मी मूळची सांगलीची आहे आणि मला कुकिंग प्रचंड आवडतं. मला रात्री झोपेतून उठवून जरी कुणी स्वयंपाक करायला सांगितला तरीही मी तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने करेन. पण, मला खाण फारसं आवडत नाही. त्याला कारण म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये सतत मेंटेन राहावं लागत. त्यामुळेच खाण्याच्या सवयी खूप मोडल्या आहेत आणि आवडीच म्हणाल तर शाकाहारी सगळे पदार्थ मला आवडतात.
जास्त करून घरगुती बनवलेले साधे जेवण मला जास्त आवडते. पण, कितीही सवयी मोडल्या तरी मला भरलं वांग, भाकरी व भात आणि भाताचे प्रकार जास्त आवडतात. वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगला गेलेले असताना वेगवेगळ्या पद्धतीचे भाताचे प्रकार मी टेस्ट केलेले आहेत. तेलगू, तमिळ चित्रपटांच्याशूटिंगसाठी गेलेली असताना रस्सम राईस खाल्लेला आहे. तो मला प्रचंड आवडतो. कन्नड चित्रपटाचे शूटिंग केलेले असताना तिकडचे चित्रांगण स्टाईल भात मला खूप आवडलेला होता, जो आवर्जून मी घरी बनवते आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझ्या हातचे चित्रांगण फार आवडते.
जेवण बनवण्याचे म्हणाल तर शाकाहारी संपूर्ण स्वयंपाक मला येतो. अगदी आपले पारंपारिक पदार्थ सुद्धा मी आवडीने बनविते. सर्व प्रकारचे लाडू-चिवडे, ,पुरणपोळ्या, पंचामृत चटण्या, कोशिंबिरी, आमटी, वेगवेगळ्या पद्धतीचे वडे, उसळ असे बरेच पदार्थ आहेत जे अगदी आपल्या पारंपारिक पद्धतीचे मला बनवायला आवडतात.
गोड पदार्थांमध्ये म्हणायचं झालं तर कवठाची बर्फी, अननसाचा शिरा, पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, मोदक बदामाचा शिरा असे असंख्य प्रकार आहेत जे मी सतत बनवत असते. त्यामुळे जेवण बनवणे हे मला प्रचंड आवडतं.
खाण्याचा अनुभव एक आठवतो तो म्हणजे शूटिंगसाठी सतत हैदराबादला राहायला गेले होते. सकाळ, दुपार व संध्याकाळ सतत फक्त इडली हेच जेवण तिथे असायचं. त्यामुळे कायमस्वरूपी इडली म्हटलं की नको वाटतं. त्याला बरेच दिवस झाले पण आजही इडली-सांबार खायची इच्छा होत नाही. यावरून ही गोष्ट लक्षात आली की एकच गोष्ट सतत आपल्या आयुष्यात समोर येत राहिली तर त्या गोष्टीचा कंटाळा येतो, हीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यातील परिस्थितींवर लागू करू शकतो.
माझी स्वयंपाकाची सुरुवात खरंतर मी खूप लहान असताना झाली. मी परिस्थितीनुसार खूप गरिबीमध्ये वाढले आणि आई घर चालवण्यासाठी सोनार कामामध्ये व्यस्त असायची आणि मला माझ्या बहिणीला प्रचंड भूक लागलेली होते आणि घरामध्ये फक्त एक कप दूध होतं, तेव्हा माझे लहानपणीचे काही मित्र-मैत्रिणी आमच्या बरोबर घरी होते. आम्ही म्हणालो की, चल आपण काहीतरी प्रयत्न करूयात. कारण, आई कामात होती. गंमत म्हणून खरंतर आम्ही तेव्हा ती गोष्ट सुरु केली होती आणि काय करायचं काही कळत नव्हतं. खूप लहान होतो आम्ही तेव्हा. मग वयानुसार प्रत्येकाने आपल्याला जसं सुचेल त्याची रेसिपी तयार केली म्हणजे घरात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या. आम्ही अक्षरशः दुधाबरोबर सगळे पदार्थ मिक्स केलेले होते. फोडणीसुद्धा घातलेली होती. मला अगदी स्पष्ट आठवत आहे आणि जो काही पदार्थ तयार झालेला होता, तो आम्हाला खूप चविष्ट वाटला. .
प्रत्येकाला त्याची चव खूप आवडली. तेव्हापासून लहानपणीच्या त्या ग्रुपमध्ये मी एक खूप चांगली स्वयंपाक करणारी व्यक्ती आहे. म्हणून फेमस झाले. त्यानंतर त्या उत्साहामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकले. खरंतर स्वयंपाक शिकवण्यामागे माझ्या मावशीचा खूप मोठा वाटा आहे. तिचं केटरिंग आहे. माझ्या आजीचं पण केटरिंग होतं. मोठमोठ्या स्वयंपाकाच्या ऑर्डर्स मी लहानपणापासून पाहिलेल्या आहेत. त्यांना मदत केलेली आहे. आत्तासुद्धा सगळे पदार्थ मी अगदी हजार लोकांचे सुद्धा करू शकते आणि हीच आवड पुढे जोपासायची म्हणून सुकन्या महिला गृह उद्योग ही कंपनी स्थापन केली. मी मोठमोठ्या ऑर्डर्स घेते; तसेच मसाल्यांचा मॅन्युफॅक्चरिंग करते, ते एक्सपोर्ट करते; शिवाय दिवाळीचे सर्व पदार्थ आपल्या कंपनीत बनवले जातात आणि ते एक्सपोर्ट होतात
माझ्या आवडीला मी एक व्यवसायाचं रूप दिलेलं आहे, जेणेकरून व्यवसाय करताना सतत आनंद मिळावा; कारण अभिनय क्षेत्र काही आयुष्यभर मला पुरेल असं वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.