प्रश्नोत्तरे

Question and Answer
Question and Answer
Updated on

माझी मुलगी २५ वर्षांची आहे. तिला सहा वर्षांपासून पीसीओडीचा त्रास आहे. यामुळे तिची पाळी अनियमित आहे, वजन वाढले आहे, केस गळत आहेत. आता तिचे लग्नाचे वयही झाले आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे. 
..... शरयू 
 बऱ्याच वर्षांपासून त्रास आहे, तेव्हा लवकरात लवकर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आवश्‍यक होय. नियमित पाळी हा स्त्रीसंतुलनाचा आरसा असतो आणि स्त्रीसंतुलनावर स्त्रीचे आरोग्य, सौंदर्य, उत्साह, शरीरबांधा वगैरे इतर सर्व भाव अवलंबून असतात. वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषधे घेणे उत्तम. बरोबरीने ‘फेमिसॅन तेल’ वापरणे, ‘फेमिनाईन बॅलन्स आसव’, चंद्रप्रभा, शतावरी कल्प घेणे चांगले. सकाळी अनशापोटी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेणे, सूर्यनमस्कार, नियमित चालणे, वजन कमी होण्यासाठी अभ्यंग करणे याही उपायांचा फायदा होईल. केसांच्या सशक्‍ततेसाठी ‘हेअरसॅन’ या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. ‘स्त्रीसंतुलन’ हे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, एक दिवसाआड ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे हे सुद्धा श्रेयस्कर. आधी हे सर्व त्रास कमी करून मगच पुढचे पाऊल उचलणे योग्य ठरावे. 

मी दै. ‘सकाळ’ व ‘फॅमिली डॉक्टर’ पुरवणी नेहमी वाचते. माझे वय ५८ वर्षे आहे. मला अंगात उष्णता जाणवते. म्हणजे खूप थंडी वाजते, तिखट खाता येत नाही, ओठ कडेला चिरतात, केस गळतात. शीतली प्राणायाम केला की तात्पुरते बरे वाटते. कृपया यावर अजून काही उपाय सुचवावा. 
..... कविता पाटील 
 शीतली प्राणायाम नियमित करणे चांगलेच होय. बरोबरीने आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे, आहारात किमान पाच चमचे घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे हे उपाय योजण्याचा उपयोग होईल. रात्री झोपताना नाभीच्या भोवताली ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याने ओठ चिरणे थांबेल. सकाळ संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा, ‘हेअरसॅन’ गोळ्या घेणे याचाही उपयोग होईल. एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन करून घेण्याने सुद्धा शरीरातील अतिरिक्‍त उष्णता कमी होण्यास मदत होईल. 

 

मी दै. ‘सकाळ’चा गेली तीस वर्षे नियमित वाचक आहे. ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मागदर्शन फारच उद्बोधक असते. माझे वय ६५ वर्षे असून माझे ट्रायग्लिसेराईडस्‌ वाढलेले म्हणजे २४४ इतके झालेले आहे. हे कमी करण्यासाठी काही पथ्य अगर औषधोपचार सुचवणे. 
..... जे. कुलकर्णी 
 ट्रायग्लिसेराईडस्‌ वाढणे हे लक्षण सहसा अपचनाशी, तसेच अपचनातून तयार होणाऱ्या आमविषाशी संबंधित असल्याचे आढळते. आम पचवण्यासाठी जाठराग्नीची सक्षमता वाढणे गरजेचे आहे. या दृष्टीने जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या तसेच लवणभास्कर चूर्ण घेणे, जेवताना तसेच एरवीही अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे, स्वयंपाक करताना तिखट किंवा मिरचीऐवजी आल्याचा वापर करणे हे उपाय सुरू करता येतील. काही दिवस तेलाऐवजी घरी बनविलेल्या साजूक तुपात स्वयंपाक करणे, संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर व द्रव स्वरूपात म्हणजे मुगाचे कढण, आमसुलाचे सार, भाज्यांचे मिश्रित सूप, अगदीच भूक लागली तर ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी अशा प्रकारे योजणे चांगले. तीन-चार महिने हे बदल करून तपासणीमध्ये सुधारणा आढळते, अन्यथा वैद्यांचा सल्ला घेणे आवश्‍यक होय. 

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाबद्दल मी आपली आभारी आहे. आपल्या मार्गदर्शनाचा मला व माझ्या मुलांना खूपच फायदा झालेला आहे. मी ४७ वर्षांची आहे. मला आजार असा काही नाही, परंतु काही महिन्यांपासून माझी जीभ काळपट झाली आहे. त्याचे कारण काय असेल व यावर काही उपाय सुचवावा. 
.
.... शकुंतला आपटे. 
उत्तर - शरीरावर कुठेही काळपटपणा येणे हे वाताचे एक लक्षण असते. याचा जरी त्रास होत नसला तरी वातदोष कमी होण्यासाठी सकाळी इरिमेदादी तेलाचा किंवा ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करण्याचा म्हणजे अर्धा ते एक चमचा तेल नुसते किंवा थोड्या पाण्यासह आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, दशमूळघनवटी घेण्याचा तसेच नियमित अभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. 

 

 माझ्या पायाच्या तळव्यांना भेगा पडतात व त्यामुळे फार वेदना होतात. हिवाळ्यात व कडक उन्हाळ्यात भेगांमधून रक्‍त येते. तसेच मला दुपारी झोपेची सवय आहे. एखाद्या दिवशी झोपले नाही तर माझे डोके खूप दुखते. प्रवासानंतरही सहसा माझे डोके दुखते, काही वेळा उलटीही होते. या सर्व तक्रारींवर काय उपाय करावा हे कृपया सांगावे. 
....अस्मिता पाटील 
एकंदर सर्व लक्षणांवरून शरीरात उष्णता वाढलेली आहे व रक्‍तात दोष तयार झालेला आहे असे दिसते. या दोन्हींसाठी दुपारी झोपणे तितकेसे योग्य नाही. कारण दुपारी झोपण्याने पित्तदोष वाढत असतो. तेव्हा दुपारी आडवे होऊन न झोपता आरामखुर्चीवर किंवा सोफ्यावर बसल्या बसल्या डुलकी घेणे चांगले. यामुळे विश्रांती तर मिळेलच पण उष्णता वाढणार नाही. तळपायांच्या भेगेवर ‘संतुलन सोल क्रीम’ लावण्याचा, तसेच आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. काही दिवस ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. आंबट दही, चिंच, कच्चा टोमॅटो, ढोबळी मिरची, गवार, वांगे वगैरे गोष्टी आहारातून टाळणे श्रेयस्कर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.