फ्युजन किचन : ‘चिनी की रोटी’

नुकताच इंटरनॅशनल शेफ्स डे झाला. तसा हा दिवस हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीशिवाय फारसा कोणाला माहीत नसतो.
Chini ki Roti
Chini ki Rotisakal
Updated on

- नीलिमा नितीन

नुकताच इंटरनॅशनल शेफ्स डे झाला. तसा हा दिवस हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीशिवाय फारसा कोणाला माहीत नसतो; पण जे शेफ्स आपण सुट्टी, सणवार साजरे करत असताना अगदी १८-१८ तास एक्स्ट्रा काम करून आपल्याला स्वादिष्ट व आयतं खाऊ घालतात, त्याना एक थँक्स म्हणणं आवश्यक आहे, नाही का?

मी स्वतः कित्येक अशा शेफ्सना ओळखते आणि पाहिलंय, की ते स्वतःच्या मुलांच्या, बायकोच्या इतकंच काय अगदी स्वतःच्या वाढदिवशीसुद्धा हसतमुखानं इतरांसाठी स्वयंपाक करत असतात. कामासाठी वैयक्तिक जीवनाचा खूप मोठा त्याग ही मंडळी करात असतात आणि आपले खास क्षण जसे आपले वाढदिवस, ॲनिव्हर्सरीज संस्मरणीय करतात. इतकंच नव्हे, तर आपल्या खाद्यसंस्कृतीचं महत्त्व जगला पटवून देण्यासाठी, ही मंडळी आपले जुने पारंपरिक पदार्थ नव्या रूपात जगासमोर अभिमानानं मांडतात.

आज जगातल्या कुठल्याही मोठ्या शहरात भारतीय रेस्टॉरंट्स आहेत आणि ती स्वतःचं वैशिष्ट्य जपून लोकप्रिय आहेत. म्हणूनच आज शेफ्स स्पेशलमध्ये मी अशा शेफची रेसिपी आणली आहे- जे भारतात तर नंबर १ आहेतच; पण जगातही त्यांनी स्वतःचं व भारतीय खाद्य संस्कृतीचं खास स्थान निर्माण केलं आहे. त्याना भरपूर ॲवॉर्ड्‌स मिळाली आहेतच, शिवाय जगातील अनेक नामवंत सेलिब्रिटीज, डिप्लोमॅट्स, बिझनेसमेन इत्यादी त्यांच्या Indian Accent हॉटेल्समध्ये नेहमीच जात असतात.

मागच्या वर्षी त्यांच्या पुणे इथं झालेल्या pop up ला जाण्याचा मला योग आला होता आणि मी एकच सांगू शकते, की मी आजपर्यंत असा अनुभव घेतला नव्हता. नुकतंच त्यांनी मुंबईतही त्यांचं Indian Accent रेस्टॉरंट सुरू केलं आहे. चला तर, पाहू या भारतातील अग्रणी शेफ मनीष मेहरोत्रा यांची रेसिपी खास ‘सकाळ’च्या वाचकासाठी.

‘चिनी की रोटी’, ‘मार्शमॅलोज चिनी की रोटी’ ही बहुतेक उत्तर भारतीय घरांमध्ये ‘आकस्मिक मिष्टान्न’/ इन्स्टंट डेझर्ट म्हणून ओळखली जाते. ही साखरेनं किंवा गूळ भरलेली चपाती, सोनेरी तपकिरी होईपर्यंत तुपानं शिजवलेली, फ्रेश क्रीम किंवा मलाईच्या/साय डॉलपसह सर्व्ह केली जाऊ शकते. गरम, कॅरॅमली, कुरकुरीत आणि गोड, हे असं एक मिष्टान्न आहे. इंडियन ॲक्सेंट हे मेन्यूमध्ये ‘चिनी की रोटी’ आणणारं पहिलं रेस्टॉरंट होतं. ज्यांनी ते चाखलं आहे, ते म्हणतात की ते त्यांना त्यांच्या आजीच्या स्वयंपाकाची आठवण होते.

साहित्य :

  • रोटीसाठी : पाव टीस्पून बडीशेप, गूळ १ टीस्पून, २ टीस्पून पाणी, ३ टेबलस्पून मैदा, १ टीस्पून तूप, रवा २ टीस्पून, २ टीस्पून पिवळं लोणी, शॅलो फ्रायसाठी तूप.

  • सारणासाठी : ब्राऊन शुगर १ टेस्पून, ५० ग्रॅम मिल्क केक, मार्शमेलोज कापलेले १ टीस्पून.

  • सर्व्ह करण्यासाठी : गोड मलई १ टेस्पून, व्हॅनिला आईस्क्रीम १ स्कूप, बदाम कापलेले, शुगर कोटेड बडीशेप गार्निश म्हणून.

कृती :

  • पिठासाठी : एका गरम कढईत बडीशेप सुवास येईपर्यंत भाजून घ्या. भाजलेली बडीशेप भरड वाटून घ्या. पावडर करू नका. साधारण १५-२० मिनिटं गूळ पाण्यात भिजत ठेवा व गाळून बाजूला ठेवा. मैदा, तूप, रवा, पिवळं लोणी आणि कुटलेली बडीशेप एकत्र करा. मिश्रण आपल्या हातांनी मिक्स करा. गुळाचं पाणी घालून हळूहळू मळून घ्या- जेणेकरून एक गुळगुळीत, लवचिक पीठ तयार होईल. एक-दोन तास पीठ तसंच ठेवा.

  • सारणासाठी : ब्राऊन शुगर आणि मिल्क केक मिक्स करा. आपल्या हातांनी चुरा. अर्ध्या प्रमाणात कापलेले मार्शमेलो घाला. चांगलं मिसळा.

  • चिनी की रोटी : पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करा. आपल्या तळहातावर एक गोळा सपाट करा. मध्यभागी थोडी साखर आणि मिल्क केकचं सारण भरून ठेवा. लाटण्याच्या साह्यानं सुमारे ५ इंच व्यासाच्या चपाती (रोटी) बनवा. एका जाड बुडाच्या सपाट पॅनमध्ये, दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत रोटी शिजवा, भरपूर तूप लावा. रोटी चांगली शिजल्यावर आणि कुरकुरीत झाल्यावर पॅनमधून काढा. स्वच्छ कापडानं ते झाकून ठेवा. गरम रोटीचे हाताने छोटे तुकडे करा.

  • सर्व्ह करताना : एका ताटात वरील रोट्यांचे तुकडे ठेवा. वरून क्रीम टाका, रोटीच्या वर व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप ठेवा. कापलेले बदाम, शुगर कोटेड बडीशेप आणि उरलेल्या कापलेल्या मार्शमेलोने सजवा. जरूर करून पाहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.