खाद्यभ्रमंती : भिगवणची श्री जगदंब मच्छी खाणावळ

पुण्याहून सोलापूरला जात असताना भिगवण येण्याच्या आधीपासूनच चिलापी मच्छी खाणावळ असे बोर्ड लागलेले दिसतात.
Fish Thali
Fish ThaliSakal
Updated on
Summary

पुण्याहून सोलापूरला जात असताना भिगवण येण्याच्या आधीपासूनच चिलापी मच्छी खाणावळ असे बोर्ड लागलेले दिसतात.

पुण्याहून सोलापूरला जात असताना भिगवण येण्याच्या आधीपासूनच चिलापी मच्छी खाणावळ असे बोर्ड लागलेले दिसतात. भिगवण, इंदापूर आणि पुण्याची हद्द ओलांडल्यानंतरही काही वेळ बोर्ड दिसत राहतात. नंतर चिलापीचे बोर्ड कमी होत जातात आणि अधूनमधून येरमाळा मच्छीचे बोर्ड दिसू लागतात. अनेक वर्षांपासून ही चिलापी मच्छी खाण्याची इच्छा होती. मागे एकदा माझ्या मावस भावांबरोबर अक्कलकोटहून येत असताना इंदापूरच्या अलिकडे असलेल्या एका छोट्या जॉइंटवर चिलापी मसालावर आडवा हात मारला होता. इंदापूरजवळ लक्की नावाचे एक सुंदर रेस्तराँ आहे तिथं देखील चिलापी मस्त मिळतो. आम्ही त्या लक्कीसमोरच्या एका छोट्या जॉइंटवर चिलापी खाल्ला होता.

नंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत जामखेड मतदारसंघातील माहोल पाहिल्यानंतर आम्ही पुण्याला येण्यासाठी राशीनमार्गे भिगवणचा मार्ग स्वीकारला. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता करीत असल्यापासूनचा आमचा मित्र सावता नवलेची भेट नि चिलापीचा आस्वाद असे दोन्ही हेतू त्यामागे होते. जेवायचं कुठं हा प्रश्नच नव्हता. कारण सावता होता म्हणजे चिंता नाही. फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं विचारलं की, तुमचं जेवणाचं काय प्लॅनिंग आहे. आम्ही म्हटलं, तुझ्याच बरोबर जेवायचं आहे. तू नेशील तिथं आपण जाऊ. मग तो आमच्यासाठी भिगवणला आला. मी, विश्वनाथ नि सावता भिगवणला भेटलो.

आम्ही थोडी चौकशी केली होती. भवानी आणि श्री जगदंब अशा दोन खाणावळी मच्छीसाठी भिगवणमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सावतानं श्री जगदंब मच्छी खाणावळीवर शिक्कामोर्तब केलं आणि आम्ही तिथं स्थानापन्न झालो. श्री जगदंब मच्छी खाणावळीत आडवा हात मारला.

‘श्री जगदंब मच्छी’ हे बाहेरून एकदम टोलेजंग असलं तरी वातावरण एकदम खाणावळीसारखंच आहे. लोक पुण्याहून इथं चिलापी खायला येतात, असं सावता सांगत होता. सावताच्या आदेशानुसार मी जगदंब स्पेशल मच्छी थाळी मागविली. जगदंबची स्पेशल मच्छी थाळी म्हणजे एकदम जबरदस्त विषय. कडक फ्राय केलेला चिलापी, मसाला चिलापी आणि हळद-मीठ घातलेला अळणी चिलापी असे तीन प्रकार थाळीमध्ये होते.

मागे मी फक्त मसाला चिलापी खाल्लेला. यावेळी एकाच थाळीमध्ये चिलापीचे तीन स्वाद म्हणजे एकदम जन्नतच. तीनही वेगवेगळ्या चवी म्हणजे जगदंब भेट सुफळ संपूर्ण. अळणी चिलापी आणि फ्राय चिलापीच्या तुलनेत मसाला चिलापीच अधिक भाव खाऊन जातो, असं मला वाटतं. शिवाय रश्शाची तर बातच वेगळी. कितीही प्यायला तरी मन भरत नाही.

मच्छी खाताना अधूनमधून मच्छी रस्सा आणि अळणी सूपचा आस्वाद घेतला, तर मग जेवणाची गंमत वाढत जाते. चिलापी मसाला, भाकरी आणि रस्सा हे त्रिकूट आपल्या जेवणाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. चिलापीचे तीनही प्रकार खाताना फक्त थोडी काळजी घ्यावी लागते. चुकून एखादा काटा पोटात जायला नको म्हणून कडक फ्राय चिलापी खाताना जरा जपून खावा लागतो इतकंच.

बाकी भाकरीनंतर भातावर आडवा हात मारण्याची वेळ येईपर्यंत आपलं पोट तुडुंब भरलेलं असतं आणि आपण आडवे होण्याच्या बेतात आलेलो असतो. एक अप्रतिम अनुभव पाठिशी घेत आणि पोटात नि मनात साठवून आपण जगदंब मच्छी खाणावळीतून बाहेर पडतो.

तुम्ही जर कधी जेवणाच्या वेळी भिगवणच्या बाजूला गेलात, तर श्री जगदंब मच्छी खाणावळीला जरूर भेट द्या... खास जेवणासाठी गेलात तर मग उत्तमच. कसेही जा, कधीही जा, तुम्हाला जगदंबची चव आणि वैविध्य नक्की आवडेल...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.