सकाळी उठलं की नाष्टा काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यातही मुलांची शाळेची घाई असते. त्यामुळे, त्यांनी काहीतरी खाऊन बाहेर पडावं असं वाटत असतं. यामुळे, सकाळी मातांची एकच गडबड सुरू असते.
मुलांसाठी नाश्त्यात त्यांना आवडेल असा पदार्थ बनवावा लागतो. अन्यथा मुलं हे पदार्थ न खाताच निघून जातात. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी नाष्ट्यामध्ये पिन व्हिल सँडविचेस अथवा रोल सँडविचेसची रेसिपी करा.
याचा दुसरा फायदा म्हणजे, नाश्त्यामध्ये मुलांच्या आवडीचा पदार्थ असेल तर ते काहीही कारणं न देता खातात. कारण, तो पदार्थ त्यांना आवडत असतो.
साहित्य :
स्लाईस न केलेला ब्रेडचा संपूर्ण लोफ, नारळाची जास्त कोथिंबीर घालून केलेली हिरवीगार चटणी, ५० ग्रॅम कोणतेही बटर, टोमॅटो सॉस एक पातळ मलमलचे फडके.
कृती :
स्लाईस न केलेला ब्रेडचा लोफ लांब आडवा मधे कापून चार लांब पट्ट्या तयार कराव्यात. चारही बाजूने थोड्या कडा काढाव्यात.
एक लांब स्लाईस घ्यावा व त्याला लोणी व चटणी सर्वत्र सारखी लावावी. २ चमचे टोमॅटो सॉस लावावे व मलमलच्या ओल्या फडक्यावर स्लाईस ठेवावा. फडक्याच्या साहाय्याने रुंदीच्या बाजूने स्लाईस गोल घट्ट गुंडाळावा व कपडा तसाच गुंडाळलेला दाबून फ्रीजमध्ये १ तास ठेवावा.
अशा चारही स्लाईसेसच्या गुंडाळ्या करून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. १ तासाने फ्रीज मधून काढून अर्धा इंच जाडीचे अळूवडीप्रमाणे तुकडे करावेत व सर्व्ह करावेत.
पांढऱ्या ब्रेडवर मधे हिरव्या चटणीने हे रोल खूप आकर्षक दिसतात. आवडीनुसार लाल रंगाचा जॅम वापरावा. सँडविच चांगले होतात.
टीप :
सँडविच रोल घट्ट केला पाहिजे, नाहीतर कापल्यावर उलगडतो. या सँडविचला बटर जरूर वापरावे. म्हणजे फ्रीजमध्ये बटर घट्ट झाल्याने रोल चांगला घट्ट होतो.