात त्रास आहे, तेव्हा यावर शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणे सर्वांत चांगले. विशेषतः उष्णता कमी होण्यासाठी, आतड्यांची शुद्धी होण्यासाठी विरेचन व बस्ती हे उपचार उत्तम असतात. तत्पूर्वी वडिलांना नियमित पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. रोज सकाळ- संध्याकाळ एक-एक चमचा पंचतिक्त घृत तसेच ‘अनंतसॅन’ गोळ्या, ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. स्नानाच्या वेळी साबणाऐवजी मसुराचे पीठ व ‘सॅन मसाज पावडर’ हे उटणे निम्मे निम्मे मिसळून वापरणे श्रेयस्कर. आहारातून तेल व गहू वर्ज्य करणे व त्याऐवजी साजूक तूप, तांदूळ, ज्वारी, नाचणी वगैरे धान्ये व वेलीवर वाढणाऱ्या पथ्यकर भाज्या यांचा समावेश करणे हेसुद्धा आवश्यक.
-------------------------------------
माझे बऱ्याच वर्षांपासून चालताना पाय दुखत असत; पण त्याकडे दुर्लक्ष झाले. सहा महिन्यांपूर्वी तपासण्या केल्या, त्यात यूरिक ॲसिड वाढलेले आढळले. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेतल्यावर ते कमी झाले, त्यामुळे गोळ्या बंद केल्या; पण पायाला सूज येऊन दुखणे सुरू झाले. तपासणीत पुन्हा यूरिक ॲसिड वाढलेले सापडले. कृपया कायम गोळ्या घ्याव्या लागू नयेत म्हणून काही उपाय सुचवावा.
... अभंग
उत्तर - या प्रकारच्या त्रासावर मुळापासून आणि प्रभावी उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने शरीरशुद्धी करून घेणे. तत्पूर्वी जेवणानंतर अविपत्तिकर किंवा ‘सॅनकूल’ चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. सकाळ- संध्याकाळ कामदुधा तसेच ‘संतुलन वातबल’ या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. जेवणानंतर पुनर्नवासव, उशिरासव घेणे; दिवसभर प्यायचे पाणी उकळून घेतलेले असणे, सकाळी साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे; तिखट, तेलकट, आंबवलेले पदार्थ, तसेच रासायनिक खते वापरून शेती केलेल्या भाज्या-फळे आहारातून टाळणे हेसुद्धा चांगले.
-------------------------------------
मला बरेच वर्ष उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, परंतु नियमित गोळ्या घेण्याने तो नियंत्रणात आहे. मी रोज सकाळी ॐकार करते, खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळते, संध्याकाळी चालायला जाते. बाकी तब्येत ठीक आहे, मात्र शौचाला खडा होतो. हा त्रास बरा होण्यासाठी काही उपाय सुचवावा.
.... साधना मराठे
उत्तर - आतड्यांमध्ये उष्णता व कोरडेपणा असला तर शौचाला खडा होऊ शकतो. रक्तदाबाची गोळी घेणे अपरिहार्य असले तरी तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने याची मात्रा कमीत कमी करणे श्रेयस्कर. बरोबरीने जेवणानंतर चमचाभर ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप मिसळून घेणे, एरवीसुद्धा आहारात तीन- चार चमचे साजूक तुपाचा समावेश करणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी पोटाला तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्यानेही पोटातील कोरडेपणा कमी होऊन शौचाला नीट होण्यास मदत मिळेल. दहा- पंधरा दिवसांतून एकदा रात्री झोपण्यापूर्वी दोन- अडीच चमचे एरंडेल घेऊन सकाळी पोट साफ होऊ देण्याचाही उपयोग होईल. एकंदर अग्नीची कार्यक्षमता सुधारावी, पचन नीट व्हावे व मलशुद्धी नीट व्हावी यासाठी जेवताना गरम पाणी पिणे व जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळी घेणे उपयुक्त असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.