नाश्ता हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. म्हणूनच प्रत्येकाने हेल्दी ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. जेव्हा नाश्त्यासाठी आरोग्यदायी पर्यायांचा विचार केला जातो तेव्हा काय खावे हे आपल्याला समजत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा लोकांना सकाळी काही आरोग्यदायी आणि चविष्ट खावेसे वाटते तेव्हा ते पोहे किंवा ढोकळा खातात, पण जर तुम्हाला दोन्ही खाण्याचा कंटाळा येत असेल तर यावेळी तुम्ही पोह्यांचा ढोकळा बनवून खाऊ शकता. हे बनवायलाही खूप सोपे आहे.
आपल्यापैकी बहुतेकांना ढोकळा खायला आवडतो. ढोकळा खायला आवडत नसेल असा क्वचितच कोणी असेल पोह्यांपासून बनवलेला ढोकळा एकदा खाल्ल्यास बेसनाचा ढोकळा खाणे विसराल. पोह्यांपासून बनवलेला ढोकळा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यात खाऊ शकता. चला जाणून घेऊया पोह्याचा ढोकळा कसा बनवायचा.
पोहे, रवा, बेसन, दही, आलं, हिरवी मिरची, साखर, मीठ, लसूण, हळद, तेल, इनो, मोहरी, जिरं, कडीपत्ता, पाणी.
पोह्याचा ढोकळा करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घ्या. नंतर त्यात अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी बेसन घाला. मग त्यात अर्धी वाटी दही, एक इंच आलं, ३ हिरव्या मिरच्या, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी पाणी घालून पेस्ट तयार करा.
पेस्ट तयार केल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि २ चमचे तेल घालून मिक्स करा. नंतर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. दुसरीकडे कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये स्टॅण्ड ठेवा. एका प्लेटला ब्रशने तेल लावा. बॅटरमध्ये एक चमचा इनो आणि २ चमचे पाणी ओतून मिक्स करा. बॅटर प्लेटमध्ये टाका, आणि प्लेट स्टॅण्डवर ठेवा, आणि त्यावर प्लेट झाका. २० मिनिटांसाठी वाफेवर ढोकळा शिजवून घ्या.
एकीकडे फोडणीची पळी घ्या. त्यात २ चमचे तेल घाला. तेल घातल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिरवी मिरची घालून मिक्स करा. तयार फोडणी ढोकळ्यावर टाकून डिश सर्व्ह करा.