लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सोलापूर शहरातील कसबा भागातील ज्येष्ठ शेतकरी, कष्टकरी व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन 1943 साली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली.
सोलापूर : लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) प्रेरणेतून सोलापूर शहरातील (Solapur) कसबा भागातील ज्येष्ठ शेतकरी, कष्टकरी व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन 1943 साली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. पुढे 1980 मध्ये 'एक भाग - एक गणपती' यानुसार कसबा परिसरात मंडळाचे एकत्रिकरण करून 'श्रीमंत मानाचा कसबा गणपती' (Shrimant Manacha Kasba Ganpati) या नावाने उत्सवास थाटामाटात सुरवात झाली. गणेशोत्सवात पौराणिक, ऐतिहासिक, समाजप्रबोधनपर देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंडळ वर्षभर समाजहिताचे अनेकविध उपक्रम राबविते.
स्थापनेनंतर सुरवातीच्या काळात मंडळातर्फे भव्य-दिव्य गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असे. यामध्ये 20 फुटी अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या अवतारातील मूर्ती, 10 फुटी गदाधारी भीमरूपी मूर्ती, बेडर कण्णप्पा, शाहिस्तेखानाचा वध करणारे शिवाजी महाराज यांची प्रतिकृती, बाल गणपती अशा विविध रूपांतील गणेशमूर्तींचा समावेश असायचा. पुढे 1988 मध्ये तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली "श्रीं'ची एक आकर्षक भव्य मूर्ती बनविण्यात आली. आजही ही मूर्ती कसबा गणपती मंदिरात दिसून येते. गणेशोत्सव काळात या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. दैनंदिन पूजाविधी सकाळी व सायंकाळी नियमित भक्तिमय वातावरणात पार पडतात. नवसाला पावणारा गणपती अशी "श्रीं'ची सर्वदूर ख्याती आहे. भाविकांनी चांदी, सोन्याचे दागिने या गणरायाला अर्पण केले आहेत. त्यातून "श्रीं'च्या मूर्तीस सोन्या-चांदीच्या अलंकारांनी मढविण्यात आले आहे. 1998 मध्ये "श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठान' या नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली. भाविकांच्या मदतीने कसबा गणपती मंगल भवन (मंदिर) बांधण्यात आले. त्या ठिकाणी "श्रीं'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली.
प्रतिष्ठानांतर्गत कसबा गणपती उत्सव समिती, कसबा गणपती भक्त मंडळ, कसबा गणपती शेतकरी संघटना, कसबा गणपती महिला मंडळ, कसबा गणपती ज्येष्ठ मंडळ, कसबा गणपती हेल्प लाइन अशा विविध संस्था कार्यरत आहेत. वर्षभरात विविध सण-उत्सव एकत्रितपणे राबविले जातात. गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी व गणेशोत्सव कालावधीत दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी असते.
सामाजिक कार्यात हातखंडा
लोककल्याणासाठी मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. भूकंपग्रस्तांसाठी मदतफेरी काढून मदतनिधी संकलित करून तो शासनास दिला आहे. कारहुणवी दिवशी शेतकरी व शेतगड्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्याची परंपरा आजही कायम आहे. गणेश चतुर्थीला मिरवणुकीत दहा बैलजोड्या शहरवासीयांच्या आकर्षणाचा भाग असतात. महिला मंडळातर्फे नागपंचमी मंगळागौरनिमित्त विविध स्पर्धा, भक्त मंडळातर्फे श्रावणात पालख्यांचे स्वागत, प्रसाद वाटप अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन असते.
ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ भोगडे, आमदार विजयकुमार देशमुख, ऍड. मिलिंद थोबडे, प्रकाश वाले, मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, संजय दर्गोपाटील, बिपिन धुम्मा, तम्मा मसरे, मेघराज निंगदड्डो, रामचंद्र जोशी, नंदकुमार मुस्तारे, विकास धुम्मा, सागर आवसे, नीलेश मसरे, सिद्धेश्वर आळंद, सिद्धाराम बुगडे, श्रीशैल बिराजदार, नवनाथ मेंगाणे यांच्यासह कार्यकर्ते सर्व कार्यक्रमांसाठी परिश्रम घेतात.
श्रीमंत मानाचा कसबा गणपती उत्सवाच्या यंदाच्या अध्यक्षपदी पुष्कराज मेत्री
श्रीमंत मानाचा कसबा गणपती उत्सव अध्यक्षपदी पुष्कराज मेत्री यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सुमीत हब्बू तर सचिवपदी योगेश इटाणे यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महेश बॅंकेचे उपाध्यक्ष मल्लिनाथ मसरे, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, ट्रस्टी- सदस्य मल्लिनाथ खुने, संजय दर्गोपाटील, केदार मेंगाणे, शिवशंकर कोळकूर, बिपिन धुम्मा, रामचंद्र जोशी, शिवानंद बुगडे, नागनाथ चितकोटी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.