परवेज खान
आज कुटुंबं विभक्त झाली. अनेक घरांत पत्नी-पतीही नोकरी करतात. त्यामुळे फराळ विकत घेण्याकडे कल आहे. मार्केटची ही गरज ओळखून लघुउद्योगांनी उपवासाचे रेडीमेड पदार्थ बाजारात आणली आहेत. यामुळे घरगुती व्यावसायिक महिला, शहरातील लहान मोठे केटरर आणि बचत गटांनी बनवलेल्या उपवासाचे पदार्थ, भाजणी, लाडू, चिवडा, लोणची अशा वेगवेगळ्या प्रकारांनी लक्ष वेधले आहे.
तयार फराळाच्या मागणीमुळे अनेक महिलांना घरबसल्या चांगला व्यवसाय मिळाला आहे. बहुतांश महिला घरगुती व्यावसायिकांकडे ऑर्डर देऊन हव्या त्या प्रकारातील आणि चवीचे पदार्थ करून घेत आहेत. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
सध्या या मेहनती उद्योजिका व्यस्त आहेत. उपवास भाजणी, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ या पदार्थांना प्रामुख्याने मागणी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजणी दळून नेण्याचे प्रमाण घटले आहे. घरात माणसे कमी असतात, त्यामुळे रेडिमेड पीठ घेणे परवडते. त्यामुळे दुकानात रेडीमेड पिठे उपलब्ध करून दिली आहेत.
उपवासाची भाजणी पीठ ३५० रुपये किलो, शिंगाडा पीठ ५०० रुपये किलो, राजगिरा पीठ ३५० रुपये किलो या दराने आहेत. याशिवाय बटाटा शेव, बटाटा किस, शिंगाडा शेवई, बटाटा चिप्स, साबुदाणा पापड्या, साबुदाणा चकली, साबुदाणा कुरडई, बटाटा वेफर्स, साबुदाणा लाडू, शेंगदाणा लाडू, खोबरे लाडू, खजूर ड्रायफ्रूट लाडू, शेंगदाणा चिक्की, क्रश लिंबू लोणचं, उपवासाचं कैरीचं लोणचं अशा खूप भरपूर प्रकार खास उपवासासाठी आहेत.
शिंगाडा शेवई २०० रुपये किलो, बटाटा चिप्स ३०० रुपये किलो, तळलेली बटाटा शेव १५० ते १८० रुपये किलो, साबुदाणा लाडू ५०० रुपये किलो, शेंगदाणा लाडू ३५० रुपये किलो, खजूर ड्रायफ्रूट लाडू ६०० रुपये किलो असे या पदार्थांचे दर आहेत. खास उपवासाचे लिंबू लोणचे, क्रश लिंबू लोणचे आणि तेल नसलेले कैरी लोणचे मिळते.
क्रश लिंबू लोणचे ३२० रुपये किलो आणि उपवासाचं कैरीचं लोणचे ३५० रुपये किलो आहे. याशिवाय आयते नारळ पाणी पावडर मिळते. एक पाऊच एक ग्लास पाण्यात टाकले तर एक ग्लास नारळ पाणी तयार होतं. लघू उद्योजिकांचा समूह असलेल्या आम्ही उद्योगिनी संस्थेच्या आरती डुघरेकर यांनी सांगितले, ‘‘उद्योगिनी खास उपवासासाठी मोठ्या मेहनतीने पदार्थ बनवतात. आवड आणि चव या दोन्हींचा मेळ यात असतो.
शहरातील डेअरी प्रॉडक्टलाही चांगली मागणी आहे. बदाम-पिस्ता श्रीखंडासह आम्रखंडही आहे. केवळ शहरातच नव्हे तर पुणे-मुंबईलाही श्रीखंड पाठवले जाते. काही दुकानांत फराळाचे पॅकेज आणि मधुमेह रुग्णांसाठी ‘शुगर-फ्री’ फराळही विक्रीस असून, यात शुगर फ्री श्रीखंड मिळते.
घरगुती पदार्थ बनवताना शुद्धता महत्त्वाची. उपवासाचे पदार्थ तयार करताना स्वच्छ वातावरणात आणि अगदी ताजे ताजे पदार्थ तयार केले जातात. सणाचे पावित्र्य राखण्यासाठी उपवासाचे पदार्थ तितक्याच शुद्ध मनाने केले जात असल्याने घरगुती पदार्थांना मागणी वाढली आहे.
— आरती डुघरेकर, उद्योजिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.