१९१६ पासून दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर हा उत्सव कायमस्वरूपी त्याच ठिकाणी साजरा करण्यात येऊ लागला. तालमीजवळ असणाऱ्या बागवान गल्लीतील मुस्लिमदेखील या उत्सवात हिरिरीने सहभाग घेऊ लागले.
सातारा : सोमवार पेठेतील आझाद हिंद मंडळाला तब्बल ११८ वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिशांना अंधारात ठेवून गणेशोत्सवाची स्थापना करणाऱ्या या मंडळाने खरेतर स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी मंडळ अशी संपूर्ण महाराष्ट्रात आझाद हिंद गणेश मंडळाची ओळख आहे. मानाचा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारे व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मंडळाची ओळख आहे.
या मंडळाची स्थापना १९०७ मध्ये करण्यात आली. त्याच वर्षी ब्रिटिशांच्या काळात सातारकरांना पहिला गणेशोत्सव गुप्तपणे साजरा करावा लागला. १९११ मध्ये ब्रिटिशांना मंडळाच्या उत्सवाची कुणकूण लागताच पोलिसांनी छापा घातला. त्याचदरम्यान गणरायाची मूर्ती दत्त मंदिरात ठेवण्यात आली. त्यानंतर मंडळाची क्रांतिकारी परंपरा कायम ठेवत गोविंद खर्शीकर, सिकंदर बागवान, धोंडिराम शिंदे, दयाराम खेडकर, प्रल्हाद निगडीकर, हकीम आत्तार या नामवंत वस्तादांनी दांडपट्टा, लाठीकाठी, भाले, बरचे, जाळचक्र अशा मर्दानी खेळांची परंपरा रुजविली.